इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार केव्हिन पीटरसन याने भारतीय संघाचा युवा प्रतिभावान फलंदाज रिषभ पंत याच्यावर सातत्यपूर्ण कामगिरी न केल्यामुळे टीका केली आहे. पीटरसन म्हणला की मी अजूनही त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीची वाट पाहत आहे.
इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या सत्रात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना पंतने आतापर्यंत खेळलेल्या सहा सामन्यांत 31, 37, 28, 38, 37 आणि 5 धावा केल्या आहेत. पंतने आयपीएलमध्ये आतापर्यंत एकही मोठा डाव खेळलेला नाही.
पीटरसनचा असा विश्वास आहे की राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी पंतने सातत्यपूर्ण खेळ केला पाहिजे. स्टार स्पोर्ट्स चॅनेलवरील एका शोमध्ये बोलताना पीटरसन म्हणाला की, “रिषभ एक असा फलंदाज आहे जो त्याच्या कामगिरीमुळे निराश करत नाही. त्याच्याकडून मला खूप आशा आहेत.”
पुढे बोलताना तो म्हणाला, “मी अजूनही त्याच्या चांगल्या कामगिरीची वाट पाहत आहे. भारतीय संघात स्थान मिळवून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी तुमच्या कामगिरीत सातत्य हवे. मी गेल्या एक वर्षापासून रिषभच्या कामगिरीकडे लक्ष ठेवत आहे.”
“रिषभने सांगितले की भारतासाठी क्रिकेट खेळण्यासाठी मी सर्व प्रयत्न करू इच्छितो. त्याने काही उत्तम डावही खेळले. काही प्रसंगी तो अपयशी ठरला, परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्थान मिळवण्यासाठी तुम्हाला अशा समर्पणांची आवश्यकता आहे. कारण कठीण परिस्थितिचा सामना करूनच तुम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत होऊ शकता आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट हे एक अवघड मंच आहे.” असेही पुढे बोलताना पीटरसन म्हणाला.