वेस्ट इंडिज संघाने आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात दोन वेळेस जेतेपद मिळवले आहे. परंतु आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत या संघाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे. सलग २ पराभवांसह दिग्गज खेळाडूंचा वेस्ट इंडिज संघ गुणतालिकेत तळाशी आहे. वेस्ट इंडिज संघाचा पुढील सामना बांगलादेश संघाविरुद्ध होणार आहे. या सामन्यापूर्वी वेस्ट इंडिज संघात एक मोठा बदल करण्यात आला आहे.
शुक्रवारी (२९ ऑक्टोबर) वेस्ट इंडिज संघाचा पुढील सामना बांगलादेश संघाविरुद्ध रंगणार आहे. शारजाहाच्या मैदानावर पार पडणाऱ्या या सामन्यासाठी वेस्ट इंडिज संघात एक महत्वाचा बदल करण्यात आला आहे. दुखापतग्रस्त गोलंदाज ओबेड मॅक्कॉयच्या जागी अष्टपैलू खेळाडू जेसन होल्डरला संधी देण्यात आली आहे.
ओबेड मॅक्कॉय दुखापतीमुळे आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेतून बाहेर झाला आहे. ओबेड मॅक्कॉयने इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिज संघाचे प्रतिनिधित्व केले होते. परंतु दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात ओबेड मॅक्कॉयला संधी दिली गेली नव्हती. या दोन्ही सामन्यात वेस्ट इंडिज संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे, ज्यामुळे वेस्ट इंडिज संघाचे उपांत्य फेरी गाठणे आता कठीण झाले आहे.
वेस्ट इंडिज संघातील अष्टपैलू खेळाडू जेसन होल्डर हा राखीव खेळाडूंमध्ये होता. आता हाच खेळाडू मुख्य संघात खेळणार आहे. जेसन होल्डर गेल्या काही महिन्यांपासून यूएईमध्ये असून तो पूर्णपणे फिट आहे. क्रिकेट वेस्ट इंडिजचे निवडकर्ते रॉजर हार्पर यांनी म्हटले की, “तो एक अनुभवी खेळाडू आहे आणि त्याला चांगलच माहीत आहे की, मिळालेल्या संधीचा कसा लाभ घ्यायचा आहे.”
जेसन होल्डरने यूएईमध्ये पार पडलेल्या आयपीएल २०२१ स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद संघाचे प्रतिनिधीत्व करताना अप्रतिम कामगिरी केली होती. वेस्ट इंडिज संघाचे पुढील सामने बांगलादेश, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया या संघासोबत होणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तानी खेळाडू सराव सत्रातही क्रिकेट किटसोबत का घेऊन जातात राष्ट्रध्वज? कारण आहे अभिमानास्पद
बडे दिलवाला आझम..! न्यूझीलंडला चिडवणाऱ्या प्रेक्षकांना स्वत: केली शांत राहण्याची विनंती, होतंय कौतुक






