इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या मेगा लिलावात मुंबई इंडियन्सने यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनला खरेदी करण्यासाठी तब्बल १५.२५ कोटी रुपये खर्च केले. ईशानचे हंगामातील आतापर्यंतचे प्रदर्शन चांगले राहिले, पण इतर संघाच्या तुलनेत मुंबई इंडियन्स अपयशी ठरताना दिसला. याच पार्श्वभूमीवर माजी दिग्गज आकाश चोप्राने प्रश्न उपस्थित केला आहे. त्याच्या मते ईशानला खरेदी करण्यासाठी संघाने स्वतःचा दर्जा कमी केला आहे.
महागात पडला ईशान किशन?
त्याच्या युट्यूब चॅनलवर बोलताना आकाश चोप्रा (Aakash Chopra) ईशान किशन (Ishan Kishan) आणि मुंबई इंडियन्सबद्दल बोलताना म्हणाला की, “जेव्हा आयपीएल २०२२ साठीच्या मुंबई इंडियन्स संघाचा प्रश्न येतो, तेव्हा दोन गोष्टी महत्वाच्या ठरतात. पहिली जेव्हा तुम्ही एका खेळाडूला १५.२५ कोटी रुपयांमध्ये खरेदी करता, तेव्हा हे कधी कधी संघाच्या संतुलनावर याचा परिणाम होतो. दुसरा, जोफ्रा आर्चर या हंगामात संघाचा भाग नाहीये. तो पुढच्या वर्षीच्या हंगामात उपलब्ध असेल. जेव्हा तो सहभागी होईल, तेव्हा मुंबईच्या गोलंदाजीला बूस्ट मिळेल. पण खरं तर हे आहे की, यावर्षी त्याची गोलंदाजी कमजोर दिसत आहे.”