पुणे। इंग्लंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यात त्यांनी ४ सामन्यांची कसोटी मालिका आणि ५ सामन्यांची टी२० मालिका खेळली आहे. तसेच सध्या भारत आणि इंग्लंड संघात ३ सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंडने ६ विकेट्सने विजय मिळवला. इंग्लंडच्या या विजयात जॉनी बेअरस्टोने शतकी खेळी करत मोलाचा वाटा उचलला. तसेच या सामन्यानंतर त्याने सुनील गावसकरांनी केलेल्या टीकेला उत्तर दिले आहे.
झाले असे की कसोटी मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यात खेळताना बेअरस्टो ३ वेळा शुन्यावर बाद झाला होता. त्यावेळी गावसकरांनी बेअरस्टोबद्दल बोलताना म्हटले होते की त्याची खेळपट्टीवर उभी राहायची इच्छा दिसत नाही.
गावसकरांच्या या टीकेबद्दल बेअरस्टोला दुसऱ्या वनडे सामन्यानंतर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तो म्हणाला, ‘हो, पण ते फोन करुन मला कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करण्यात आणि त्याची मजा घेण्यास सांगू शकतात.’
तसेच तो म्हणाला, ‘सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जे त्यांनी म्हटले, त्याबद्दल मी काही ऐकलेले नाही. दुसरी गोष्ट, मला हे जाणून घेण्यात रस आहे की एक मत कसे बनवले जाऊ शकते, जेव्हा माझ्यात आणि गावसकरांमध्ये कोणताही संवाद झालेला नाही. तरीही जसे मी म्हणालो की माझा फोन सुरु आहे आणि जर त्यांना मला फोन करायचा असेल किंवा संदेश पाठवायचा असेल तर ते तसं करु शकतात.’
बेअरस्टोची भारताविरुद्ध वनडे मालिकेत शानदार कामगिरी
बेअरस्टोला भारताविरुद्ध कसोटी आणि टी२० मालिका गाजवता आली नसली तरी वनडे मालिकेदरम्यान त्याने शानदार कामगिरी केली आहे. त्याने पहिल्या वनडे सामन्यात ९४ धावांची खेळी केली होती. मात्र त्या सामन्यात अन्य फलंदाजांकडून हवी तशी साथ न मिळाल्याने इंग्लंडला पराभवाचा सामना करावा लागला होता.
मात्र, दुसऱ्या सामन्यात ३३७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या वरच्या फळीने मोठ्या धावा केल्या. यात बेअरस्टोने ११२ चेंडूत ११ चौकार आणि ७ षटकारांसह १२४ धावांची खेळी केली. त्यामुळे आत्तापर्यंत तो या वनडे मालिकेतील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.
अशी आहे बेअरस्टोची आंतरराष्ट्रीय कारकिर्द
यष्टीरक्षक फलंदाज असलेल्या बेअरस्टोने त्याच्या कारकिर्दीत ७४ कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ४१९७ धावा केल्या असून ६ शतके आणि २१ अर्धशतके केली आहेत. तसेच वनडेत त्याने ८५ सामन्यात ३४२५ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या ११ शतके आणि १४ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर त्याने ५१ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले असून यामध्ये त्याने १०५० धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
सचिन तेंडुलकरआधी ‘या’ क्रिकेटपटूंना झाला होता कोरोना, पाहा यादी
INDvENG: तिसऱ्या वनडेत ‘अशी’ असू शकते भारताची ‘प्लेइंग इलेव्हन’; दोघांना मिळू शकतो डच्चू
पुन्हा भारतीय संघात नाही दिसणार ‘हा’ फिरकीपटू, पुण्यात खेळला आपला अखेरचा सामना?