आयपीएल २०२० ची तयारी जोरात सुरू आहे. सर्व संघ आपल्या संघातील खेळाडूंना तंदुरुस्त ठेवण्यासाठी जोरदार सराव करून घेत आहेत. कोरोना विषाणूमुळे पुढे ढकलण्यात आलेले हा आयपीएलचा हंगाम भारताऐवजी युएईमध्ये हलविण्यात आला.
गेल्या हंगामातील मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपर किंग्ज संघात या १३ व्या मोसमातील पहिली लढत १९ सप्टेंबरला होईल आणि स्पर्धेलाही सुरुवात होईल. आता आयपीएल सुरू होण्यास काही दिवस बाकी आहेत.
सध्या फक्त आयपीएलची चर्चा सर्वत्र रंगत आहे. कोणता संघ जिंकेल? कोणते संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरतील? असे बरेच प्रश्न. तर आयपीएल सुरू होण्यापूर्वी संपूर्ण आयपीएल संघाचे “सपोर्टिंग स्टाफ” तपशील जाणून घ्या .
आयपीएलच्या सर्व संघांचा सपोर्टिंग स्टाफ
१. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी मुंबई इंडियन्सच्या संघाने आतापर्यंत ४ वेळा आयपीएल चषक जिंकला आहे. संघाचा कर्णधार रोहित शर्माने २०१३, २०१५, २०१७ आणि २०१९ मध्ये संघाला जेतेपद मिळवून दिले आहे.
मुंबई संघातील खेळाडूंसह टीम मॅनेजमेंट मजबूत आहे. आता आयपीएल २०२० मध्ये, संघाचा मुख्य प्रशिक्षक श्रीलंकेचा महान खेळाडू महेला जयवर्धने आहे. या अनुभवी खेळाडूला २०१८ मध्ये संघाच्या प्रशिक्षणाची जबाबदारी देण्यात आली आहे.
त्याचबरोबर सपोर्टिंग स्टाफमध्ये फलंदाजी मार्गदर्शक म्हणून ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकर, फलंदाजी प्रशिक्षक रॉबिन सिंग, गोलंदाज प्रशिक्षक शेन बॉन्ड, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक जेम्स पलमंत अशी नावे आहेत. याशिवाय संघाचे फिजिओ नितीन पटेल आहेत. मुंबई इंडियन्स आपला पहिला सामना १९ सप्टेंबरला चेन्नई सुपर किंग्ज बरोबर खेळणार आहे.
२. चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings)
एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्ज हा संघ आयपीएलमध्ये सर्वाधिक चषक जिंकणारा दुसरा संघ आहे. एमएस आणि त्याच्या संघाने ३ वेळा आयपीएल विजेतेपदाचा आनंद साजरा केला आहे. तसेच सीएसके हा एकमेव संघ आहे ज्याने आयपीएलमध्ये भाग घेतलेल्या सर्व हंगामात प्ले ऑफमध्ये धडक मारली होती. तसेच या संघाने ८ वेळा अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.
चेन्नई संघात फारसा बदल झाला नाही. संघाचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग हे सुरुवातीपासूनच संघाशी जोडलेले होते आणि ते २००९ पासून संघाचे प्रशिक्षक आहेत.
आयपीएल २०२० मधील चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या सपोर्टिंग स्टाफमध्ये फलंदाजीचे प्रशिक्षक म्हणून मायकेल हसी, गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी, गोलंदाजी मार्गदर्शक आयरिस सिमन्स, फिजिकल प्रशिक्षक ग्रेग किंग आहेत. या टीमचे फिजिओ टॉमी सिमसेक आहे. चेन्नई संघ आपला पहिला सामना १९ सप्टेंबर रोजी गतविजेता मुंबई इंडियन्सशी खेळणार आहे.
३. कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders)
शाहरुख खानच्या मालकीच्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने आतापर्यंत २ वेळा आयपीएल चषक जिंकला आहे. २०१२ आणि २०१४ मध्ये गौतम गंभीरच्या नेतृत्वात संघाने ही स्पर्धा जिंकली.
कोलकाता नाइट रायडर्सचे मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम आहे. मॅक्युलमबरोबरच सहाय्यक प्रशिक्षकपदी भारताचा अभिषेक नायर याचा समावेश आहे.
मार्गदर्शक म्हणून डेव्हिड हसी, गोलंदाजी प्रशिक्षक कायली मिल्स, सहाय्यक गोलंदाजी प्रशिक्षक ओमकार साळवी, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक जेम्स फॉस्टर, फिजिओथेरपिस्ट कमलेश जैन, स्ट्रेंथ आणि कंडीशनिंग प्रशिक्षक ख्रिस डोनाल्डसन हे संघाचे मार्गदर्शक आहेत. कोलकाता नाईट रायडर्स आपला पहिला सामना २३ सप्टेंबर रोजी मागील विजेता मुंबई इंडियन्सशी होणार आहे.
४. राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals)
आयपीएलच्या पहिल्या सत्रात म्हणजेच आयपीएल २००८ मध्ये राजस्थान रॉयल्सच्या संघाने शेन वॉर्नच्या नेतृत्वात पहिले आणि एकमेव विजेतेपद जिंकले. यंदा राजस्थान संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ असेल. संघाने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात २०१८ मध्ये प्ले ऑफसाठी पात्रता दर्शविली होती.
राजस्थान रॉयल्स संघाने संचालक झुबिन भारुचा, मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ट, फलंदाजी प्रशिक्षक अमोल मझुमदार, फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक सिराज बाहुले, फिरकी गोलंदाजी सल्लागार आणि ऑपरेशन एक्सक्लूसिव ईश सोढी, वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक रॉब कॅसल, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक दिशांत याग्निक, युवा क्रिकेट सल्लागार लिसा स्थळेकर यांची नियुक्त केली आहे.
तसेच संघाचे फिजिओथेरपिस्ट जॉन ग्लोस्टर, सहायक फिजिओथेरपिस्ट अनुजा दळवी पंडित आहेत. राजस्थान संघ आपला पहिला सामना २२ सप्टेंबरला चेन्नई सुपर किंग्ज बरोबर खेळणार आहे.
५. सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad)
सनरायझर्स हैदराबाद संघाने २०१६ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा पराभव करून आपले पहिले आणि एकमेव आयपीएल विजेतेपद जिंकले. आता पुन्हा एकदा आयपीएल २०२० मध्ये संघाची कमान डेव्हिड वॉर्नरकडे असेल. वॉर्नरच्याच नेतृत्वात २०१६ मध्ये संघाला विजेतेपद मिळाले होते.
संघाच्या सपोर्टिंग स्टाफमध्ये संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून संघाने इंग्लंडच्या ट्रेव्हर बेलिस या प्रशिक्षकाची नियुक्ती केली असून त्याने इंग्लंडला पहिले वनडे विश्वचषकाचे विजेतेपद जिंकून दिले होते.
त्याशिवाय हैदराबाद संघात सहाय्यक प्रशिक्षक ब्रॅड हॅडिन, गोलंदाजी प्रशिक्षक मुथय्या मुरलीधरन, मार्गदर्शक म्हणून व्हीव्हीएस लक्ष्मण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक बिजू जॉर्ज, फिजिओथेरपिस्ट थियोओ कपकोलाकीस आहेत. आयपीएल २०२० मध्ये हैदराबाद संघ २१ सप्टेंबर रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध पहिला सामना खेळताना दिसणार आहे.
६. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore)
दिग्गज खेळाडूंनी भरलेला आयपीएल संघ रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी यंदाचा हंगाम खूप महत्वाचा असेल. खरं तर, या हंगामात आरसीबी संघ पूर्वीपेक्षा अधिक संतुलित आणि मजबूत दिसत आहे.
विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला आतापर्यंत आयपीएलचे जेतेपद मिळवता आले नाही. त्यानंतर आता आयपीएल २०२० मध्ये या संघाच्या संघ व्यवस्थापनात बरेच बदल झाले आहेत. संघाचे मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी यंदाच्या हंगामात सायमन कॅटिचला देण्यात आली आहे.
संघाचे क्रिकेट प्रमुख माईक हेसन आहेत तर गोलंदाजी प्रशिक्षक अॅडम ग्रिफिथ, फलंदाजी व फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक श्रीधरन श्रीराम, स्ट्रेंथ व कंडीशनिंग प्रशिक्षक शंकर बसू, फिजिओथेरपिस्ट इव्हन स्पीचली आहेत. आरसीबी आपला पहिला सामना २१ सप्टेंबर रोजी सनरायझर्स हैदराबादशी खेळेल.
७. किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab)
किंग्ज इलेव्हन पंजाबने आयपीएल २०२० मध्ये संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी केएल राहुल याच्याकडे सोपविली आहे. आतापर्यंत जेतेपदापासून वंचित राहिलेल्या पंजाब संघाच्या चाहत्यांना यावेळी कर्णधार केएल राहुलकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाने आयपीएल २०२०साठी भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी खेळाडू अनिल कुंबळे याची मुख्य प्रशिक्षक आणि संघाचे संचालक म्हणून निवड केली आहे.
गोलंदाजी प्रशिक्षक चार्ल लँगवेल्ड, फलंदाजी प्रशिक्षक वसीफ जाफर, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक जॉन्टी रोड्स, टीम फिजिओ अँड्र्यू लिपस आहेत. या हंगामात पंजाबचा संघ आपला पहिला सामना २० सप्टेंबरला दिल्ली कॅपिटलशी खेळणार आहे.
८. दिल्ली कॅपिटल (Delhi Capital)
युवा कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात गेल्या आयपीएलच्या हंगामात दिल्ली कॅपिटल संघाने ७ वर्षानंतर प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवला. २०१८ मध्ये दिल्ली कॅपिटलमध्ये रिकी पॉन्टिंगला मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली होती आणि त्यानंतर संघाच्या कामगिरीमध्ये बरेच फरक दिसून आले.
आयपीएल २०२० मध्ये संघाचे मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग असेल. त्यांच्यासमवेत सहायक प्रशिक्षक मोहम्मद कैफ, फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक सॅम्युअल बद्री, वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक रायन हॅरिस, फिजिओथेरपिस्ट पॅट्रिक फरहार्ट, सहाय्यक फिजिओथेरपिस्ट धनंजय कौशिक, स्ट्रेंथ व कंडिशनिंग प्रशिक्षक रजनीकांत शिवनगन्नम यांची निवड करण्यात आली आहे.
आयपीएल २०२० मध्ये दिल्ली कॅपिटल संघ जिंकण्याची बरीच शक्यता आहे. प्रथम, संघ पूर्णपणे संतुलित आहे आणि दुसरे म्हणजे, रिकी पॉन्टिंगच्या प्रशिक्षणाखाली संघ सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. अशा परिस्थितीत जर अय्यरने या हंगामात आपल्या संघाला जेतेपद मिळवून दिले तर दिल्ली चाहत्यांसाठी ही मोठी बातमी असू शकते. दिल्ली संघाचा पहिला सामना २० सप्टेंबरला किंग्ज इलेव्हन पंजाब सोबत असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
हिटमॅनला गोलंदाजीचे धडे देताना पाहिलंय का? पाहा व्हिडिओ
लाडकी लेक थांबलीय वडील धोनीचा स्केच घेऊन, सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल
खुशखबर: कोरोनावर मात करून ‘हा’ खेळाडू झाला सीएसकेच्या ताफ्यात दाखल
ट्रेंडिंग लेख –
दोन वेळा स्वप्न भंगल्यानंतर तिसऱ्या वेळी इंग्लंडला विश्वचषकाची भेट देणाऱ्या ‘आयरिश क्रिकेटरची’ गोष्ट
हे ५ खेळाडू आहेत आयपीएलच्या तेराव्या हंगामातील ऑरेंज कॅपचे प्रमुख दावेदार






