अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात मंगळवारी (१६ मार्च) टी२० मालिकेतील तिसरा सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडने ८ विकेट्सने विजय मिळवला आहे. याबरोबरच ५ सामन्यांच्या टी२० मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे.
या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना कर्णधार विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडला १५७ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने १८.२ षटकात २ विकेट्सच्या मोबदल्यात १५८ धावा करत यशस्वी पूर्ण केल्या. इंग्लंडकडून सलामीवीर जोस बटलरने आक्रमक नाबाद अर्धशतकी खेळी केली.
पहिल्या १० षटकात ८० धावांचा टप्पा पार केल्यानंतर बटलरने जॉनी बेअरस्टोच्या साथीने इंग्लंडला विजय मिळवून दिला. या दोघांनी नाबाद ७७ धावांची भागादीरी केली. त्यामुळे इंग्लंडला सहज विजय मिळवता आला. या सामन्यात बटलरने ५२ चेंडूत ५ चौकार ४ षटकारांसह नाबाद ८३ धावा केल्या. तर बेअरस्टोने ५ चौकारांसह २८ चेंडून नाबाद ४० धावा केल्या.
इंग्लंडच्या पहिल्या १० षटकात ८३ धावा
इंग्लंडकडून जेसन रॉय आणि जोस बटलर हे सलामीला फलंदाजीसाठी आले. दोघांनीही चांगली सुरुवात केली होती. मात्र, रॉय चौथ्या षटकात युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर रोहित शर्मा करवी ९ धावांवर बाद झाला. यानंतर मात्र, बटलरने आक्रमक खेळ केला. त्याला डेव्हिड मलानने चांगली साथ दिली. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. दरम्यान, बटलरने २६ चेंडूत त्याच्या आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीतील ११ वे अर्धशतक पूर्ण केले.
बटलर आणि मलानची भागीदारी रंगत असताना वॉशिंग्टन सुंदरने मलानला १८ धावांवर १० व्या षटकात बाद करत त्यांची ५८ धावांची भागीदारी मोडली.
इंग्लंडने १० षटकात २ बाद ८३ धावा केल्या. जोस बटलर ५३ धावांवर आणि बेअरस्टो शुन्यावर नाबाद आहे.
विराटचे अर्धशतक
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ बाद १५६ धावा केल्या आहेत. भारताकडून कर्णधार विराट कोहलीने आक्रमक अर्धशतक झळकावले आहे. तर इंग्लंडकडून मार्क वूडने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
भारताच्या १६ षटकात केवळ १०० धावा झाल्या असताना अखेरच्या ४ षटकात कर्णधार कोहलीने आक्रमक पवित्रा स्विकारला. त्याने चौकार षटकारांची बरसात करताना हार्दिक पंड्यासह अखेरच्या ४ षटकात ५६ धावा वसूल केल्या. २० षटकांच्या अखेरील विराट ४६ चेंडूत ७७ धावांवर नाबाद राहिला. यात त्याच्या ८ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश आहे. तर हार्दिक पंड्या डावाच्या शेवटच्या चेंडूवर ख्रिस जॉर्डनविरुद्ध खेळताना झेलबाद झाला. त्याने १५ चेंडूत १७ धावा केल्या.
१६ षटकात भारताच्या १०० धावा
पहिल्या ६ षटकातच ३ विकेट्स गमावल्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि रिषभ पंतने भारताचा डाव सावरला होता. त्यामुळे त्यांची जोडी आता जमणार असे वाटत असतानाच १२ व्या षटकात पहिल्या चेंडूवर २ धावा घेतल्यानंतर तिसरी धाव घेण्यासाठी धावताना रिषभ पंत धावबाद झाला. तो २० चेंडूत २५ धावा करुन बाद झाला. त्यानंतर श्रेयस अय्यरने विराटची साथ देण्याचा प्रयत्न केला. मात्र तो १५ व्या षटकात मार्क वूडच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने ९ धावा केल्या तो बाद झाल्यानंतर हार्दिक पंड्या ७ व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला.
भारताने १६ षटकात ५ बाद १०० धावा केल्या आहेत. विराट कोहली ३९ धावांवर आणि हार्दिक पंड्या १ धावेवर खेळत आहे.
पहिल्या ६ षटकात ३ फलंदाज बाद
भारताकडून या सामन्यात केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी सलामीला फलंदाजी केली. मात्र, डावाच्या तिसऱ्याच षटकात केएल राहुल मार्क वूडच्या गोलंदाजीवर शुन्य धावेवर त्रिफळाचीत झाला. त्याच्यापाठोपाठ रोहित शर्मा वूडच्या गोलंदाजीवर ५ व्या षटकात बाद झाला. रोहितने १७ चेंडूत १५ धावा केल्या.
दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर भारताला तिसरा धक्काही लवकर बसला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला युवा फलंदाज इशान किशन ६ व्या षटकात ख्रिस जॉर्डनच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याचा झेल यष्टीरक्षक जॉस बटलरने पकडला.
त्यामुळे भारताच्या ६ षटकात ३ बाद २४ धावा झाल्या आहेत. सध्या विराट कोहली ४ धावांवर आणि रिषभ पंत शुन्य धावेवर नाबाद आहे.
रोहितचे पुनरागमन
या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी भारताच्या अंतिम ११ जणांच्या संघात रोहित शर्माचे पुनरागमन झाले आहे. त्यामुळे सुर्यकुमार यादवला बाहेर बसावे लागले आहे. रोहितला मागील २ सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली होती.
तसेच इंग्लंडच्या ११ जणांच्या संघातही १ बदल करण्यात आला आहे. टॉम करन ऐवजी मार्क वूडचे इंग्लंडच्या ११ जणांच्या संघात समावेश करण्यात आला आहे. हा सामना इंग्लंडचा कर्णधार ओएन मॉर्गनसाठी खास आहे. त्याचा हा कारकिर्दीतील १०० वा आंतरराष्ट्रीय टी२० सामना आहे.
England have won the toss and they are having a bowl first in the third #INDvENG T20I.
🇮🇳
IN: Rohit Sharma
OUT: Suryakumar Yadav🏴
IN: Mark Wood
OUT: Tom Curran pic.twitter.com/EXZ5TXB6Ls— ICC (@ICC) March 16, 2021
११ जणांचे संघ –
भारत – रोहित शर्मा, केएल राहुल, इशान किशन, विराट कोहली (कर्णधार), रिषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल.
इंग्लंड – जेसन रॉय, जोस बटलर (यष्टीरक्षक), डेव्हिड मालन, जॉनी बेअरस्टो, इयोन मॉर्गन (कर्णधार), बेन स्टोक्स, सॅम कुरन, ख्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वूड