ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर (David Warner) आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये त्याच्या पहिल्या फ्रँचायझीचे प्रतिनिधित्त्व करणार आहे. मागच्या आयपीएल हंगामापर्यंत वॉर्नर सनरायझर्स हैदराबादचे प्रतिनिधित्व करत होता. परंतु, १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या आयपीएल मेगा लिलावात त्याला दिल्ली कॅपिटल्सने ६ कोटी २५ लाख रुपयांची बोली लावून खरेदी केले. वॉर्नर यापूर्वी देखील दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळला आहे. मेगा लिलावात दिल्लीने त्याला खरेदी करताच सोशल मीडियावर वॉर्नरने एक खास पोस्ट शेअर केली.
वॉर्नरच्या या सोशल मीडिया पोस्टमध्ये त्याने स्वतःचा फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने दिल्ली कॅपिटल्सची जर्सी घातलेली आहे. हा फोटो तेव्हाचा आहे, जेव्हा तो दिल्लीचे प्रतिनिधित्व करत होता.
कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, “पुन्हा एकदा तिथेच, जेथून हे सर्व सुरू झाले होते! मी माझ्या नवीन संघातील सहकारी, मालक आणि प्रशिक्षकांना भेटण्यासाठी उत्सुक आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या सर्व नवीन आणि जुन्या चाहत्यांना भेटण्यासाठीही उत्साहीत आहे. काही नवीन रिल तयार करण्यासाठी मला तुमच्या सल्ल्यांची आवश्यकता असेल. माझे फोटोशॉप कोणा कोणाला आवडतात?” दरम्यान, वॉर्नरच्या या पोस्टला आणि सोबतच्या मजेशीर कॅप्शनला चाहत्यांकडून खूप प्रेम मिळाले आहे.
https://www.instagram.com/p/CZ6ShRWLRoD/?utm_source=ig_web_copy_link
मागच्या आयपीएल हंगामात वॉर्नरचे प्रदर्शन साधारण राहिले होते. तसेच मागच्या हंगामात सनरायझर्स हैदराबादने वॉर्नरला दिलेल्या वागणुकीवर अनेकांकडून प्रश्न उपस्थित केले गेले होते. मागच्या हंगामात वॉर्नरकडून संघाचे कर्णधापद काढून केन विलियम्सनकडे ही जबाबदारी सोपवली गेली होती. तसेच काही सामन्यांमध्ये वॉर्नरला प्लेइंग इलेव्हनमध्येही स्थान दिले गेले नाही. विलियम्सनच्या नेतृत्वात संघाचे प्रदर्शन सुधारेल अशी अपेक्षा होती, पण गुणतालिकेत संघ शेवटच्या स्थानावर राहिला होता. अशात आता हैदराबादची साथ सोडल्यानंतर आगामी हंगामत वॉर्नर दिल्ली कॅपिटल्ससाठी कसे प्रदर्शन करतो, हे पाहण्यासारखे असेल.
यापूर्वी २००९ मध्ये वॉर्नर आयपीएलमध्ये दिल्ली फ्रँचायझीसाठी खेळला होता. त्याच्या एकंदरित आयपीएल कारकिर्दीचा विचार केला, तर आतापर्यंत खेळलेल्या १५० सामन्यांमध्ये त्याने ५४४९ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या ४ शतकांचा तर ५० अर्धशतकांचा समावेश आहे. मागच्या हंगामात खेळलेल्या ८ सामन्यांमध्ये त्याने १९५ धावा केल्या, ज्यामध्ये २ अर्धशतकांचाही समावेश होता.
महत्वाच्या बातम्या –
साथ सुटली! ‘या’ ६ खेळाडूंनी पहिल्या-वहिल्या आयपीएल संघांना २०२२ हंगामापूर्वी ठोकला राम-राम
IPL 2022: केएल राहुलची किंमत पीएसएलच्या महागड्या बाबरपेक्षा १३ पट अधिक; बीबीएल, सीपीएल आसपासही नाही
हार्दिकच्या भविष्याबाबत कर्णधार रोहितने केले महत्त्वाचे भाष्य; म्हणाला…