इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामाला शनिवारपासून (२६ मार्च) सुरुवात होत आहे. पहिलाच सामना गतविजेत्या आणि गतउपविजेत्या संघात म्हणजेच चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात होणार आहे. हा आयपीएलचा १५ वा हंगाम असून यंदा १० संघात हा हंगाम खेळवला जाणार आहे. त्यामुळे साखळी फेरीसाठी दोन गट करण्यात आले आहेत. चेन्नई संघ गट ब मध्ये आहे, तर कोलकाता गट अ मध्ये आहे.
दोन्ही संघात मुख्य खेळाडूंची अनुपस्थिती
आयपीएल हंगामातील (IPL 2022) पहिलाच सामना खेळण्याआधी दोन्ही संघांना प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीची कमतरता जाणवणार आहे. चेन्नई संघाचा अष्टपैलू मोईन अली याला उशीरा व्हिसा मिळाल्याने तो संघातही उशीरा जोडला गेला. त्यामुळे तो कोलकाता विरुद्धच्या सामन्यात खेळणार नाही. तसेच वेगवान गोलंदाज दिपक चाहर देखील दुखापतग्रस्त असल्याने कोलकाताविरुद्ध खेळणार नाही.
कोलकाताच्या बाबतीत सांगायचे झाल्यास वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स आणि सलामीवीर ऍरॉन फिंच सध्या ऑस्ट्रेलिया संघासह पाकिस्तान दौऱ्यात व्यस्त आहेत. ते ५ एप्रिलनंतर आयपीएल खेळण्यासाठी येणार आहेत. त्याचमुळे हे दोन्ही खेळाडू पहिल्या सामन्यासाठी अनुपस्थित असतील.
असे असू शकतात ११ जणांचे संघ
यंदा रविंद्र जडेजा कर्णधार असलेल्या चेन्नईकडून डेवॉन कॉनवे आणि महिश तिक्षणा आयपीएल पदार्पण करताना दिसू शकतात. कॉनवे ऋतुराज गायकवाडबरोबर सलामीला फलंदाजी करू शकतो. तसेच रॉबिन उथप्पा, अंबाती रायडू, एमएस धोनी हे मधल्या फळीत दिसू शकतात. तसेच अष्टपैलू म्हणून शिवम दुबेला संधी मिळू शकते. तसेच त्याच्याबरोबर ड्वेन ब्रावो असेल. गोलंदाजीची भिस्त ऍडम मिल्ने आणि तुषार देशपांडेवर अधिक राहू शकते.
श्रेयस अय्यर कर्णधार असलेल्या कोलकाताकडून वेंकटेश अय्यर आणि अजिंक्य रहाणे सलामीला फलंदाजी करू शकतात. तसेच मधल्या फळीची भिस्त कर्णधार श्रेयससह नितीश राणा, यष्टीरक्षक सॅम बिलिंग्स, आंद्र रसेलवर असेल. गोलंदाजीसाठी टीम साऊदी, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती आणि उमेश यादव यांच्यावर भिस्त असेल. सुनील नारायण गोलंदाजीसह फलंदाजीतही योगादान देऊ शकतो.
आमने-सामने कामगिरी
चेन्नई आणि कोलकाता (CSK vs KKR) आत्तापर्यंत २५ सामने झाले आहेत. यातील १७ सामन्यात चेन्नईने विजय मिळवला आहे, तर ८ सामने कोलकाता संघ जिंकला आहे. तसेच या दोन संघातील सामना शनिवारी वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. वानखेडेवरील इतिहास पाहाता चेन्नईने गेल्यावर्षी ५ पैकी ४ सामने या स्टेडियमवर जिंकले आहेत, तर कोलकाताने आत्तापर्यंत या मैदानात खेळलेल्या ११ पैकी १० सामन्यात पराभव पत्करला आहे.
खेळपट्टी आणि हवामान
वानखेडे स्टेडियमवर आत्तापर्यंत फलंदाजांचा बऱ्याचदा बोलबाला दिसून आला आहे. तसेच या मैदानाच्या खेळपट्टीवर चेंडूला उसळीही मिळते. याबरोबरच या सामन्यात दव महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. तसेच शनिवारी पावसाची शक्यता नसली, तरी वातावरण ढगाळ राहू शकते.
आयपीएल २०२२ हंगामातील चेन्नई विरुद्ध कोलकाता सामन्याबद्दल जाणून घ्या सर्वकाही…
१. आयपीएल २०२२ मधील चेन्नई विरुद्ध कोलकाता सामना केव्हा होणार?
– आयपीएल २०२२ मधील चेन्नई विरुद्ध कोलकाता सामना २६ मार्च २०२२ रोजी खेळला जाणार आहे.
२. आयपीएल २०२२ मधील चेन्नई विरुद्ध कोलकाता सामना कुठे खेळवला जाणार?
– आयपीएल २०२२ मधील चेन्नई विरुद्ध कोलकाता सामना वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे खेळवला जाईल.
३. आयपीएल २०२२ मधील चेन्नई विरुद्ध कोलकाता सामना किती वाजता सुरु होणार?
– आयपीएल २०२२ मधील चेन्नई विरुद्ध कोलकाता सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होईल. त्याआधी संध्याकाळी ७.०० वाजता नाणेफेक होईल.
४. आयपीएल २०२२ मधील चेन्नई विरुद्ध कोलकाता सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात कोणत्या चॅनेलवर पाहाता येईल?
– आयपीएल २०२२ मधील चेन्नई विरुद्ध कोलकाता सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहता येईल.
५. आयपीएल २०२२ मधील चेन्नई विरुद्ध कोलकाता सामन्याचे थेट प्रक्षेपण ऑनलाईन कसे पाहाता येईल?
– आयपीएल २०२२ मधील चेन्नई विरुद्ध कोलकाता सामन्याचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण डिज्नी प्लस हॉटस्टार या ऍपवर पाहाता येईल.
यातून निवडला जाईल ११ जणांचा संघ –
चेन्नई सुपर किंग्स –
ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, डेवॉन कॉनवे, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा (कर्णधार), शिवम दुबे, एमएस धोनी (यष्टीरक्षक), ड्वेन ब्रावो, ख्रिस जॉर्डन, राजवर्धन हंगरगेकर, महेश तिक्षणा, ऍडम मिल्ने, मिशेल सँटनर, तुषार देशपांडे, हरी निशांत , एन जगदीसन, सुभ्रांशु सेनापती, प्रशांत सोलंकी, मुकेश चौधरी, केएम आसिफ, सिमरजीत सिंग, भगत वर्मा.
कोलकाता नाईट रायडर्स –
वेंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे, नितीश राणा, श्रेयस अय्यर (कर्णधार), सॅम बिलिंग्ज (यष्टीरक्षक), आंद्रे रसेल, सुनील नारायण, चमिका करुणारत्ने, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती, उमेश यादव, रसिक सलाम, मोहम्मद नबी, शेल्डन जॅक्सन, बाबा इंद्रजीत, रिंकू सिंग, अनुकुल रॉय, प्रथम सिंग, अभिजीत तोमर, अमन हकीम खान, टिम साऊदी, अशोक शर्मा, रमेश कुमार.
महत्त्वाच्या बातम्या –
गेल्या ४ वर्षांपासून आयपीएलमध्ये ‘या’ कारणामुळे होत नाहीये ओपनिंग सेरेमनी, वाचा सविस्तर
‘जॉब डन’ म्हणत जेव्हा धोनीने २०२१मध्येच दिले होते सीएसकेचे नेतृत्त्व सोडण्याचे संकेत, पाहा Video
IPL2022| चेन्नई वि. कोलकाता सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!