मुंबई। किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध गुरुवारी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा पराभव झाला. या पराभवानंतर आरसीबीचा कर्णधार विराट कोहली आणखी अडचणीत सापडला. षटकांची गती कमी राखल्याने (स्लो ओव्हर रेट) विराट कोहलीला 12 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. निर्धारित वेळेत विराटच्या संघाने 20 षटके पूर्ण केली नाहीत. यामुळे पंजाबचा डाव बराच उशीरा संपला.
आयपीएलच्या नियमांनुसार, कर्णधाराला वेळेत षटके पूर्ण न केल्यामुळे दंड आकारला जातो. आयपीएलच्या चालू हंगामात प्रथमच कर्णधाराला स्लो ओव्हर रेटबद्दल ही शिक्षा देण्यात आली आहे. वारंवार ही चूक केल्यानंतर कर्णधारला देखील सामन्यातून निलंबित केले जाते.
कुठे झाला उशीर?
विराट कोहलीने पंजाबविरुद्ध 6 गोलंदाजांचा वापर केला. प्रत्येक गोलंदाज जास्त धावा देत होता. त्यामुळे या दरम्यान विराट जवळजवळ प्रत्येक चेंडूनंतर गोलंदाजांशी बोलत होता. त्यामुळे प्रत्येक षटक पूर्ण करण्यासाठी बराच वेळ लागत होता. तसेच डेल स्टेन आणि उमेश यादवने षटक पूर्ण करण्यास बराच वेळ घेतला होता. याशिवाय विराट कोहलीनेही राहुलचे दोन झेल सोडले. यानंतर सीमारेषाजवळ थांबलेला कर्णधार विराट अत्यंत हताश आणि निराश दिसत होता.
आरसीबीचा दारूण पराभव
इंडियन प्रीमियर लीगच्या सहाव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. पंजाबने बेंगलोरचा 97 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने 20 षटकांत 206 धावा केल्या. त्यानंतर 207 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगलोरचा संघ 109 धावांत गडगडला. कर्णधार विराटपासून ते संघातील सर्व स्टार खेळाडू फ्लॉप झाले.