आयपीएल २०२२ चा मेगा लिलाव (IPL 2022) १२ आणि १३ फेब्रुवारीला होणार आहे. चाहत्यांची आयपीएल स्पर्धा आणि मेगा लिलाव (IPL mega auction) याविषयीची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत चाचली आहे. यावर्षी मेगा लिलावात अनेक मोठ्या खेळाडूंवर बोली लागताना दिसणार आहे. पण काही दिग्गज खेळाडू आहेत, ज्यांनी मेगा लिलावापूर्वी स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता या यादीत इंग्लंडचा अष्टपैलू आणि चेन्नई सुपर किंग्जसाठी मागचा हंगाम खेळलेला सॅम करन (sam curran) देखील सामील झाला आहे.
सॅम करनने स्वतःच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून पुढच्या आयपीएल हंगामात तो सहभागी होणार नसल्याची माहिती दिली आहे. तो नेट्समध्ये सरावासाठी उपस्थित झाला आहे, पण आयपीएलमध्ये सहभाग घेण्याचा कसलाच विचार त्याने केलेला नाही. त्याने लिहिले की, ‘दुर्दैवाने मी यावर्षी आयपीएलच्या लिलावात सहभागी होऊ शकणार नाही आणि माझ्या पुनर्वसनावर लक्ष केंद्रित करणार आहे. मी नेट्समध्ये परत आलो आहे आणि खूप चांगले वाटत आहे, त्यामुळे लवकरच पुनरागमनाची आशा आहे. स्पर्धेसाठी सर्वांना शुभेच्छा. मी सरे क्रिकेटसोबत नव्या सत्रात सहभागी होण्यास उत्सुक आहे.’ करनने मागच्या आयपीएल हंगामातील काही सामन्यातून पाठीच्या दुखापतीमुळे माघार घेतली होती. याच कारणास्तव त्याला आयसीसी टी२० विश्वचषकात देखील सहभाग घेता आला नव्हता.
It was agreed that sadly I should not enter the IPL auction this year and to focus on my rehabilitation. I’m back in the nets and feeling great so hope to be back soon, Wishing everyone all the best for the tournament. I look forward to starting the season with @surreycricket
— Sam Curran (@CurranSM) January 22, 2022
चेन्नई सुपर किंग्जचा माजी अष्टपैलू खेळाडू सॅम करनने आयपीएलमध्ये ३२ सामने खेळले आहेत आणि यामध्ये ३३७ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या दोन अर्धशतकांचा समावेश आहे. या धावा त्याने २२.४७ ची सरासरी आणि १४९.७८ च्या स्ट्राइक रेटने केल्या. तर गोलंदाजीत त्याने ३२ विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएल २०१९ मध्ये तो पहिल्यांदा पंजाब किंग्ज संघात सामील झाला होता. त्यानंतर आयपीएल २०२० मध्ये चेन्नई सुपर किंग्जने त्याला विकत घेतले. परंतु, आता पुढच्या हंगामापूर्वी त्याला चेन्नई संघाने रिटेन केले नाही.
दरम्यान, करनव्यतिरिक्त वेस्ट इंडीजचा धमाकेदार फलंदाज ख्रिस गेल, ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क, इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स आणि ख्रिस वोक्स, तसेच इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर यांनी देखील मेगा लिलावातून माघार घेतली आहे. यावर्षी मेगा लिलावासाठी १२१४ खेळाडूंनी नोंदणी केली आहे. यामध्ये ८९६ भारतीय आणि ३१८ विदेशी खेळांडूंचा समावेश आहे. या सर्व नोंदणी केलेल्या खेळाडूंपैकी ३५० ते ४०० खेळाडू प्रत्यक्ष लिलावात सहभागी होतील.
महत्वाच्या बातम्या –
हाराकिरीनंतरही पलटन विजय मिळवण्यात यशस्वी! मोहित गोयतचा अष्टपैलू खेळ
आयपीएल पुनरागमनासाठी श्रीसंत इच्छुक! ‘इतक्या’ बेस प्राईससह नोंदविले नाव
व्हिडिओ पाहा –