इंडियन प्रीमियर लीग २०२२चा हंगाम (आयपीएल, IPL 2022) अंतिम चरणात आला आहे. रविवारी रोजी (२९ मे) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर नवख्या गुजरात टायटन्स व राजस्थान रॉयल्स यांच्यात (GTvsRR) अंतिम सामना (IPL 2022 Final) रंगेल. हा सामना जिंकत तब्बल १४ वर्षांनी आयपीएल चषक उंचावण्याचा मान राजस्थानच्या पदरी पडेल. तर गुजरात संघ पदार्पणाच्या हंगामात चषक जिंकण्याची किमया साधेल. या सामन्यादरम्यान गुजरातच्या काही शिलेदारांकडून उमदा प्रदर्शनाची अपेक्षा असेल, ज्यांनी संपूर्ण हंगामात महत्त्वपूर्ण खेळी करत संघाला सामने जिंकून दिले आहेत. त्याच ३ खेळाडूंबद्दल येथे जाणून घेऊया…
गुजरात टायटन्ससाठी मॅच विनर ठरू शकतात हे ३ खेळाडू –
१. डेविड मिलर (David Miller)
गुजरात संघाने आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील आपले अधिकतर सामने शेवटच्या षटकात जिंकले आहेत. यामध्ये सर्वात जास्त योगदान डेविड मिलरचे राहिले आहे. मिलरने गुजरातसाठी फिनिशरची भूमिका निभावली आहे. त्याने आपल्या ताबडतोब खेळींच्या जोरावर संघाला अशक्यप्राय असे विजय मिळवून दिले आहेत. मिलरने चालू हंगामात १५ सामने खेळताना ६४.१४च्या सरासरीने ४४९ धावा फटकावल्या आहेत. यामध्ये त्याच्या पहिल्या क्वालिफायर सामन्यातील मॅच विनिंग नाबाद ६८ धावांच्या खेळीचाही समावेश आहे. अशात गुजरात संघाला अंतिम सामन्यात त्याच्याकडून अशाच खेळीची अपेक्षा असेल.
२. शुबमन गिल (Shubman Gill)
गुजरातचा सलामीवीर शुबमन गिल त्याच्या विस्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. त्याने नेहमी संघाला मजबूत सुरुवात करून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने आयपीएल २०२२मध्ये १५ सामन्यांमध्ये ३१.२९ च्या सरासरीने ४३८ धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे, तो कोणत्याही मैदानावर विस्फोटक खेळी खेळण्याची क्षमता राखतो. अशात पुन्हा एकदा अंतिम सामन्यात गुजरात संघाचा भक्कम सुरुवात करून देण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर असेल.
३. राशिद खान (Rashid Khan)
गुजरात संघात टी२० क्रिकेटमधील महारथी गोलंदाज राशिद खान आहे. राशिद त्याच्या गुगलीसाठी प्रसिद्ध असून त्याचे या हंगामातील प्रदर्शन कौतुकास्पद राहिले आहे. राशिदने चालू हंगामात १५ सामने खेळताना १८ विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. भारतातील खेळपट्टींकडून नेहमीच फिरकीपटूंना मदत मिळाली आहे. याचा फायदा राशिदने घेतला आहे. अशात अंतिम सामन्यातही तो संघासाठी किफायतशीर गोलंदाजी करू शकतो.
महास्पोर्ट्सचा वॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
तिकडे आई आजारी, पण राजस्थानला चॅम्पियन बनवण्यासाठी झुंज देतोय ‘हा’ खेळाडू, खुद्द प्रशिक्षकाचा खुलासा
बेंगलोरला धूळ चारत हॉटेलवर पोहोचताच राजस्थानचे ‘रॉयल’ सेलिब्रेशन; Video Viral