आयपीएल २०२२ची सुरुवात मुंबई इंडियन्ससाठी निराशाजनक राहिली आहे. चालू हंगामातील पहिले तिन्ही सामने मुंबई इंडियन्सने गमावले आहेत. आता संघाला त्याचा पुढचा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसोबत खेळायचा आहे, जो रविवारी (९ एप्रिल) पुण्याच्या एमसीएस स्टेडियमवर आयोजित केला गेला आहे. या सामन्यापूर्वी मुंबईचे गोलंदाजी प्रशिक्षक शेन बॉन्डने मोठी प्रतिक्रिया दिली आहे
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पहिला सामना ४ विकेट्सने गमावला. त्यानंतर राजस्थान रॉयल्सने दुसऱ्या सामन्यात त्यांना २३ धावा शिल्लक ठेऊन पराभूत केले. तिसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सला कोलकाता नाईट रायडर्सकडून ५ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला होता.
मुंबई इंडियन्सचे आयपीएलच्या चालू हंगामातील प्रदर्शन आतापर्यंत जरी निराशाजनक राहिले असले, तरी त्यांचे गोलंदाजी प्रशिक्षक शेन बॉन्ड (Shane Bond) यांना अपेक्षा आहे की, संघ लवकरच पुनरागमन करेल. बॉन्ड यांच्या म्हणण्यानुसार, पाच आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबईने जर ठरल्याप्रमाणे गोलंदाजी केली, तर संघ चांगले प्रदर्शन करू शकतो. आरसीबीविरुद्धच्या सामन्यापासून संघ या रणनीतीवर काम करणार आहे.
शेन बॉन्ड म्हणाले की, “याला ठीक करणे खूप सोपे आहे. जर आम्ही स्वतःच्या रणनीतीवर टिकून राहिलो आणि त्यानुसार गोलंदाजी केली, तर मला वाटते की, तुम्ही बदल पाहाल. जसे की मी सांगितले, आम्ही काही वेळा आमच्या रणनीतीत यशस्वी देखील ठरलो आहोत. आम्ही मागच्या सामन्यात आंद्रे रसेलच्या विरोधात चांगली गोलंदाजी केली होती. वेंकटेश अय्यरलाही आम्ही रोखण्यात बऱ्यापैकी यशस्वी ठरलो. आमच्या समोरचे सर्वात मोठे आव्हान दबावाच्या परिस्थितीत योग्य दिशेने गोलंदाजी करण्याचे आहे, ज्यामध्ये आम्ही आतापर्यंत अपयशी ठरलो आहोत.”
मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ-
ईशान किशन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा (कर्णधार), अनमोलप्रीत सिंग, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, टीम डेविड, डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स, बेसिल थंपी, सूर्यकुमार यादव, जयदेव उनादकट, फॅबियन एलन, संजय यादव, रिले मेरेडिथ, रमनदीप सिंह, मयंक मार्कंडे, आर्यन जुयाल, अर्जुन तेंडुलकर, रितिक शौकीन, राहुल बुद्धी, अर्शद खान, डेवाल्ड ब्रेविस.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
अगदी सचिनपासून ते धोनीपर्यंत, भारताच्या भल्या भल्या फलंदाजांना जे जमलं नाय ते शिखरने करुन दाखवलं
‘जिंकण्याची भूक दाखवा…’, कर्णधार रोहित शर्माने घेतली मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंची शाळा