भारतात आता क्रिकेटप्रमाणेच कबड्डी खेळही चांगलाच लोकप्रिय होऊ लागला आहे. यात कबड्डी खेळाडूंबरोबरच प्रशिक्षक यांचाही मोठा वाटा आहे.
पण त्याचबरोबर प्रत्येक सामना हा सहज आणि खिलाडूवृत्तीने खेळला जावा यासाठी प्रयत्न करणाऱ्या कबड्डी पंचांचाही तेवढाच महत्त्वाचा वाटा आहे.
असेच प्रो-कबड्डीत कडक आणि शिस्तप्रिय पंच म्हणून नावारुपाला आलेले मुंबईचे जितेश शिरवाडकर यांचा आज वाढदिवस. यानिमित्त त्यांच्या घेतलेल्या मुलाखतीचा हा खास भाग…
प्रो-कबड्डीच्या पहिल्या मोसमापासून शिरवाडकर हे पंच म्हणून भूमिका निभावतात. त्यांची प्रो कबड्डी 2015 च्या मोसमातील सर्वोत्तम पंच म्हणून निवडही करण्यात आली होती.
पण पंच म्हणून कारकिर्दीची सुरुवात कशी झाली याबद्दल सांगताना ते म्हणाले, “मला वाटले होते की मी या क्षेत्रात कारकिर्द घडवू शकतो. त्यामुळे मी राज्य पंच परिक्षाही दिली. त्यानंतर मी पंच झालो तेव्हा सुरुवातीला अडथळे आले होते. परंतू त्यावर मी मात केली. मी त्यासाठी खुप कष्ट घेतले होते.”
तसेच त्यांनी दुबई मास्टर्स स्पर्धेमुळे त्यांचे आंतरराष्ट्रीय दौरा करण्याचे स्वप्नही पूर्ण झाल्याचे सांगितले. हे सांगताना ते म्हणाले, “मी ठरवले होते की एकदातरी आंतरराष्ट्रीय दौरा करायचा आणि माझे हे स्वप्न दुबई मास्टर्स स्पर्धेत साकार झाले.”
तसेच कबड्डी पंच म्हणून मला मोठे करण्यात मुंबई कबड्डी असोशिएशनचे सचिव विश्वास मोरे यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या मदतीमुळे मी पंच म्हणून कारकिर्द घडवू शकलो. असेही त्यांनी सांगितले.
दुबई मास्टर्स सारख्या स्पर्धेत पंच म्हणून काम करणाऱ्या शिरवाडकरांनी विश्वचषक 2016 च्या स्पर्धेतही पंच म्हणून काम केले आहे.
अशा दोन महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये पंच म्हणून काम करणाऱ्या शिरवाडकरांना याआधी कबड्डी हा खेळ कोणत्या स्तरावर खेळला होता का, असे विचारल्यावर त्यांनी सांगितले, “तशी कबड्डी मी कधी खेळलो नाही. मी असा पंच आहे जो कधी राष्ट्रीय किंवा जिल्हास्तरावरही कधी खेळलो नाही. तरीही मी आत्ता या स्तरावर आहे.”
मुंबईमधील प्रभादेवीच्या कामगार भागात रहाणाऱ्या शिरवाडकरांनी पंच म्हणून कारकिर्दीला सुरवात करण्याआधीची आठवण सांगताना सांगितले की, “प्रभादेवीला आमचा एक कबड्डी संघ होता पण ते तेवढ्यापुरतेच. तेवढेच मी कबड्डी खेळलो. पण नंतर कबड्डीत आवड निर्माण झाली. त्यामुळे मी या क्षेत्राकडे वळालो आणि मला आत्मविश्वास होता की मी यात नक्कीच कारकिर्द घडवू शकतो. ”
तसेच आता मी अव्वल पंचांच्या यादीतही आहे हे सांगताना पुढे शिरवाडकर म्हणाले, “आता हीच माझी कारकिर्द आहे. माझी खाजगी नोकरीही गेल्याने मी आता कबड्डीपंच म्हणूनच पूर्णवेळ काम करेल.”
पुढे ते प्रो-कबड्डीच्या अनुभवाबद्दल सांगताना म्हणाले, “प्रो-कबड्डीमध्ये सुरवातीपासूनच दिग्गज पंच होते. त्यांच्यामधून मला दुसऱ्या मोसमासाठी सर्वोत्तम पंच म्हणून पुरस्कारही मिळाला. दिग्गज पंच असातानाही मला तो पुरस्कार मिळाला होता त्याचा आनंद आहे. म्हणजे पहिला पुरस्कार होता तो मला मिळाला आहे.”
“तूम्ही सर्वजण तर टीव्हीवर परफॉर्मन्स पाहतच असता, त्यामुळे आणखी काही सांगायची तशी गरज नाही. मी यासाठी खूप मेहनत घेतली होती. ”
याबरोबरच त्यांनी आपणच आपले हीरो असतो असे सांगताना त्यांचा असा कोणी आवडता खेळाडू कोणी नाही असे सांगितले. ते म्हणाले, “आपले क्षेत्र वेगळे आहे आणि त्यांचे वेगळे आहे. त्यामुळे माझा कोणी लाडका खेळाडू नसतो. आपणच आपले हीरो असतो.”
“सध्या सर्वच खेळाडू चांगले आहेत. मग यात मोनु गोयत आहे, परदिप नरवाल, फझल अत्रचली आहे. असे सर्वच चांगले खेळाडू आहेत आणि माझ्यासाठी सर्व खेळाडू सारखे आहेत.”
याबरोबरच शिरवाडकर यांनी पंच म्हणून कारकिर्द घडवू पहाणाऱ्यांसाठी कष्टाशिवाय पर्याय नाही असा मोलाचा सल्लाही दिला आहे. ते म्हणाले, “या क्षेत्रात त्यांच्यासाठी खूप काही करण्यासारखे आहे. त्यांनी स्वत:ला फिट ठेवले पाहिजे. फिटनेस नेहमीच महत्त्वाचा आहे.”
“तसेच आपल्याला व्यवस्थित ठेवण्यासाठी थोडा खर्चही करावा लागतो. त्यानुसार थोडे स्वत:ला थोडे मेंटेनही ठेवता आले पाहिजे. त्याचबरोबर यात मेहनतही आहे. कष्ट घेतल्याशिवाय काही मिळत नाही. तसेच यात आता चांगली संधीही आहे आणि कबड्डी आता पुढे चालूच राहणार आहे त्यामुळे यात स्कोपही खूप आहे आणि भविष्यातही चांगल्या संधी आहेत.”
कबड्डीमधील ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा कबड्डीसाठीचे देशातील सर्वात लोकप्रिय आणि नंबर १चे वेबपोर्टल महा स्पोर्ट्स. तसेच आम्हाला फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर फाॅलो करायला विसरु नका.
महत्त्वाच्या बातम्या:
–मुंबई शहराचे कबड्डी पंच शिबीर यशस्वी
–टीम इंडियात लवकरच पदार्पण करणार नवा रोहित शर्मा!