भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यानच्या वनडे मालिकेला गहुंजे, पुणे येथे सुरुवात झाली. गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या एमसीए स्टेडियमवर मालिकेतील तिन्ही सामने खेळविले जातील. पहिल्या वनडे सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने आपला अप्रतिम फॉर्म कायम राखत, शानदार अर्धशतक झळकावले. यासोबतच तो एका खास यादीत समाविष्ट झाला.
मायदेशात सर्वाधिक धावा बनविणारा सहावा फलंदाज बनला विराट
भारतीय कर्णधार विराट कोहलीने टी२० मालिकेतील आपला शानदार फॉर्म कायम राखत पहिल्या वनडेमध्ये ५६ धावांची अप्रतिम खेळी केली. सर्वांना शतकाचे अपेक्षा असताना तो मार्क वूडच्या गोलंदाजीवर मोईन अलीच्या हाती झेल देऊन परतला. मात्र, यादरम्यान त्याच्या नावे एक खास विक्रम जमा झाला.
या अर्धशतकी खेळीदरम्यान त्याने मायदेशात तिन्ही प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मिळून १०,००० धावा बनविल्या. अशी कामगिरी करणारा तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील केवळ सहावा फलंदाज आहे. तर दुसराच भारतीय फलंदाज ठरला आहे.
मायदेशात सर्वाधिक धावा बनवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत भारताचा सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडूलकर अव्वलस्थानी आहे. त्याने आपल्या कारकीर्दीत १४,१९२ धावा ठोकल्या आहेत. सचिनपाठोपाठ ऑस्ट्रेलियाला दोन वेळा विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार रिकी पॉंटिंग दुसऱ्या स्थानी असून त्याने ऑस्ट्रेलियात खेळताना १३,११७ धावा बनविल्या होत्या.
दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज अष्टपैलू जॅक कॅलिस हा तिसऱ्या क्रमांकावर असून त्याने कारकिर्दी दरम्यान १२,३०५ धावा दक्षिण आफ्रिकेतील मैदानांवर काढल्या होत्या. चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर श्रीलंकेची दिग्गज दुकली कुमार संगकारा व माहेला जयवर्धने आहे. त्यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दी वेळी अनुक्रमे १२,०४३ व ११,६७९ धावा बनविल्या होत्या.
विराटच्या मायदेशात १७६ सामन्यातील १९५ डावात ६१.७४ च्या सरासरीने ३२ शतके आणि ४८ अर्धशतकांसह १०००२ धावा पूर्ण झाल्या आहेत.
सर्वात कमी डावात विराटच्या १० हजार धावा
विराटने मायदेशात सर्वात कमी डावात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण केल्या आहेत. यापूर्वी हा विक्रम रिकी पाँटिंगच्या नावावर होता. पाँटिंगने २१९ डावात मायदेशात १० हजार धावा पूर्ण केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
अभिमानास्पद! १७ वर्षीय शेफाली वर्मा आयसीसी फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानी
विक्रमवीर विराट! मायदेशात अशी कामगिरी करणारा बनला सचिननंतरचा दुसराच भारतीय
जिगरबाज रोहित! हातातून रक्त येत असतानाही नाही सोडले मैदान, पाहा व्हिडिओ