अतिशय जोरात चर्चा सुरू असलेल्या आयपीएल २०२१ चा लिलाव चेन्नई येथे पार पडला. या लिलावात अनेक विदेशी खेळाडू चांगलेच मालामाल झाले. आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठे नाव असलेल्या अनेक खेळाडूंना बोली लागली नाही. तर, काही नवख्या खेळाडूंवरही लक्ष्मीची चांगलीच कृपा झाली. आयपीएलच्या या लिलावात सर्वात महागड्या ठरलेल्या १० खेळाडूंविषयी आपण जाणून घेऊया.
१) ख्रिस मॉरिस
दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी वेगवान गोलंदाज ख्रिस मॉरिस सध्या या लिलावातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. राजस्थान रॉयल्सने त्याच्यावर १६.२५ कोटी रुपयांची बोली लावत त्याला आपल्या संघात सामील करून घेतले. ही बोली आयपीएलच्या इतिहासातील आत्तापर्यंतची सर्वात मोठी बोली ठरली आहे.
२) कायले जेमिसन
न्युझीलंडचा उभरता अष्टपैलू खेळाडू कायले जेमिसन याच्यावर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने १५ कोटी रुपयांची बोली लावत सर्वांना आश्चर्यचकित केले. जेमिसन प्रथमच आयपीएल लिलावात सहभागी झाला होता.६ फूट ८ इंच उंची लाभलेला जेमिसन वेगवान गोलंदाजी करतो. तसेच, तळाच्या क्रमांकावर फलंदाजीला येत मोठे मोठे षटकार मारण्यात त्याचा हातखंडा आहे.
३) ग्लेन मॅक्सवेल
ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल यावर्षी देखील महागड्या खेळाडूंच्या यादीत सामील आहे. गेल्या वर्षी पंजाब संघाने १०.७५ कोटी रुपये देत त्याला संघात निवडले होते. मात्र, यावर्षी विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने १४.२५ रुपये त्यासाठी खर्च केले.
४) जाय रिचर्डसन
ऑस्ट्रेलियन संघाचा वेगवान गोलंदाज जाय रिचर्डसन हाय देखील या लिलावात १४ कोटी इतकी रक्कम मिळवण्यात यशस्वी ठरला. पंजाब किंग्स संघाने त्याला आपल्या ताफ्यात सामील केले. रिचर्डसन प्रथमच आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे.
५) कृष्णप्पा गौतम
देशांतर्गत क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडू असलेला कृष्णप्पा गौतम चेन्नई सुपर किंग्स संघाचा भाग झाला. चेन्नईने त्यावर ९.२५ कोटींची बोली लावली. आता गौतमच्या नावे आयपीएलमध्ये सर्वाधिक रक्कम मिळवणार ‘अनकॅप्ड’ खेळाडू होण्याचा विक्रम जमा झाला.
६) रायली मरडीथ
ऑस्ट्रेलियासाठी आतापर्यंत कधीही न खेळलेला होबार्टचा वेगवान गोलंदाज रायली मरडीथ या आयपीएल लिलावात ‘सरप्राईज पॅकेज’ म्हणून पुढे आला. २४ वर्षीय मरडीथवर पंजाब किंग्सने तब्बल ८ कोटी रुपयांची बोली लावून सर्वांना थक्क केले. नुकत्याच संपलेल्या बिग बॅश लीगमध्ये केलेल्या चांगल्या कामगिरीचे बक्षीस त्याला मिळाले.
७) मोईन अली
इंग्लंडचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू मोईन अली या लिलावात महागड्या खेळाडूंच्या यादीत सात कोटी रुपये घेत सातव्या स्थानी राहिला. अली यापूर्वी विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा सदस्य होता. शेन वॉटसन निवृत्त झाल्याने चेन्नई सुपर किंग्स संघात एका विदेशी खेळाडूची जागा रिक्त होती. त्या जागी आता अलीला संधी मिळाली आहे.
८) शाहरुख खान
तमिळनाडूचा युवा स्फोटक फलंदाज शाहरुख खान याला पंजाब किंग्स संघाने आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. त्यासाठी ५.२५ कोटी रुपयांची बोली लावली गेली. नुकत्याच संपलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये शाहरुखने २२० च्या स्ट्राईक रेटने धावा बनविल्या होत्या.
९) टॉम करन
इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू टॉम करनसाठी देखील हा लिलाव लाभदायी ठरला. मागील वर्षी राजस्थान रॉयल्स संघासाठी खेळणाऱ्या टॉम करनसाठी यावर्षी अनेक संघांनी बोली लावली. मात्र, दिल्ली कॅपिटल्सने सर्वांना मागे टाकून ५.२५ कोटी रुपयांच्या रकमेसह त्याला ‘दिल्लीकर’ बनविले. वेगवान गोलंदाज व उपयुक्त फलंदाज म्हणून तो कॅपिटल्ससाठी उपयुक्त ठरू शकतो.
१०) नॅथन कुल्टर-नाईल
ऑस्ट्रेलियाचा अनुभवी वेगवान नॅथन कुल्टर-नाईल हा अपेक्षेप्रमाणे पुन्हा एकदा कोट्याधीश बनला. मागील वर्षी तो मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. मात्र, जास्त रक्कम असल्याने त्याला करारमुक्त करण्यात आले होते. यावेळी मुंबईने त्याच्यावर पुन्हा विश्वास दाखवत ५ कोटी रुपयांची रक्कम देत त्याला संघात स्थान दिले.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल लिलाव २०२१: कोणावर सर्वाधिक बोली; तर कोण राहिलं अनसोल्ड, वाचा एकाच क्लिकवर सर्वकाही
आयपीएल लिलाव : अखेर केदार आणि हरभजन यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले; या संघांमध्ये झाले सामील






