---Advertisement---

INDvENG 1st Test : पंत, पुजाराची अर्धशतकं, डॉम बेसच्या ४ विकेट्स; तिसऱ्या दिवसाखेर भारताच्या ६ बाद २५७ धावा

On: रविवार, फेब्रुवारी 7, 2021 5:09 PM
---Advertisement---

चेन्नई। भारत विरुद्ध इंग्लंड संघात शुक्रवारपासून (५ फेब्रुवारी) ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याला सुरुवात झाली आहे. एमए चिदंबरम स्टेडियम (चेपॉक स्टेडियम) येथे होत असलेल्या या सामन्याचा रविवारी (७ फेब्रुवारी) तिसरा दिवस होता. तिसऱ्या दिवसाखेर भारताने ७४ षटकात ६ बाद २५७ धावा केल्या आहेत. अजून भारतीय संघ ३२१ धावांनी पिछाडीवर आहे. सध्या वॉशिंग्टन ६८ चेंडूत ३३ धावांवर आणि अश्विन ५४ चेंडूत ८ धावांवर नाबाद खेळत आहेत. तिसऱ्या दिवसाखेर इंग्लंडकडून डॉमनिक बेसने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या आहेत. तर जोफ्रा आर्चरने २ विकेट्स घेतल्या.

तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा डाव ५७८ धावांवर संपुष्टात आल्यानंतर भारतीय संघ फलंदाजीसाठी उतरला. भारतीय संघाने पहिल्या ४ विकेट्स १०० धावांच्या आतच गमावल्या. पण त्यानंतर ११९ धावांची भागीदारी करत रिषभ पंत आणि चेतेश्वर पुजाराने भारताचा डाव सांभाळला. मात्र हे दोघेही शतकाच्या जवळ आल्यानंतर बाद झाले.

पंत बाद झाल्यानंतर अश्विन आणि सुंदरने भारताचा डाव सांभाळत तिसऱ्या दिवसाखेरपर्यंत जास्त पडझड होऊ दिली नाही. त्यामुळे भारताला किमान तिसऱ्या दिवसाखेर २५० धावांचा टप्पा पार करता आला.

पंतचे शतक थोडक्यात हुकले

वैयक्तिक अर्धशतके झळकावल्यानंतरही पंत आणि पुजाराने त्यांच्या खेळाची लय कायम ठेवली होती. या दोघांनीही तिसऱ्या सत्रातही चांगला खेळ केला होता. त्यांनी ४७ व्या षटकात शतकी भागीदारी पुर्ण केली. दुसऱ्या सत्राप्रमाणेच एका बाजूने पुजाराने सावध खेळ करत डाव सांभाळला होता. तर एका बाजूने पंतची आक्रमक खेळी सुरु होती. मात्र अखेर ही भागीदारी तोडण्यात डॉमनिक बेसला यश आहे. त्याने ५१ व्या षटकात पुजाराला त्याच्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले.

पुजारा रॉरी बर्न्सच्या हातून झेल बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने १४३ चेंडूत ११ चौकारांसह ७३ धावा केल्या. त्याच्यात आणि पंतमध्ये ११९ धावांची भागीदारी झाली. पुजारा बाद झाल्यानंतर वॉशिंग्टन सुंदर पंतला साथ देण्यासाठी मैदानावर आला आहे. त्यानंतर पंतने षटकार खेचत भारताला २०० धावाही पार करुन दिल्या.

मात्र, त्यानंतर नव्वदीच्या घरात पोहचल्यानंतर पंत पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या नादात बाद झाला. त्याला डॉमनिक बेसनेच बाद केले. पंतचा झेल डीप कव्हरला असलेल्या जॅक लीचने पकडला. त्यामुळे ८८ चेंडूत ९१ धावांवर पंत बाद झाला. या खेळीत पंतने ९ चौकार आणि ५ षटकार मारले. तो बाद झाल्याने आर अश्विन फलंदाजीसाठी आला आहे.

भारताने पहिल्या डावात ५७ षटकांत ६ बाद २२५ धावा केल्या आहेत. सध्या भारताकडून वॉशिंग्टन १८ चेंडूत १४ धावांवर आणि अश्विन २ चेंडूत  ० धावांवर नाबाद खेळत आहेत. भारत अजून ३५३ धावांनी पिछाडीवर आहे.

पंत-पुजाराची अर्धशतके 

भारताने पहिल्या ४ विकेट्स १०० धावांच्या आतच गमावल्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि रिषभ पंतने डाव सांभाळला. एका बाजूने पुजारा सावध खेळ करत असताना पंतने आक्रमक फलंदाजी केली. त्याने इंग्लंडच्या डॉमनिक बेस आणि जॅक लीच या फिरकीपटूंच्या गोलंदाजीवर आक्रमक पवित्रा घेतला. त्याने ३२ व्या षटकात लीचच्या गोलंदाजीवर सलग २ षटकार मारले. त्यानंतर त्याने ३४ व्या ३६ व्या षटकातही लीचच्या गोलंदाजीवर षटकार मारले. पंत आणि पुजाराने भारताचा डाव सांभाळताना अर्धशतकी भागीदारीही रचली.

पुजारा आणि पंत दोघांनीही भारताच्या पहिल्या डावातील ४० व्या षटकात त्यांचे वैयक्तिक अर्धशतके पूर्ण केली. पुजाराने १०६ चेंडूत तर पंतने ४० चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.

त्यामुळे तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्राखेर भारताने पहिल्या डावात ४१ षटकांत ४ बाद १५४ धावा केल्या आहेत. सध्या भारताकडून पुजारा १११ चेंडूत ५३ धावांवर आणि पंत ४४ चेंडूत ५४ धावांवर नाबाद खेळत आहेत. भारत अजून ४२४ धावांनी पिछाडीवर आहे.

कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेने लवकर गमावल्या विकेट्स

दुसऱ्या सत्रात विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराने चांगली सुरुवात केली होती. या दोघांनीही इंग्लंडच्या गोलंदाजांना मोठे यश मिळू दिले नव्हते. त्यामुळे त्यांची जोडी आता जमणार असे वाटत असतानाच फिरकीपटू डॉमनिक बेसच्या फिरकीत विराट अडकला. भारताच्या २५ व्या षटकात बेसने टाकलेला चेंडू विराटच्या बॅटची आतली कड घेऊ शॉर्ट लेगला गेला. त्यामुळे तिथे उभ्या असलेल्या ऑली पोपने चूक न करता योग्य झेल टिपला. त्यामुळे विराटला ४८ चेंडूत ११ धावांवर बाद होऊन माघारी परतावे लागले.

विराट बाद झाल्याने उपकर्णधार अजिंक्य रहाणे चेतेश्वर पुजाराला साथ देण्यासाठी मैदानावर आला आहे. पण तो फार काही खास करु शकला नाही. रहाणेला ६ चेंडूत १ धावांवर खेळत असताना बेसनेच झेलबाद केले. रहाणेचा जबरदस्त झेल इंग्लंडचा कर्णधार जो रुटने डावीकडे उडी घेत झेलला. त्यामुळे आता भारतीय संघाकडून फलंदाजीसाठी रिषभ पंत उतरला आहे.

भारताने पहिल्या डावात २७ षटकांत ४ बाद ७३ धावा केल्या आहेत. सध्या भारताकडून पुजारा ६८ चेंडूत २६ धावांवर आणि पंत ३ चेंडूत ८ धावांवर नाबाद खेळत आहेत. भारत अजून ५०५ धावांनी पिछाडीवर आहे.

भारताच्या पहिल्या सत्राखेर १४ षटकांत २ बाद ५९ धावा

भारताकडून पहिल्या डावात फलंदाजीसाठी रोहित शर्मा आणि शुबमन गिल सलामीला फलंदाजीसाठी उतरले होते. मात्र, हे दोघेही १० षटकांच्या आत बाद झाले आहेत. त्यानंतर विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराने डाव सांभाळला आहे. या दोघांनी घाई न करता पहिल्या सत्राखेरपर्यंत आणखी पडझड होऊ दिली नाही.

त्यामुळे भारताने पहिल्या डावात १४ षटकांत २ बाद ५९ धावा केल्या आहेत. सध्या भारताकडून पुजारा ३५ चेंडूत २० धावांवर आणि विराट १२ चेंडूत ४ धावांवर नाबाद खेळत आहेत. भारत अजून ५१९ धावांनी पिछाडीवर आहे. इंग्लंडकडून पहिल्या सत्राखेर आर्चरने २ विकेट्स घेतल्या आहेत.

रोहित पाठोपाठ गिललाही आर्चरने केले बाद 

चौथ्या षटकात रोहित बाद झाल्यानंतर पुजारा आणि गिल चांगला खेळ करत होते. गिलने यावेळी काही शानदार फटकेही खेळले. मात्र, जोफ्रा आर्चरने चांगल्या लयीत असलेल्या गिलला झेलबाद केले. गिलचा झेल मिड-ऑनला जेम्स अँडरसनने उत्तमप्रकारे झेलला. त्यामुळे गिलला २८ चेंडूत २९ धावा केल्यानंतर विकेट गमवावी लागली. गिल बाद झाल्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली चेतेश्वर पुजाराला साथ देण्यासाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आहे.

भारताने पहिल्या डावात १२ षटकात २ बाद ५७ धावा केल्या आहेत आणि सध्या भारताकडून पुजारा २६ चेंडूत १९ धावांवर आणि विराट ९ चेंडूत ३ धावांवर नाबाद खेळत आहेत. भारत अजून ५२१ धावांनी पिछाडीवर आहे.

रोहित ६ धावांवर बाद 

तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव ५७८ धावांवर संपुष्टात आल्यानंतर भारताकडून रोहित शर्मा आणि शुबमन गिल सलामीला फलंदाजीसाठी उतरले होते.

मात्र, त्यांनी सावध सुरुवात केल्यानंतर लगेलचच चौथ्या षटकात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने रोहित शर्माला झेलबाद केले. रोहितचा झेल यष्टीरक्षक जोस बटलरने घेतला. त्यामुळे रोहितला ९ चेंडूत ६ धावा करुन माघारी परतावे लागले. रोहित बाद झाल्याने गिलसह फलंदाजीसाठी चेतेश्वर पुजारा आला आहे.

भारताने पहिल्या डावात ५ षटकात १ बाद २२ धावा केल्या आहेत आणि सध्या भारताकडून गिल १४ चेंडूत १३ धावांवर आणि पुजारा ७ चेंडूत ३ धावांवर नाबाद खेळत आहेत. भारत अजून ५५६ धावांनी पिछाडीवर आहे.

रोहितच्या मुलीची स्टेडियममध्ये उपस्थिती –

रोहित शर्माची २ वर्षांची मुलगी समायरा आणि रोहितची पत्नी रितीका या दोघीही तिसऱ्या दिवशी स्टेडियममध्ये उपस्थित आहेत. त्यांचा एक फोटोही बीसीसीआयने शेअर केला आहे.

इंग्लंडचा पहिला डाव ५७८ धावांवर संपुष्टात

तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव १९०.१ षटकांत ५७८ धावांवर संपुष्टात आला आहे. या डावात इंग्लंडचा कर्णधार जो रुटने द्विशतकी खेळी केली आहे. त्याने इंग्लंडकडून या डावात ३७७ चेंडूत सर्वाधिक २१८ धावा केल्या. या खेळीत रुटने १९ चौकार आणि २ षटकार मारले. त्याच्याशिवाय इंग्लंडच्या पहिल्या डावात बेन स्टोक्सनेही ८२ धावांची खेळी केली. तसेच डॉम सिब्लीने ८७ धावांची खेळी केली होती. याशिवाय डॉमनिक बेस(३४), जोस बटलर (३०), ऑली पोप (३४), रॉरी बर्न्स (३३) यांनी छोटेखानी खेळी करत योगदान दिले. त्यामुळे इंग्लंडला पहिल्या डावात ५७८ धावांचा डोंगर उभा करण्यात यश आले.

या डावात भारताकडून जसप्रीत बुमराह आणि आर अश्विनने सर्वाधिक प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. तसेच इशांत शर्मा आणि शहाबाज नदीमने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या आहेत.

तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात

तिसऱ्या दिवसाची सुरुवात इंग्लंडने पहिल्या डावातील १८१ षटकापासून ८ बाद ५५५ धावांच्या पुढे खेळायला सुरुवात केली. इंग्लंडकडून दुसऱ्या दिवशी नाबाद असणारी जॅक लीच आणि डॉमनिक बेसची जोडी तिसऱ्या दिवशी सुरुवातीला फलंदाजीला उतरली आहे. पण सुरुवातीलाच बेसला जसप्रीत बुमराहने १८६ व्या षटकात पायचीत केले. त्यामुळे बेस ३४ धावा करुन बाद झाला. त्यानंतर जेम्स अँडरसन आणि जॅक लीचने लढत देण्याचा प्रयत्न केला पण ने ची विकेट घेत अखेर इंग्लंडचा पहिला डाव संपुष्टात आणला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---