अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात शुक्रवारपासून (१२ मार्च) ५ सामन्यांची टी२० मालिका सुरु झाली आहे. आता या मालिकेतील दुसरा सामना रविवारी(१४ मार्च) खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतील पाचही सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर होणार आहेत. तसेच सर्व सामन्यांना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरुवात होणार आहे.
ही मालिका टी२० क्रमवारीतील अव्वल २ संघांमध्ये होत असल्याने मालिका रोमांचक होईल, अशी अनेकांना अपेक्षा आहे. पहिल्या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवत मालिकेची विजयी सुरुवात केली आहे. त्यामुळे आता दुसऱ्या सामन्यात भारतासमोर मालिकेत पुनरागमन करण्याचे तर इंग्लंडसमोर आघाडी टिकवण्याचे आव्हान असणार आहे.
रविवारी होणाऱ्या दुसऱ्या टी२० सामन्यात भारत आणि इंग्लंडच्या खेळाडूंना काही खास विक्रम करण्याची संधी आहे. या विक्रमांबद्दल या लेखातून जाणून घेऊ.
भारत-इंग्लंड संघातील दुसऱ्या टी२० सामन्यात होऊ शकतात हे विक्रम
१. विराट कोहलीने या सामन्यात ७२ धावा करताच तो आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये ३००० धावा करणारा पहिला फलंदाज बनेल. त्याने सध्या ८६ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात २९२८ धावा केल्या आहेत.
२. विराट कोहलीने या सामन्यात १७ धावा करताच तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून १२ हजार धावा पूर्ण करेल. हा टप्पा पार करणारा तो केवळ तिसरा कर्णधार ठरेल. त्याच्याआधी रिकी पाँटिंग (१५४४०) आणि ग्रॅमी स्मिथ (१४९७८) यांनीच असा कारनामा केला आहे.
३. रोहित शर्माला जर या सामन्यात अंतिम ११ जणांच्या संघात संधी मिळाली आणि त्याने या सामन्यात २६ किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर तो ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये ९००० धावा पूर्ण करेल. तसेच विराट कोहलीनंतर (९५००) असा कारनामा करणारा दुसराच भारतीय क्रिकेटपटू ठरेल. तर जगातील एकूण नववा क्रिकेटपटू ठरेल.
४. जॉनी बेअरस्टोने ४२ धावा करताच तो आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये १००० धावा पूर्ण करेल. असा कारनामा करणारा तो ५ वा इंग्लंडचा खेळाडू ठरेल.
५. डेविड मलानने या सामन्यात १२१ किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर तो आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये सर्वात जलद १००० धावा पूर्ण करणारा क्रिकेटपटू ठरेल. त्याच्या नावावर सध्या २० आंतरराष्ट्रीय टी२० डावात ८७९ धावा आहेत. तसेच सध्या आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये सर्वात जलद १००० धावा करण्याचा विक्रम बाबर आझमच्या नावावर आहे. आझमने २६ डावात १००० धावा पूर्ण केल्या होत्या.
६. ओएन मॉर्गनने या सामन्यात ९५ किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर तो आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या कर्णधारांच्या यादीत केन विलियम्सनला मागे टाकू शकतो. सध्या तो या यादीत १२८९ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्यापुढे ऍरॉन फिंच (१४६२) आणि केन विलियम्सन (१३८३) आहेत.
७. या सामन्यात खेळण्याची सुर्यकुमार यादवला जर संधी मिळाली तर तो आयपीएलमध्ये १०० सामने खेळल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण कऱणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरेल. त्याने १०१ आयपीएल सामने खेळले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
अंतिम सामन्यात मुंबईने दिली उत्तर प्रदेशला मात, पटकावले यंदाच्या विजय हजारे ट्रॉफीचे विजेतेपद
संपूर्ण यादी: मुंबईने चौथ्यांदा जिंकली विजय हजारे ट्रॉफी; पाहा आत्तापर्यंतचे विजेते आणि उपविजेते
IND vs SA : पूनम राऊतचे शतक व्यर्थ, चौथ्या सामन्यासह भारताने मालिकाही गमावली