मुंबई । 13 ऑगस्ट रोजी संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय डावखुरा दिन साजरा केला जातो. उजव्या हातापेक्षा डाव्या हाताने काम करणारे लोक जगभरात कमी आहेत. म्हणूनच हा दिवस आंतरराष्ट्रीय डावखुरा दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली, जेणेकरून त्या लोकांना स्वतःचा अभिमान वाटेल. यानिमित्ताने आम्ही जगातील डावखुऱ्या क्रिकेटपटूंचा सार्वकालिन अकरा जणांचा वनडे संघ तयार केला आहे.
डावखुऱ्या क्रिकेटपटूंचा सार्वकालिन अकरा जणांचा वनडे संघ- (all Time left handed ODI XI)
सौरभ गांगुली, भारत (कर्णधार)
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्या नावावर जागतिक क्रिकेटमध्ये अनेक विक्रम आहेत. आपल्या कारकिर्दीमध्ये डावपेच आखाण्यामध्ये सौरवची वेगळी ओळख होती. त्यामुळे डावखुऱ्या संघाचे नेतृत्व गांगुलीकडे देण्यात आले. 311 वनडे सामने खेळणार्या गांगुलीने 11363 धावा केल्या असून त्यामध्ये 22 शतकांचा समावेश आहे. सलामीची तसेच कर्णधारपदाची जबाबदारीही त्याने अनेकदा त्याच्या कारकिर्दीत उत्तमरित्या पार पाडली आहे.
सनथ जयसूर्या, (श्रीलंका)
आपल्या कार्यकीर्दीत एक स्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जाणारा सनत जयसुर्यावर या संघाची सलामीची जबाबदारी दिली आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीत एकूण 445 वनडे सामने खेळले ज्यात 28 शतकांचा समावेश आहे. त्याने 13 हजार 430 धावा केल्या आहेत. याचसोबत त्याने 323 बळी देखील टिपले आहेत.
ब्रायन लारा (वेस्टइंडीज)
वेस्ट इंडीजचा माजी कर्णधार ब्रायन लाराने आपल्या क्रिकेट कारकीर्दीमध्ये 299 वनडेत 10405 धावांची नोंद आहे. यात 19 शतकांचा समावेश आहे. त्याला या संघात ‘वनडाऊन’ अर्थात तिसऱ्या क्रमांकाची जबाबदारी देण्यात आली आहे.
कुमार संगाकारा (श्रीलंका)
श्रीलंकेचा माजी यष्टीरक्षक फलंदाज कुमार संगकाराने आपल्या कारकीर्दीत वनडे क्रिकेटमध्ये 14 हजार 234 धावा केल्या आहेत. यात 25 शतकांचा समावेश आहे. या संघ त्याला चौथ्या क्रमांकावर स्थान देण्यात आले आहे.
युवराज सिंग (भारत)
‘सिक्सर किंग’ या नावाने ओळखला जाणारा भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगचा अष्टपैलू म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. त्याने आपल्या कारकीर्दीत 304 वनडे सामन्यांत प्रतिनिधित्व केले. त्याच्या नावावर 14 शतकांसह 8 हजार 701 धावांची नोंद आहे. यासोबत त्याने गोलंदाजीमध्ये 111 बळी घेतले आहेत. 38 वर्षीय युवराज 2007 च्या टी -20 विश्वचषक आणि 2011 विश्वचषकामध्ये भारताला विजेतेपद पटकावून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. जून 2019 मध्ये त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
माइकल बेव्हन (ऑस्ट्रेलिया)
जागतिक क्रिकेटमधला बेस्ट फिनिशर म्हणून मायकल बेवनची ओळख होती. तो ऑस्ट्रेलिया संघाकडून मधल्या फळीत खेळत होता. मायकलने 232 वनडे सामन्यात 6912 धावा केल्या आहेत. वनडे क्रिकेटमध्ये त्याने सहा दमदार शतके ठोकली आहेत.
ऍडम गिलक्रिस्ट,(ऑस्ट्रेलिया)
या संघात यष्टीरक्षणाची जबाबदारी ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू ऍडम गिलख्रिस्टवर सोपवण्यात आली आहे. वास्तविक पाहता तो ऑस्ट्रेलिया संघात सलामीला खेळायचा. मात्र सलामीची जबाबदारी सनत जयसूर्या आणि सौरव गांगुलीवर सोपवण्यात आली असल्याने गिलख्रिस्टला सातव्या क्रमांकावर स्थान देण्यात आले आहे. त्याने 287 वनडे सामन्यात 9619 धावा काढल्या आहेत. यात 16 शतकांची नोंद आहे. एक स्फोटक फलंदाज म्हणून त्याने क्रिकेट कारकिर्दीत नाव कमविले आहे. तसेच यष्टीमागे त्याने ४७२ विकेट्स घेतल्या आहेत.
शाकिब अल हसन (बांग्लादेश)
बांगलादेशचा स्टार अष्टपैलू खेळाडू शाकीब अल हसनने आपल्या कामगिरीच्या जोरावर बांगलादेशला एकहाती सामने जिंकून दिले आहेत. त्याने आपल्या कारकिर्दीत 206 वनडे सामने खेळले आहेत. यात त्याने 9 शतके ठोकली आहेत. यासोबत त्याच्या नावावर 6323 धावांची नोंद आहे. त्याचबरोबर त्याने 260 फलंदाजांना त्याने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे.
वसीम अक्रम (पाकिस्तान)
पाकिस्तानच्या या दिग्गज खेळाडूच्या नावावर अनेक अविश्वसनीय विक्रमांची नोंद आहे. तो वनडेत सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे. अक्रमने 356 वनडे सामने खेळून एकूण 502 बळी घेतले. अक्रम रिव्हर स्विंगसाठी प्रसिद्ध होता. त्याच्याच नेतृत्वाखाली पाकिस्तानचा संघाने 1999 साली झालेल्या विश्वचषकात अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती.
डॅनियल व्हेटोरी (न्यूझीलंड)
न्यूझीलंडच्या या फिरकी गोलंदाजाने आपल्या कारकिर्दीतील बहुतांश सामने वेगवान खेळपट्टय़ांवर खेळला आहे. तरीही त्याने आपल्या फिरकीच्या जोरावर प्रभावी गोलंदाजी केली. त्याने आपल्या कार्यकीर्दीत 295 वनडे सामन्यात 305 फलंदाजांना बाद केले.
झहीर खान (भारत)
2011च्या वनडे विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा सदस्य असलेल्या झहीर खानने आपल्या कारकीर्दीत 200 वनडे सामने खेळले. त्याच्या नावावर 282 बळी आहेत. या संघामध्ये झहीर अक्रमबरोबर दुसर्या टोकाकडून गोलंदाजीची जबाबदारी घेऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
बरोबर ३० वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा
…आणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली
ट्रेंडिंग लेख –
…आणि त्या दिवशी १०० शतकांचा पाया रचला गेला
क्रिकेटला रामराम केल्यावर मॅनेजमेंटची डिग्री घेऊन अमेरिकन एक्सप्रेससाठी काम करणारा क्रिकेटर