मुंबई। मंगळवारी (१७ मे) इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात ६५ वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात पार पडला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात हैदराबादने अखेरच्या षटकात ३ धावांनी रोमांचकारी विजय मिळवला. या विजयानंतर हैदराबादने आयपीएल २०२२ मधील आपले आव्हान कायम राखत प्लेऑफमधील स्थानासाठीही आशा जिवंत ठेवल्या आहेत.
केन विलियम्सनच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबादच्या आशा जिवंत जरी असल्या, तरी त्यांचा पुढील प्रवास सोपा नसणार आहे. हैदराबाद सलग ५ विजयांनंतर अखेर मुंबई इंडियन्सविरुद्ध विजयी मार्गावर परतले आहेत. मात्र, त्यांचा मुंबई इंडियन्सविरुद्धचा विजय मोठा नव्हता. त्याचमुळे त्यांचा नेटरनरेट सुधारण्यास फार मदत झालेली नाही. त्यामुळे त्यांना प्लेऑफसाठी संधी असली, तरी अनेक गोष्टी बाकी संघांच्या निकालावर आणि नेटरनरेटवर अवलंबून आहेत.
हैदराबादने (Sunrisers Hyderabad) या आयपीएल हंगामात (IPL 2022) आत्तापर्यंत १३ सामने खेळले असून त्यातील ६ सामने जिंकले आहेत आणि ७ सामने पराभूत झाले आहेत. त्यामुळे त्यांचे सध्या १२ गुण असून ते -०.२३० च्या नेटरनरेटसह गुणतालिकेत ८ व्या क्रमांकावर आहेत. हैदराबादला आता अखेरचा साखळी सामना पंजाब किंग्सविरुद्ध खेळायचा आहे. हा सामना आयपीएल २०२२ हंगामातीलही अखेरचा साखळी सामना असणार आहे. त्यामुळे त्याआधी होणाऱ्या सामन्यांतूनच प्लेऑफचे संघ मिळू शकतात आणि हैदराबाद व पंजाबचे आव्हान संपू शकते. पंजाबचे देखील १२ गुण आहेत.
हैदराबाद आणि पंजाब सामन्यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स असे चार सामने होणार आहेत. या सामन्यांवरही प्लेऑफचे बरेच गणित अवलंबून असणार आहे.
गुजरात टायटन्सने प्लेऑफमध्ये (IPL 2022 Playoffs) आधीच जागा पक्की केली आहे. तसेच क्वालिफायर १ सामन्यातील त्यांची जागाही पक्की आहे. तसेच मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे दोन्ही संघ प्लेऑफच्या शर्यतीतून यापूर्वीच बाहेर गेले आहेत. त्यामुळे उर्वरित ७ संघ प्लेऑफमधील ३ जागांसाठी संघर्ष करत आहेत.
त्यातील राजस्थान आणि लखनऊ यांची प्लेऑफमधील जागा जवळपास पक्की आहे. तर, बेंगलोर आणि दिल्ली यांच्यात काट्याची टक्कर आहे. तसेच पंजाब, कोलकाता आणि हैदराबाद या तिन्ही संघांना संधी आहे, पण वाट कठीण आहे. राजस्थान आणि लखनऊ यांना अखेरच्या साखळी सामन्यातील विजय प्लेऑफमधील प्रवेश पक्का करून देईल. कारण त्यांचे सध्या प्रत्येकी १६ गुण आहेत. पण, जर पराभव झाला, तर नेटरनरेट, तसेच बेंगलोर आणि दिल्ली यांच्या सामन्यांच्या निकालावर पुढील गणित ठरेल. तरी, या दोन्ही संघांचा नेटरनरेट चांगला असल्याने दोन्ही संघांना प्लेऑफची सर्वाधिक संधी आहे.
त्यानंतर प्लेऑफसाठी बेंगलोर आणि दिल्ली हे दोन्ही संघ प्रबळ दावेदार आहेत. सध्या दोन्ही संघांचे १४ गुण आहेत. त्यामुळे अखेरच्या साखळी सामन्यात विजय मिळवणे दोन्ही संघांना गरजेचे आहे. या दोन्ही संघांनी एक संघ जिंकला आणि दुसरा पराभूत झाला, तर जो संघ जिंकला असेल, तो प्लेऑफमधील जागा पक्की करेल. पण, या दोन्ही संघांनी अखेरच्या सामन्यात पराभव किंवा विजय मिळवला, तर नेटरनरेट विचारात घ्यावा लागणार आहे.
आता, हैदराबाद, पंजाब आणि कोलकाताबद्दल बोलायचे झाल्यास त्यांचे प्रत्येकी १२ गुण आहेत. त्यामुळे त्यांना अखेरच्या साखळी सामन्यात विजय मिळवावाच लागणार आहे. त्याचबरोबर त्यांना आशा करावी लागणार आहे की दिल्ली आणि बेंगलोर संघ देखील अखेरचा साखळी सामना मोठ्या फरकाने पराभूत होतील. इतकेच नाही, तर तिन्ही संघांना अखेरच्या साखळी सामन्यात मोठा विजय मिळवण्याकडेही लक्ष द्यावे लागेल, कारण नेटरनरेट महत्त्वाचा ठरणार आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
दुखापतग्रस्त खेळाडूंचे मानधन ते अंपायर्सचा पगार, जाणून घ्या आयपीएलमधील काही रोचक फॅक्ट्स
वाढदिवस विशेष: अवघ्या १० धावांवर १० विकेट्स, त्यातही हॅट्रिक घेणारे अवलिया; वाचा त्यांच्याविषयी
सनरायझर्सची ‘वन मॅन आर्मी’ पुणेकर राहुल त्रिपाठी