भारतीय क्रिकेट संघातील जवळपास सर्व खेळाडू आयपीएलच्या पंधराव्या हंगामात व्यस्त आहेत. आतापर्यंत या हंगामातील ७४ सामन्यांपैकी ५९ सामने खेळले गेले आहेत. २९ मे रोजी अंतिम सामन्यासह या हंगामाची सांगता होईल. त्यानंतर लगेचच भारतीय संघ टी२० विश्वचषकाच्या तयारीला लागेल. मायदेशात होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ५ सामन्यांच्या टी२० मालिकेने टी२० विश्वचषकासाठीची तयारी सुरू होईल. परंतु तत्पूर्वी आयपीएलदरम्यान भारतीय खेळाडूंना दुखापती झाल्या असल्याने भारतीय संघाच्या समस्या वाढल्या आहेत. याच दुखापती झालेल्या ४ मातब्बर भारतीय खेळाडूंचा या लेखात आढावा घेण्यात आला आहे.
टी नटराजन
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात (IPL 2022) सनरायझर्स हैदराबादचे प्रतिनिधित्त्व करत असलेला वेगवान गोलंदाज टी नटराजन (T Natarajan) दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर होता. परंतु त्याने चालू हंगामातून पुनरागमन करत दमदार प्रदर्शन केले होते. या हंगामात ९ सामने खेळताना त्याने १७ विकेट्स घेतल्या. त्याच्या या प्रशंसनीय गोलंदाजी कामगिरीनंतर त्याच्या भारतीय संघातील पुनरागमनाच्या आशाही उंचावल्या होत्या. परंतु तो पुन्हा दुखापतग्रस्त (Injury) झाल्यामुळे भारतीय संघ निवडकर्त्यांची डोकेदुखी वाढली आहे. नटराजन मागील ३ सामन्यांपासून हैदराबाद संघातून बाहेर आहे.
सूर्यकुमार यादव
भारतीय संघातील मधल्या फळीतील सर्वात विश्वासू फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) गेल्या काही महिन्यांपासून फिटनेसशी लढताना दिसत आहे. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघातील टी२० मालिकेदरम्यान त्याला दुखापत झाली होती, ज्यामुळे तो आयपीएल २०२२मधील मुंबई इंडियन्सच्या सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकला होता. मात्र दुखापतीतून बरा झाल्यानंतर तो मुंबई संघाशी जोडला गेला आणि त्याने त्याच्या लयीतील सातत्य कायम राखत धडाकेबाज प्रदर्शनही केले. परंतु पुन्हा डाव्या हाताच्या दुखापतीमुळे तो आयपीएलच्या उर्वरित हंगामातून बाहेर झाला आहे. अशात जर तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेपूर्वी बरा झाला नाही, तर ही संघासाठी मोठी समस्या असेल.
वॉशिंग्टन सुंदर
भारतीय क्रिकेट संघातील प्रमुख अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) याच्यासाठी फिटनेस ही मोठी समस्या बनली आहे. २०२१ टी२० विश्वचषकासाठी त्याने भारतीय संघात जागा पक्की केली होती, परंतु दुखापतीमुळे तो संघात सहभागी होऊ शकला नव्हता. आयपीएल २०२२मधून सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना त्याने धडाक्यात पुनरागमन केले होते. परंतु ६ सामने खेळल्यानंतर गुजरात टायटन्सविरुद्ध सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना त्याच्या उजव्या हाताला दुखापत झाली आणि तो पुन्हा क्रिकेटपासून दूर झाला.
दिपक चाहर
आयपीएल २०२२ मेगा लिलावातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू दिपक चाहर (Deepak Chahar) याच्या दुखापतीचा झटका चेन्नई सुपर किंग्जला सहन करावा लागला आहे. तो या हंगामाची सुरुवात होण्यापूर्वीच वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेदरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. ज्यामुळे तो आयपीएलमध्ये खेळू शकला नव्हता. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत आपल्या दुखापतीवर काम करत असताना त्याच्या पाठीचे जुने दुखणे पुन्हा सुरू झाले. परिणामी तो संपूर्ण हंगामातून बाहेर झाला. अशात टी२० विश्वचषकापूर्वी त्याची दुखापत भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरू शकते.
महत्त्वाच्या बातम्या-
चेन्नईविरुद्ध का खेळला नाही कायरन पोलार्ड? मोठे कारण आले समोर
शर्माची जागा घेणार वर्मा? लवकरच ‘या’ खेळाडूच्या कपाळावर लागणार मुंबईच्या कर्णधारपदाचा ‘तिलक’
द्रविडच्या साधेपणाने पुन्हा जिंकली लाखो मने! बुक स्टोअरमधील फोटो होतोय तुफान व्हायरल