आयपीएलचा १५वा हंगाम दिवसेंदिवस अधिक रोमांचक होत चालला आहे. हंगामातील साखळी फेरीचे सामने आता शेवटच्या टप्प्यात आले आहेत आणि प्लेऑफचे चित्र देखील स्पष्ट होऊ लागले आहे. चाहत्यांना प्लेऑफमध्ये कोणते चार संघ पोहोचतात, याची जशी उत्सुकता लागली आहे, तशीच उत्सुकता पर्पल कॅपविषयी देखील आहे. राजस्थान रॉयल्सचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल सध्या पर्पल कॅपच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे. रविवारी (८ मे) खेळल्या गेलेल्या डबल हेडर सामन्यानंतर पर्पल कॅपच्या शर्यतीत असणाऱ्यांच्या यादीत मोठा फेरबदल झाला आहे. चला तर या यादीवर एक नजर टाकूया.
राजस्थान रॉयल्सचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याच्याकडे सध्या पर्पल कॅप (Purple Cap) आहे. चहलने चालू हंगामात आतापर्यंत खेळलेल्या ११ सामन्यांमध्ये २२ म्हणजेच प्रत्येक सामन्यात २ अशा सरासरीने विकेट्स घेतल्या आहेत. रविवारच्या डबल हेडरचा पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. श्रीलंकेचा अष्टपैलू वनिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) याने या सामन्यात १८ धावा खर्च करून ५ विकेट्स घेतल्या आणि पर्पल कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला. हसरंगाने चालू हंगामात आतापर्यंत खेळलेल्या सामन्यांमध्ये २१ विकेट्स नावावर केल्या आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा