भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ सध्या एकमेकांविरुद्ध कसोटी सामना खेळत आहेत. ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यातील हा एकमात्र कसोटी सामना गुरुवारपासून (21 डिसेंबर) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू झाला. पहिल्या डावात भारताने ऑस्ट्रेलियावर 187 धावांची आघाडी घेतली होती. यात चार भारतीय फलंदाजांच्या अर्धशतकांचा समावेश राहिला. तसेच दीप्ती शर्मा आणि पूजा वस्त्राकर या दोघींच्या नावावर एक खास विक्रम नोंदवला गेला.
मुंबई कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव आटोपला. 126.3 षटकात भारताने 406 धावा करून सर्व विकेट्स गमावल्या. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियन संघाचा पहिला डाव 77.4 षटकांमध्ये 219 धावांवर गुंडाळला गेला होता. भारतासाठी या सामन्यात स्मृती मंधाना (74), रिचा घोष (52), जेमिमाह रॉड्रिग्ज (73) आणि दीप्ती शर्मा (78) यांनी अर्धशतके केली. तसेच पूजा वस्त्राकर (47)आणि सलामीवीर शेफाली वर्मा (40) यांनीही महत्वाच्या धावा केल्या.
आठ किंवा त्यानंतरच्या विकेटसाठी सर्वोत्तम भागीदारी
फिनिशरच्या भूमिकेत पूजा वस्त्राकर (Pooja Vastrakar) आणि दीप्ती शर्मा (Deepti Sharma) यांनी महत्वाचे योगदान दिले. दोघांनी आठव्या विकेटसाठी 122 धावांची भागीदारी साकारली. भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासात कसोटी सामन्यात आठव्या विकेटसाठी किंवा त्यानंतरच्या क्रमांकावर खेळताना झालेली ही सर्वात मोठी भागीदारी ठरली. यापूर्वी हा विक्रम मिनोती देसाई आणि शुभांगी कुलकर्णी यांच्या नावावर होता. 1986 साली इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात त्यानी भारतीय संघाकडून आठव्या विकेटसाठी 106 धावांची भागीदारी पार पाडली होती.
उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर पहिल्या डावात मागे पडलेला ऑस्ट्रेलिया संघ तिसऱ्या दिवशी पुन्हा सुस्थितीत पोहोचला. तिसऱ्या दिवसाचे दुसरे सत्र संपल्यानंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 3 विकेट्सच्या नुकसानावर 128 धावा होती. (INDw vs AUSw Deepti Sharma and Pooja Vastrakar is India’s HIGHEST partnership for 8th or lower wicket in women’s Tests.)
दोन्ही संघांची प्लेइंग 11 –
भारत महिला: स्मृति मंधाना, शेफाली वर्मा, जेमिमा रोड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), ऋचा घोष, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, पूजा वस्त्राकर, रेणुका ठाकुर सिंह, राजेश्वरी गायकवाड.
ऑस्ट्रेलिया महिला: बेथ मूनी, फिबी लिचफील्ड, एलिस पेरी, ताहलिया मॅकग्राथ, एलिसा हिली (कर्णधार/यष्टीरक्षक), एनाबेल सदरलँड, एशले गार्डनर, जेस जोनासेन, अलाना किंग, किम गार्थ, लॉरेन चीटल.
महत्वाच्या बातम्या –
Video । शॉट असा मारा की, बॉल शोधायला प्रेक्षक गेले पाहिजेत, BBLमध्ये डी कॉकचा राडा; पाहा गगनचुंबी Six
‘तुम्ही सतत दाखवा…, भांडण फक्त मैदानावर’, विराटविषयी गंभीरचे मन जिंकणारे विधान; Video पाहून चाहतेही फिदा