शनिवारी (३ ऑक्टोबर) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात आयपीएल २०२० चा १६वा सामना पार पडला. हा सामना दिल्लीने १८ धावांनी जिंकला. असे असले तरीही कोलकाताचा धडाकेबाज फलंदाज ऑयन मॉर्गनने आपल्या संघाची प्रशंसा केली आहे. त्याने म्हटले आहे की, कोलकाता संघात अनेक सामना विजेता खेळाडू आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत फलंदाजी करणे खूप कठीण काम असते. कारण त्यांच्याशी समतोल राखणे सोप्पं काम नाही.
दिल्लीविरुद्धच्या सामन्यात मॉर्गनने तडाखेबंद खेळी केली. दिल्लीने प्रथम फलंदाजी करत दिलेल्या २२९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाता संघ एकेवेळी ६ विकेट्स गमावत १२२ धावांवर होता. त्यानंतर मॉर्गन आणि राहुल त्रिपाठी यांनी चमकदार खेळी केली. मॉर्गनने १८ चेंडूंचा सामना करत १ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ४४ धावा केल्या. आणि राहुलने १६ चेंडू खेळताना धुव्वांधार फटकेबाजी करत ३६ धावा कुटल्या. परंतु त्यांना आपल्या संघाला विजय मिळवून देता आला नाही.
मॉर्गनने सामन्यानंतर माध्यमांशी चर्चा करताना म्हटले, “जर तुम्ही आमच्या फलंदाजीचा क्रम पाहिला, तर अनेक सामना विजेता खेळाडू आहेत, त्यामुळे मला वरच्या फळीत फलंदाजी करण्यासाठी अधिक संधी मिळत नाही. विशेषत: जेव्हा तुमच्याकडे आंद्रे रसेल सारखा जागतिक दर्जाचा अष्टपैलू खेळाडू असेल तर हे आणखी कठीण होते. तो एक खतरनाक फटकेबाजी करतो आणि जेव्हा तो फलंदाजीसाठी वरच्या फळीत येतो, तेव्हा सर्वांना आपला क्रम बदलावा लागतो.”
ऑयन मॉर्गनने सुनील नरेनबद्दल केले वक्तव्य
मॉर्गनला संघातील सलामीला फलंदाजी करताना फ्लॉप ठरत असलेला फिरकीपटू सुनील नरेनबद्दलही प्रश्न विचारले. मॉर्गनने म्हटले की, वरच्या फळीत नरेन एक सामना विजेता खेळाडू आहे.
पुढे बोलताना तो म्हणाला, “सुनील नरेन हा एक असा खेळाडू आहे, जो सामना विजेता खेळी खेळतो. त्याच्या स्कोरने नाही, तर तो जो प्रभाव टाकतो, त्याने खूप फरक पडतो.”
कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिकनेही नरेनला पूर्ण पाठिंबा दिला आहे. त्याचे असे म्हणणे आहे की, तो आताही संघासाठी एक सामना विजेता खेळाडू सिद्ध होऊ शकतो. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खराब कामगिरी केल्यानंतर कार्तिकने म्हटले की, तो संघ व्यवस्थापनाशी वरच्या फळीतील फलंदाजीबद्दल चर्चा करणार आहे.
कोलकाता संघाचा पुढील सामना ७ ऑक्टोबरला चेन्नई सुपर किंग्स संघाविरुद्ध होणार आहे.