आयपीएल २०२१ चा लिलाव सोहळा १८ फेब्रुवारी रोजी चेन्नईमध्ये पार पडला. त्यामुळे लवकरच आयपीएलचे सर्व संघ येत्या हंगामासाठी सरावाला सुरुवात देखील करणार आहेत. परंतु आयपीएल स्पर्धा नेमकी कुठे आणि कधी आयोजित केली जाणार? यावर अजुनही प्रश्नचिन्ह उपस्थित आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० स्पर्धेचे आयोजन संयुक्त अरब अमिरातीमध्ये करण्यात आले होते. मग यंदाची आयपीएल देखील तिथेच होणार का? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. तसेच जर आयपीएल स्पर्धा भारतात खेळवण्यात आली तर, तर कोणत्या शहरांकडे यजमानपद सोपवले जाईल? हे ही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मला विश्वास आहे की आयपीएल भारतात होणार
अशातच दिल्ली कॅपिटल्स संघाचे सहमालक पर्थ जिंदल यांनी आयपीएलच्या आयोजनाविषयी महत्त्वपुर्ण माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले की, “जे मी पाहतो आहे आणि ऐकतो आहे, त्यानुसार आयपीएलचे सर्व सामने मुंबईमध्ये खेळवले जाऊ शकतात. जर इंग्लंड संघ भारतीय दौऱ्यावर येऊ शकतो. जर इंडियन सुपर लीगचे सर्व सामने गोवा मध्ये खेळवले जाऊ शकतात. जर विजय हजारे ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफी वेगवेगळ्या ठिकाणांवर खेळवली जाऊ शकते. तर आयपीएल सुध्दा भारताबाहेर आयोजित नाही व्हायला पाहिजे. मला विश्वास आहे की आयपीएल भारतातच होईल.”
महाराष्ट्राच्या राजधानीत होऊ शकते साखळी फेरी सामन्यांचे आयोजन
पर्थ जिंदल पुढे म्हणाले की, “माझ्या मते बीसीसीआय आणि आयपीएलचे अधिकारी याविषयी चर्चा करत आहेत की, एकाच शहरात आयपीएलचे साखळी फेरी सामने आयोजित करायचे. त्यानंतर दुसऱ्या शहरात प्लेऑफचे सामने खेळवायचे. अशात मुंबईत (महाराष्ट्राची राजधानी) साखळी फेरी सामने होण्याची दाट शक्यता आहे. कारण इथे ३ आंतरराष्ट्रीय (ब्रेबॉर्न, वानखेडे आणि डी.वाय.पाटील) स्टेडियम आहेत. इथे खेळाडूंना सरावासाठी सर्व सुविधा उपलब्ध आहेत. तसेच प्लेऑफ सामने अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियममध्ये खेळवले जाऊ शकतात. परंतु याबाबतीत अजुनही काही नक्की ठरलं नाहीये, मी जे ऐकले आहे ते सांगत आहे.”
आयपीएल २०२१ चे आयोजन मोठे असेल
बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली याने सुरुवातीलाच स्पष्ट केले होते की, आयपीएल २०२१ चे आयोजन मोठे असणार आहे. परंतु आयपीएल नक्की कुठे होणार? हे त्याने स्पष्ट केले नव्हते. परंतु गेल्या काही महिन्यांपासून आयपीएलचा येता हंगाम भारतात आयोजित करण्याला प्राधान्य दिले जात असल्याची चिन्हे दिसत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
नक्की १५ कोटी म्हणजे किती रे भावा? आरसीबीने खरेदी केलेल्या जेमिसनला लिलावानंतर पडला प्रश्न
चेन्नईच्या अनुभवी शिलेदाराला खरेदी करत सहाव्यांदा जेतेपद जिंकण्यास तयार; पाहा रोहितची नवी पलटण
कर्णधाराने जुगार खेळत गोलंदाजाला पाठवले चौथ्या क्रमांकावर; त्याने विरोधकांची पिसे काढत झळकावले शतक