जेव्हा कधी एखादा खेळाडू फलंदाजीसाठी खेळपट्टीवर येतो, तेव्हा त्याचा पहिला प्रयत्न असतो, तो एक धाव घेऊन खाते खोलण्याचा. मात्र, प्रत्येक वेळी हे शक्य होत नाही. अनेक खेळाडू शून्यावर बाद होऊन तंबूत परततात. रविवारी (८ मे) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्धच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विलियम्सन देखील एकही धाव न करता बाद झाला. विलियम्सन फक्त शून्यावर नाही, तर चक्क डायमंड डकवर बाद झाला. आपण या लेखात आयपीएलमधील अशा कर्णधारांची माहिती घेणार आहोत, जे डायमंड डकवर बाद झाले आहेत.
क्रिकेटमध्ये फलंदाज जेव्हा पहिल्या चेंडूवर एकही धाव न करता बाद होतो, तेव्हा त्याला ‘गोल्डन डक’ (Golden Duck) म्हटले जाते. जर फलंदाज दोन चेंडू खेळून शून्यावर बाद झाला, तर त्याला ‘सिल्वर डक’ (Silver Duck) असे म्हणतात. मात्र, ‘डायमंड डक’ (Diamond Duck) याला या दोन्हीपेक्षा दुर्दैवी म्हटले जाऊ शकते. जेव्हा फलंदाजाला एकही चेंडू खेळण्याची संधी मिळत नाही आणि तो विकेट गमावतो, तेव्हा त्याला डायमंड ‘डक’ म्हटले जाते. केन विलियम्सन (Kane Williamson) देखील रविवारी (दि. ०८ मे) अशाच प्रकारे डायमंड डकवर बाद झाला. आयपीएल २०२२मध्ये ही दुसरी वेळ आहे, जेव्हा एखादा कर्णधार डायमंड डकवर बाद झाला आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
आयपीएल २०२२मधील ५३वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झाला. या सामन्यात लखनऊचा कर्णधार केएल राहुल (KL Rahul) एकही चेंडू न खेळता धावबाद झाला. स्ट्राईकवर असलेल्या क्विंटन डी कॉकच्या चुकीमुळे नॉन स्ट्राईकवरील केएल राहुल धावबाद झाला आणि त्याला स्ट्राईकवर येण्याची वेळ आलीच नाही.
असेच काहीचे चित्र हंगामातील ५४व्या सामन्यात पाहायला मिळाले. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विलियम्सन नॉन स्ट्राईकवर असतानाच धावबाद झाला आणि एकही चेंडू खेळू शकला नाही. विलियम्सन आयपीएलच्या इतिहासात डायमंड डकवर बाद होणारा ६व्या क्रमांकाचा कर्णधार ठरला आहे. आयपीएलमध्ये डायमंड डकवर बाद होणाऱ्या खेळाडूंची यादी तशी मोठी आहे, पण ही नकोशी कामगिरी करणारे कर्णधार मात्र मोजकेच आहेत.
आयपीएलमध्ये डायमंड डकवर बाद होणाऱ्या कर्णधारांची यादी
शेन वॉर्न विरुद्ध मुंबई इंडियन्स, (४५वा सामना, आयपीएल २००९)
शेन वॉर्न विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, (२४वा सामना, आयपीएल २०१०)
गौतम गंभीर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, (४४वा सामना, आयपीएल २०१३)
इयोन मॉर्गन विरुद्ध राजस्थान रॉयल्स, (१८वा सामना, आयपीएल २०२१)
केएल राहुल विरुद्ध कोलकाता नाईट राइडर्स , (५३वा सामना, आयपीएल २०२२)
केन विलियम्सन विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, (५४वा सामना, आयपीएल २०२२)*