आयपीएलचा १५ वा हंगाम शनिवारी म्हणजेच २६ मार्च रोजी सुरू होणार आहे. पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स आमने सामने असतील. एसएस धोनी याचे चाहते त्याला सीएसकेचे नेतृत्व करताना पाहण्यासाठी उत्सुक होते, पण त्यापूर्वीच धोनीने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. धोनीने सीएसकेचे कर्णधारपद सोडले असून, त्याच्या या घोषणेनंतर चाहते खूपच निराश झाले आहेत.
एमएस धोनी (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्ज (CSK ) संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार झाला असला तरी, रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याच्या रूपात सीएसकेला नवीन आणि गुणवंत कर्णधार मिळाला आहे. ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा जडेजा एखाद्या आयपीएल संघाचे नेतृत्व करणार आहे. धोनीने कर्णधाराच्या रूपात आयपीएलमध्ये खूप मोठी कामगिरी केली आहे. त्याच्या नेतृत्वात सीएसकेने ४ आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत, तसेच संघ ९ वेळा अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला आहे.
जडेजा एकटाच नाहीय, जो या हंगामात पहिल्यांदा संघाचे नेतृत्व करत आहे. विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी दक्षिण अफ्रिकी दिग्गज फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) या हंगामात कर्णधाराची भूमिका पार पाडणार आहे. डू प्लेसिसला आयपीएलमध्ये नेतृत्वाची पहिल्यांदाच संधी मिळाली आहे.
तसेच मागच्या हंगामात पंजाब किंग्जचे नेतृत्व करणारा केएल राहुल (KL Rahul) आगामी हंगामात लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार आहे. अशात मंयक अगरवाल (Mayank Agarwal) पंजाब किंग्जच्या कर्णधाराच्या रूपात पहिल्यांदाच आयपीएल संघाचे नेतृत्व करणार आहे. अष्टपैलू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) मागच्या हंगामापर्यंत मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्त्व करत होता. परंतु, आगामी हंगामात त्याला गुजरात टायटन्सचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. हार्दिकची देखील आयपीएलमध्ये नेतृत्व करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
आयपीएलमध्ये नव्याने कर्णधार बनलेलल्या या खेळाडूंचा पुढचा प्रवास अधिक खडतर असणार आहे. कर्णधाराच्या रूपात धोनीने आयपीएलमध्ये सर्वाधिक १२१ सामने जिंकले आहेत. धोनीव्यतिरिक्त इतर कोणताही कर्णधार आयपीएलमध्ये १०० सामने जिंकू शकलेला नाहीय. रोहित शर्मा ७५ विजयांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच गौतम गंभीर ७१ विजयांसह तिसऱ्या क्रमाकंवार आहे.
महत्वाच्या बातम्या –
पाकिस्तानी फलंदाजाची सचिन तेंडुलकरशी ‘या’ कारणाने होतेय तुलना, आयसीसीने शेअर केलाय Video
आठवण ‘त्या’ सामन्याची, जेव्हा पाकिस्तानने बलाढ्य इंग्लंडला धूळ चारत उंचावला होता विश्वचषक
Video: जेव्हा एमएस धोनीने ‘असं’ करत केली होती जडेजाची बत्ती गुल; खुद्द ‘जड्डू’ही झालेला हँग