अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी (१४ मार्च) दुसरा टी२० सामना होत आहे. या सामन्यात भारताने ७ विकेट्सने विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने ५ सामन्यांच्या टी२० मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.
या सामन्यात इंग्लंडने भारताला १६५ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग भारताने १७.५ षटकात ३ विकेट्सच्या मोबदल्यात सहज पूर्ण केला. भारताकडून इशान किशन आणि विराट कोहलीने अनुक्रमे ५६ आणि नाबाद ७३ धावांची अर्धशतकी खेळी केली.
पहिल्या १० षटकातच ९० धावांचा टप्पा पार केल्यानंतर विराट आणि रिषभ पंतने पुढेही आक्रमक खेळ सुरु ठेवला. मात्र पंत १४ व्या षटकात ख्रिस जॉर्डनच्या गोंलंदाजीवर १३ चेंडूच २६ धावा करुन बाद झाला. मात्र विराटने नंतर श्रेयस अय्यरला साथीला घेत भारताला विजयापर्यंत पोहचवले. विराटने ४९ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारासह नाबाद ७३ धावा केल्या. तर अय्यर ८ धावांवर नाबाद राहिला.
इशान किशनचे अर्धशतक
या सामन्यात इंग्लंडने भारताला १६५ धावांचे आव्हान दिले आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला पहिला धक्का लवकर बसला. मात्र त्यानंतर विराट कोहली आणि इशान किशनने भारताचा डाव सावरला. दरम्यान इशानने अर्धशतकही पूर्ण केले.
भारताकडून इशान किशन आणि केएल राहुल सलामीला फलंदाजीसाठी उतरले. मात्र पहिल्याच षटकातील शेवटच्या चेंडूवर केएल राहुल शुन्य धावा करुन बाद झाला. त्याला सॅम करनने बाद केले. त्याचा झेल यष्टीरक्षक जॉस बटलरने पकडला. तो बाद झाल्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली इशानसह फलंदाजीसाठी आला.
या दोघांनी आक्रमक फलंदाजीसह जवळपास १० च्या धावगतीने धावा जमवल्या. दरम्यान २८ चेंडूत इशान किशनने अर्धशतक पूर्ण केले. मात्र अर्धशतक पूर्ण करताच तो १० व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर ५६ धावांवर आदिल राशिदच्या गोलंदाजीवर बाद झाला. हे त्याचे पहिलेच अर्धशतक ठरले विशेष म्हणजे त्याने या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. या खेळीत त्याने ५ चौकार आणि ४ षटकार मारले.
भारताने १० षटकात २ बाद ९४ धावा केल्या असून विराट ३५ धावांवर नाबाद खेळत आहे.
इंग्लंडचे भारताला १६५ धावांचे आव्हान
या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ बाद १६४ धावा केल्या. तसेच भारताला १६५ धावांचे आव्हान दिले आहे. इंग्लंडकडून जेसन रॉयने सर्वाधिक ४६ धावांची खेळी केली. तसेच भारताकडून वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूरने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
इंग्लंडला पहिल्या १० षटकात ८० धावांचा टप्पा पार करुन दिल्यानंतर जेसन रॉयला ४६ धावांवर १२ व्या षटकात वॉशिंग्टन सुंदरने बाद केले. त्यानंतर इंग्लंडने नियमित अंतराने पुढील विकेट्स गमावल्या. १४ व्या षटकात जॉनी बेअरस्टो २० धावा करुन सुंदरच्याच गोलंदाजीवर बाद झाला.
त्याच्यानंतर ओएन मॉर्गन आणि बेन स्टोक्सने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र या दोघांची २३ धावांची भागीदारी झाली असतानाच मॉर्गनला शार्दुल ठाकूरने १८ व्या षटकात २८ धावांवर बाद केले. त्यापोठापाठ शेवटच्या षटकात स्टोक्स ठाकूरच्या गोलंदाजीवर २४ धावांवर बाद झाला. त्यामुळे इंग्लंडला २० षटकात १६४ धावाच करता आल्या. अखेर सॅम करन ६ धावांवर नाबाद राहिला.
इंग्लंडने पहिल्या १० षटकात ८० धावांचा टप्पा पार
प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंड संघाकडून जेसन रॉय आणि जॉस बटलरने सलामीला फलंदाजीसाठी उतरले. यावेळी भारताकडून वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने बटलरला पहिल्याच षटकात बाद करत इंग्लंडला मोठा धक्का दिला. बटलर शुन्यावर बाद झाला. मात्र यानंतर जेसन रॉय आणि डेव्हिड मलानने इंग्लंडचा डाव सांभाळत अर्धशतकी भागीदारी रचली.
अखेर ९ व्या षटकात युजवेंद्र चहलने मलानला बाद करत ही भागीदारी तोडत भारताला दुसरे यश मिळवून दिले. मलान २४ धावा करुन बाद झाला. त्याने रॉयसह ६३ धावांची भागादारी केली. मलान बाद झाल्यानंतर जॉनी बेअरस्टो रॉयला साथ देण्यासाठी मैदानात उतरला.
पहिल्या १० षटकात इंग्लंडने २ बाद ८३ धावा केल्या. तसेच १० षटकात रॉय ४४ धावांवर आणि बेअरस्टो ५ धावांवर नाबाद आहे.
सुर्यकुमार आणि इशान किशनचे पदार्पण
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यातून भारताकडून २ खेळाडू पदार्पण करत आहे.
या सामन्यासाठी भारतीय संघाने अंतिम ११ जणांच्या संघात २ बदल केले आहेत. भारताकडून इशान किशन आणि सुर्यकुमार यादव हे दोघे पदार्पण करणार आहेत. या दोघांचेही हे आंतरराष्ट्रीय पदार्पण असणार आहे. इशान शिखर धवनच्या ऐवजी सलामीला फलंदाजी करेल. तर सुर्यकुमारला अक्षर पटेल ऐवजी संघात संधी मिळाली आहे.
तसेच इंग्लंडने ११ जणांच्या संघात १ बदल केला आहे. त्यांनी मार्क वूडच्या ऐवजी टॉम करनला संधी दिली आहे.
BIG DAY for @surya_14kumar & @ishankishan51 who are all set for their T20I debuts ????????
What a moment for these two ???????? #TeamIndia ????????????????#INDvENG @Paytm pic.twitter.com/cFVVxDgvIO
— BCCI (@BCCI) March 14, 2021
असे आहेत ११ जणांचे संघ
भारत – केएल राहुल, इशान किशन, विराट कोहली(कर्णधार), श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, रिषभ पंत(यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर.
इंग्लंड – जेसन रॉय, जोस बटलर (यष्टीरक्षक), डेव्हिड मालन, जॉनी बेयरस्टो, इयोन मॉर्गन (कर्णधार), बेन स्टोक्स, सॅम करन, जोफ्रा आर्चर, टॉम करन, ख्रिस जॉर्डन, आदिल राशिद.