अहमदाबाद। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामात आत्तापर्यंत अनेक युवा खेळाडूंनी आपल्या कामगिरी प्रभावित केले आहे. गुरुवारी (३० एप्रिल) यात २५ वर्षीय हरप्रीत ब्रार या पंजाब किंग्सकडून खेळणाऱ्या क्रिकेटपटूचाही सामावेश झाला. या हंगामातील आपला पहिलाच सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध खेळताना त्याने अष्टपैलू कामगिरी करत सामनावीर पुरस्कारही पटकावला. विशेष म्हणजे बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने सामन्यानंतर त्याच्या पाठीवर कौतुकाची थापही दिली.
विराटला केले त्रिफळाचीत
हरप्रीतसाठी हा सामना स्वप्नवत ठरला. त्याने या सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात महत्त्वाचे योगदान दिले. गोलंदाजीत तर त्याने कमाल केली. त्याने बेंगलोरचा संघ १८० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना ११ व्या षटकातील पहिल्या चेंडूवर विराटला ३५ धावांवर त्रिफळाचीत केले. त्यामुळे विराट हा हरप्रीतची आयपीएल कारकिर्दीतील पहिली विकेट ठरला.
विशेष म्हणजे विराटपाठोपाठ पुढच्याच चेंडूवर त्याने ग्लेन मॅक्सवेलचा शुन्यावर त्रिफळा उडवला. तसेच त्यानंतर १३ व्या षटकात एबी डिविलियर्सला त्याने ३ धावांवर केएल राहुलकरवी झेलबाद करत माघारी धाडले.
तत्पूर्वी त्याने या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या पंजाबकडून ७ व्या क्रमांकावर फलंदाजी करताना कर्णधार केएल राहुलबरोबर ६ व्या विकेटसाठी नाबाद ६१ धावांची भागीदारी केली. तसेच १७ चेंडूत १ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद २५ धावा केल्या. त्याच्या या अष्टपैलू खेळामुळे त्याला सामनावीर पुरस्कार मिळवण्यात यश आले.
विराटने केले कौतुक
हरप्रीतने केलेल्या अष्टपैलू कामगिरीबद्दल विराटने सामन्यानंतर त्याची भेट घेत कौतुक केले. या क्षणाचा व्हिडिओ आयपीएलच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. यात दिसले की विराटने हरप्रीतची भेट घेतली. तसेच विराटने त्याच्याशी हस्तांदोलन केले आणि त्याच्या पाठीवर शाबासकीची थापही दिली. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
First, the wicket & then, the appreciation from the man himself! 🤝@thisisbrar will surely cherish this moment with @imVkohli! 😊#VIVOIPL #PBKSvRCB pic.twitter.com/ovXmadbyKN
— IndianPremierLeague (@IPL) April 30, 2021
पंजाबने मिळवला विजय
या सामन्यात पंजाबने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १७९ धावा केल्या होत्या. पंजाबकडून केएल राहुलने सर्वाधिक नाबाद ९१ धावांची खेळी केली. तर गेलने ४६ धावा केल्या. त्याचबरोबर हरप्रीत ब्रारने नाबाद २५ धावांचे योगदान दिले. बेंगलोरकडून काईल जेमिसनने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.
प्रतिउत्तरादाखल, १८० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या बेंगलोरला २० षटकात ८ बाद १४५ धावाच करता आल्या. त्यांच्याकडून कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक ३५ धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त रजत पाटीदार(३१), हर्षल पटेल(३१) आणि काईल जेमिसन(३०) यांनाच दोन आकडी धावसंख्या ओलांडता आली. पंजाबकडून हरप्रीतने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलमध्ये बेंगलोरविरुद्ध ‘अशी’ कामगिरी करणारा गेल रहाणे आणि वॉटसननंतर तिसराच फलंदाज
हरप्रीत ब्रारची कमाल! एकाच सामन्यात कोहली आणि डिव्हिलियर्सला बाद करत केला ‘हा’ विक्रम