कोरोना या आजाराचा प्रादुर्भाव वाढल्याने जगातील सर्वात प्रसिद्ध व्यवसायिक टी२० लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा चौदावा हंगाम स्थगित करण्यात आला होता. स्पर्धेसाठीच्या बायो-बबलमध्ये अचानकपणे कोरोनाचा शिरकाव झाल्याने आयोजकांनी स्पर्धा ४ मे रोजी अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलेला. त्यानंतर, आता आयपीएलचा उर्वरित हंगाम संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे खेळवण्याचे नक्की झाल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) या निर्णयाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजे आयसीसीने खो दिला आहे.
‘आयपीएल लांबवू नये’
आयपीएल २०२१ मधील उर्वरित ३१ सामने युएई येथे १९ सप्टेबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत खेळविण्याचे बीसीसीआयने नक्की केले आहे. मात्र, आयसीसी आयपीएल १५ ऑक्टोबरपर्यंत खेळवू इच्छित नाही. एका प्रसिद्ध क्रीडा संकेतस्थळाच्या बातमीनुसार, ‘आयसीसी टी२० विश्वचषक १८ ऑक्टोबरपासून सुरू करण्याच्या विचारात आहे. परंतु, आयपीएल १५ ऑक्टोबरपर्यंत खेळली गेल्यास विश्वचषक सुरू होण्यास केवळ तीन दिवसांचा अवधी शिल्लक राहतोय. आयसीसी आयपीएल १५ तारखेपर्यंत खेळण्यास परवानगी देणार नाही. आयसीसीचा आग्रह आहे की, आयपीएलचा अंतिम सामना १० ऑक्टोबरला संपन्न व्हावा.’
आयसीसीने मागील वर्षी घोषणा केली होती की, टी२० विश्वचषक ऑक्टोबरच्या मध्यात सुरु होईल तर, स्पर्धेचा अंतिम सामना १४ नोव्हेंबर रोजी खेळला जाईल.
‘या’ ठिकाणी होऊ शकते विश्वचषकाचे आयोजन
टी२० विश्वचषक स्पर्धा कोठे खेळली जाणार हे अजूनही नक्की नाही. अशी बातमी समोर येत आहे की, भारतात कोरोना विषाणूमुळे या स्पर्धेचे आयोजन इतर देशात केले जाऊ शकते. मात्र, बीसीसीआयने आयसीसीकडे याबाबत निर्णय घेण्यासाठी काही वेळ मागितला आहे. भारताकडे स्पर्धेचे यजमानपद असले तरी, सुरुवातीला स्पर्धा युएईत तर, आता श्रीलंकेत ही स्पर्धा आयोजित केली जाऊ शकते अशा बातम्या आहेत.
महत्वाच्या बातम्या:
विंडिज आणि बांग्लादेश दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ जाहीर, अजून एका भावंडांच्या जोडीचीही निवड
या कारणामुळे कोहली ठरतो जगातला सर्वश्रेष्ठ फलंदाज, राशिद खानने सांगितली खुबी
विराट-रोहित नाही, तर कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत या खेळाडूंची भूमिका निर्णायक