पुणे । आयोजन स्कूल ऑफ आर्किटेक्चर (असद) संघाने आर्किटेक्चर महाविद्यालयाच्या आंतरमहाविद्यालयीन शिअरफोर्स क्रीडा स्पर्धेतील फुटबॉलचे विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत असद संघाने आकुर्डीच्या डी. वाय. पाटील कॉलेज संघावर मात केली. विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या वतीने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
ही स्पर्धा वानवडी येथील एसआरपीएफच्या मैदानावर झाली. या स्पर्धेतील मुलांच्या गटाच्या अंतिम सामन्यात असद संघाने डी. वाय. पाटील संघावर ३-०ने मात केली. ही लढत एकतर्फीच झाली. यात पाचव्याच मिनिटाला शांतनूू भोसलेने गोल करून असदला आघाडी मिळवून दिली. यानंतर लढतीच्या २३व्या मिनिटाला प्रद्युम्न खंदाडेने गोल करून असदची आघाडी २-०ने वाढवली. नंतर ३३व्या मिनिटाला परीक्षित ढोलेने करून असदला ३-०ने विजय मिळवून दिला.
व्हॉलिबॉलमध्ये असद संघाचा विजय
व्हॉलिबॉल स्पर्धेतील मुलांच्या गटात असद संघाने डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (पीव्हीपीसीओए) संघावर २५-२०, १०-२५, १५-१० अशी मात केली आणि विजेतेपद मिळवले. असद संघाकडून शांतनू इनामतीने विजयात मोलाचा वाटा उचलला. मुलींच्या गटात पीव्हीपीसीओए संघाने बीएनसीए संघावर २५-१९, २५-१६ अशी मात करून विजेतेपद मिळवला. यात पीव्हीपीसीओएच्या इशिता सुरतवालाने सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान मिळवला.
बास्केटबॉल स्पर्धेत पीव्हीपीसीओए संघाचा विजय
बास्केटबॉल स्पर्धेतील मुलींच्या गटात मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (एमएमसीओए) संघाने बाजी मारली. अंतिम लढतीत एमएमसीओए संघाने पीव्हीपीसीओए संघावर ३१-२८ अशी मात केली. एमएमसीओए संघाकडून दुर्गा धर्माधिकारीने (१३), तर पीव्हीपीसीओए संघाकडून ऋजुता चौहान (५), हर्षदा पवार (४) यांनी चमक दाखवली. मुलांच्या गटात पीव्हीपीसीओए संघाने अनंतराव पवार कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (एपीसीओए) संघावर ३३-२२ अशी ११ गुणांनी मात केली. यात मध्यंतराला पीव्हीपीसीओए संघ १२-१३ असा एका गुणाने पिछाडीवर होता. पीव्हीपीसीओए संघाकडून सुजय चौधरी (४) आणि आदर्श यादव (८) यांनी विजयात मोलाचा वाटा उचलला. एपीसीओए संघाकडून निखिल नाईकची (९) लढत एकाकी ठरली.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण जयंत केळकर, विनय मुरगोड, कहान दांडेकर, प्राचार्य प्रसन्न देसाई, सचिव जितेंद्र पितळिया यांच्या हस्ते झाले. समर जोशी, ऋजुता चौहान, मयुरू भंडारी, दर्शिल शाह, मेहूल अग्रवाल, उर्वी करमकर, क्रीडा सचिव प्रांजल पितळीया, आदित्य भोळे, कनिका अग्रवाल, आदर्श यादव या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.