इंडियन प्रीमीयर लीग २०२२ चा हंगाम (IPL 2022) सर्वांसाठी अनेक कारणांनी वेगळा असणार आहे. या हंगामापासून गुजरात लायन्स आणि लखनऊ सुपरजायंट्स हे दोन नवे संघ स्पर्धेत सहभागी होत आहेत. त्याचमुळे या हंगामापूर्वी खेळाडूंचा मेगा लिलावही पार पडला. या लिलावात जुन्या ८ संघांसह हे दोन नवे संघही या लिलावात सहभागी झाले होते. दरम्यान, लिलावाआधी या लिलावापूर्वी जुन्या ८ संघांना जास्तीत जास्त चार खेळाडू संघात कायम करण्याची परवानगी देण्यात आली होती, तर नव्या संघांना उर्वरित खेळाडूंमधून ३ खेळाडू थेट निवडण्याची संधी होती. त्यानंतर लिलावातून सर्वच संघांनी आपली संघबांधणी जवळपास पूर्ण केली. त्यामुळे काही खेळाडूंच्या नावावर एक आगळा वेगळा विक्रम झाला आहे.
आयपीएल २०२२ च्या लिलावानंतर अनेक संघ नव्याने तयार झाले. त्यामुळे अनेक खेळाडूंना नवे संघही मिळाले. दरम्यान, असे ६ खेळाडू आहेत, जे त्यांच्या आयपीएल पदार्पणानंतर पहिल्यांदाच दुसऱ्या संघाचे पदार्पण करताना दिसणार आहेत. या ६ खेळाडूंनी त्यांच्या आयपीएल पदार्पणापासून २०२१ हंगामापर्यंत केवळ एकाच संघाचे प्रतिनिधित्त्व केले होते. पण, २०२२ हंगामापासून ते दुसऱ्या संघाचे प्रतिनिधित्त्व करताना दिसणार आहेत.
या ६ खेळाडूंच्या यादीत हार्दिक पंड्या, श्रेयस अय्यर, कृणाल पंड्या, राशिद खान, शुबमन गिल आणि कागिसो रबाडा यांची नावे आहेत. या लेखातून आपण या ६ खेळाडूंच्या पहिल्या आणि दुसऱ्या आयपीएल संघांबद्दल जाणून घेऊ (Players who have played for only one IPL franchise till 2021, but are moving to a new franchise in 2022).
१. हार्दिक पंड्या (Hardik Pandya)
अष्टपैलू खेळाडू असलेला हार्दिक २०१५ पासून २०२१ पर्यंत मुंबई इंडियन्सचा भाग होता. त्याने या काळात ९२ आयपीएल सामने मुंबईकडून खेळले. आता तो गुजरात टायटन्स या संघाकडून खेळताना दिसणार आहे. त्याला आगामी आयपीएल हंगामासाठी गुजरात संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. त्याच्यासाठी गुजरातने १५ कोटी रुपये मोजले आहेत.
२. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer)
मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरने २०१५ पासून २०२१ पर्यंत दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्त्व केले. तसेच त्याने २०१८, २०१९ आणि २०२० हंगामात दिल्लीचे नेतृत्त्वही केले. त्याच्या नेतृत्त्वाखाली दिल्लीने २०१९ आणि २०२० या दोन्ही वर्षी सलग प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. तसेच २०२० मध्ये त्याच्या नेतृत्त्वाखाली खेळताना दिल्लीला उपविजेतेपद मिळाले. पण, त्याची दिल्लीबरोबरची साथ आता सुटली आहे. त्याने दिल्लीकडून ८७ सामने खेळले. आता आयपीएल २०२२ साठी त्याला कोलकाता नाईट रायडर्सने लिलावातून खरेदी केले असून कोलकाताने त्याच्यासाठी १२.२५ कोटी रुपये मोजले आहेत. त्यामुळे श्रेयस कोलकाताकडून आयपीएल २०२२ हंगाम खेळताना दिसेल.
३. कृणाल पंड्या (Krunal Pandya)
हार्दिक पंड्याचा मोठा भाऊ कृणाल पंड्या देखील २०२१ पर्यंत मुंबई इंडियन्सचेच प्रतिनिधित्त्व करत होता. त्याने २०१६ ला आयपीएल पदार्पण केल्यानंतर मुंबईकडून ८४ सामने खेळले. पण आता त्याला लखनऊ सुपरजायंट्स संघाने आपल्या संघात सामील करुन घेतले आहे. लखनऊने कृणालसाठी ८.२५ कोटी रुपये मोजले आहेत. त्यामुळे आता कृणाल लखनऊ संघाकडून आयपीएल २०२२ हंगाम खेळताना दिसेल.
४. राशिद खान (Rashid Khan)
अफगाणिस्तानचा दिग्गज फिरकीपटू राशिद खान सध्याच्या सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये गणला जातो. तो २०१७ पासून २०२१ पर्यंत सनरायझर्स हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्त्व करत होता. या ५ वर्षात त्याने हैदराबादकडून शानदार कामगिरी करत अनेकदा संघाला विजय मिळवून दिले आहेत. त्याने हैदराबादकडून ७६ सामने खेळले आहेत. पण, आता तो गुजरात टायटन्स संघात सामील झाला आहे. त्याच्यासाठी गुजरातने १५ कोटी रुपये खर्च केले आहेत.
५. शुबमन गिल (Shubman Gill)
भारताचा उदयोन्मुख खेळाडू असलेल्या शुबमन गिलने २०१८ साली आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्याने तेव्हापासून २०२१ पर्यंत कोलकाता नाईट रायडर्सचे प्रतिनिधित्त्व केले होते. त्याने कोलकाताकडून ४ वर्षात ५८ सामने खेळले. त्यानंतर आता आयपीएल २०२२ हंगामासाठी तो गुजरात टायटन्स संघात सामील झाला आहे. त्याच्यासाठी गुजरातने ८ कोटी रुपये मोजले आहेत.
६. कागिसो रबाडा (Kagiso Rabada)
दक्षिण आफ्रिकेचा प्रमुख वेगवान गोलंदाज असलेल्या रबाडाकडे एकहाती संघाला सामना जिंकून देण्याची क्षमता आहे. त्याने २०१७ पासून दिल्ली कॅपिटल्स संघाचे गेले ५ वर्षे प्रतिनिधित्तव केले होते. पण आता २०२२ हंगामासाठी झालेल्या लिलावात त्याला पंजाब किंग्सने खरेदी केले आहे. त्याच्यासाठी ९.२५ कोटी रुपये मोजले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022: केएल राहुलची किंमत पीएसएलच्या महागड्या बाबरपेक्षा १३ पट अधिक; बीबीएल, सीपीएल आसपासही नाही
हार्दिकच्या भविष्याबाबत कर्णधार रोहितने केले महत्त्वाचे भाष्य; म्हणाला…
कोहलीच्या ‘विराट’ खेळीची प्रतिक्षा वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी२० मालिकेत संपणार! ‘हे’ आहे मोठे कारण