भारतीय संघाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग हा त्याच्या विस्फोटक खेळासाठी ओळखला जायचा. त्याने त्याच्या कारकीर्दीत भल्याभल्या वेगवान गोलंदाजांविरुद्ध बॅटमधून आग ओकली आहे. तसेच, अनेक विक्रमांचे मनोरेही रचले आहेत. क्रिकेटमधून निवृत्त झाला असला, तरीही तो या ना त्या कारणामुळे चर्चेत असतोच असतो. तो सातत्याने क्रिकेटविषयी काही ना काही वक्तव्य करतो. अशात तो पुन्हा एकदा एका वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. ते वक्तव्य त्याने पाकिस्तानचा माजी फलंदाज इंझमाम उल हक याच्याविषयी केले आहे.
वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) याने एका मुलाखतीत याविषयी भाष्य केले. तो म्हणाला की, “प्रत्येक जण सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्याविषयी बोलतो, पण मी इंझमाम उल हक याला आशियातील मधल्या फळीचा सर्वोत्तम फलंदाज मानतो. इंजी भाई खूप चांगला होता. सचिन तेंडुलकर तर फलंदाजांच्या यादीच्याही वर होता. त्याला तर आपण मोजूच शकत नाही. मात्र, आशियामध्ये मी इंझमामपेक्षा चांगला फलंदाज पाहिला नाही.”
‘इंझमाम जवळपास 8च्या सरासरीने धावा करून शांत राहायचा’
पुढे बोलताना सेहवाग म्हणाला की, “2003-04मध्ये जेव्हा प्रति षटक 8 धावा करणे कठीण मानले जायचे, त्या काळात तो म्हणायचा की, चिंता नको करू, आरामात करूया. 10 षटकात 80 धावा करण्यात कोणताही संघ घाबरायचा, पण त्या काळात इंझमाम जवळपास 8च्या सरासरीने धावा करत शांत राहायचा. तो म्हणायचा की, बनतील, चिंता नको करू.”
इंझमाम उल हक (Inzamam ul Haq) पाकिस्तानचा आतापर्यंतच्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. त्याने पाकिस्तानकडून 1991 ते 2007 यादरम्यान 120 कसोटी सामने, 378 वनडे सामने आणि 1 आंतरराष्ट्रीय टी20 सामना खेळला. तो 1992मध्ये पाकिस्तानच्या विश्वचषक विजेत्या संघाचाही भाग होता.
पीसीबीच्या डेटावर आधारित निवडीने इंझमाम नाखुश
नुकतेच इंझमामने पाकिस्तान क्रिकेट बोर्ड म्हणजेच पीसीबीच्या डेटावर आधारित निवडीवर नाराजी व्यक्त केली होती. तो म्हणाला होता की, “नवीन निवड समितीबाबत मला शंका आहे आणि क्रिकेट जगतातील अनेक लोकांनाही असंच वाटतं. जर त्यांना त्या क्रिकेटपटूंना सामील केले असते, जे मैदानात जाऊन प्रदर्शन करतात, तर हे चांगले झाले असते.”
‘डेटा-आधारित निवडीविषयी कधीच ऐकलं नाही’
पुढे बोलताना तो असेही म्हणाला की, “मी डेटा-आधारित निवडीविषयी कधीच ऐकलं नाही आणि हे कुठेही शक्य नाहीये. निवड मैदानात प्रदर्शनाच्या आधारे केली पाहिजे. माझ्याकडे क्रिकेटचे जे काही ज्ञान आहे, मला वाटत नाही की, हा एक चांगला निर्णय आहे.”
मागील महिन्यात पीसीबीने घोषित केलेल्या निवड समितीत मुख्य निवडकर्ता हारून रशीद, संघ संचालक मिकी आर्थर, मुख्य प्रशिक्षक ग्रांट ब्रॅडबर्न आणि हसन चीमा यांचा समावेश आहे. (inzamam ul haq was biggest middle order batter in asia says indian former cricketer virender sehwag)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जगातील सर्वात जुन्या फुटबॉल स्पर्धेत मॅनचेस्टर सिटीचा दणदणीत विजय, फायनलला विराट-अनुष्कासह गिलही हजर
लॉर्ड्स कसोटी । यजमान इंग्लंडकडून आयर्लंड पराभूत, तिसऱ्याच दिवशी सामना निकाली