मुंबई । आयपीएलचा 13 वा हंगाम सुरु होण्यास अजून 3 आठवडे शिल्लक आहेत आणि अशा परिस्थितीत बीसीसीआयला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. फ्यूचर ग्रुपनेही शेवटच्या क्षणी स्वत: ला आयपीएलपासून वेगळे केले आहे. आयपीएल असोसिएट सेंट्रल प्रायोजकत्वातून या ग्रुपने माघार घेतली आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्यूचर ग्रुपने अगदी शेवटच्या क्षणी असा निर्णय घेतला.
आधीच भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या वादामुळे विवोने आयपीएलचे मुख्य प्रायोजक होण्यास नकार दिला. ज्यानंतर ड्रीम 11 ला तो अधिकार मिळाला. परंतु यामुळे बीसीसीआयचे नुकसान झाले. बीसीसीआयला दरवर्षी विवोकडून 440 कोटी रुपये मिळत होते, तर ड्रीम 11 बरोबर 222 कोटी रुपयांवर करार झाला.
इनसाइडस्पोर्टच्या माहितीनुसार, बीसीसीआयच्या सूत्रांनी याची माहिती दिली आहे की, फ्यूचर ग्रुपने आयपीएलच्या प्रायोजकत्व करारापासून आपले हात मागे घेतले आहेत. फ्यूचर ग्रुप गेली पाच वर्षे आयपीएलशी संबंधित होता. आयपीएलच्या अधिकृत वेबसाइटने देखील अधिकृत प्रायोजक यादीमधून फ्यूचर ग्रुपचा लोगो काढून टाकला आहे. दरवर्षी फ्यूचर ग्रुप केंद्रीय प्रायोजकत्वासाठी 28 कोटी रुपये द्यायचा.
गेल्या वर्षी आयपीएल दरम्यान फ्यूचर ग्रुप बाहेर पडणार असल्याची चर्चा होती, पण त्यांनी आयपीएल 2019 पूर्ण केला. असे म्हटले जात आहे की, फ्यूचर ग्रुपवर कोरोनाव्हायरसचा वाईट परिणाम झाला. त्यामुळे आयपीएलमधून माघार घेण्याचे त्यांनी ठरविले. आयपीएलचा 13 वा सीझन युएईमध्ये 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे.
आयपीएलचे आयोजन 19 सप्टेंबरपासून होणार आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआयसाठी हा चिंतेचा विषय आहे. आयपीएलच्या या हंगामाचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांच्या म्हणण्यानुसार, आयपीएल कार्यक्रम आठवडा संपण्यापूर्वीच जाहीर केले जाईल. लीगची अंतिम फेरी 10 नोव्हेंबर रोजी खेळली जाईल.