अहमदाबाद| इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२चा अंतिम सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात रंगला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात गुजरातने ७ विकेट्सने विजय मिळवत राजस्थानचे दुसऱ्यांदा आयपीएल विजेतेपद जिंकण्याचे स्वप्न भंग केले.
हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणारा गुजरात संघाचा हा पहिला-वहिला आयपीएल हंगाम आहे. कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांनी गुजरातसमोर १३१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. हा सामना गुजरातने ११ चेंडू शिल्लक राखत जिंकला.
हार्दिकने या सामन्यात अष्टपैलू कामगिरी केली. त्याने ४ षटकांमध्ये १७ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. तर फलंदाजीतही त्याने चुणूक दाखवत ३४ धावा केल्या. त्यामुळे त्याला सामनावीर पुरस्कारही जिंकला.
हा सामना जिंकताच हार्दिकने अनेक नवे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. २०१५ मध्ये आयपीएल पदार्पण करताना त्याने आतापर्यंत पाच आयपीएलचे अंतिम सामने खेळले आहेत. त्यातील चार सामने मुंबई इंडियन्सकडून, तर एक गुजरातकडून खेळला आहे. त्यामुळे तो आयपीएलचे सर्वाधिक विजेतेपद मिळवणाऱ्या खेळांडूमध्ये संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर आहे.
या यादीत मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा पहिल्या क्रमांकावर आहे. तर कायरन पोलार्ड आणि अंबाती रायुडू पाच विजेतेपद जिंकत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी चार विजयाच्या चषकासह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
आयपीएलचे सर्वाधिक विजेतेपद जिंकणारे खेळाडू-
१. रोहित शर्मा – ६
२. हार्दिक पंड्या * – ५
२. कायरन पोलार्ड -५
२. अंबाती रायुडू – ५
३. एमएस धोनी – ४
४. लसिथ मलिंगा – ४
त्याचबरोबर आयपीएलचा पहिला चषक जिंकण्यासाठी सर्वात कमी सामने खेळणाऱ्या कर्णधारांच्या यादीत हार्दिक दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याला चषक जिंकण्यासाठी १५ सामने खेळावे लागले. तर या यादीत पुन्हा एकदा रोहित अव्वल स्थानावर आहे. त्याने २०१३मध्ये रिकी पॉटींग नंतर मुंबईचे कर्णधारपद सांभाळले होते. त्यावेळी त्याच्या नेतृत्वाखाली संघाने अंतिम सामन्यात चेन्नईला २३ धावांनी पराभूत करत पहिले आयपीएलचे विजेतेपद जिंकले होते. तेव्हा रोहित कर्णधार म्हणून १३ सामने खेळला होता.
आयपीएलचा चषक जिंकण्यासाठी सर्वात कमी सामने खेळणारे कर्णधार
१३ – रोहित शर्मा
१५ – हार्दिक पंड्या*
१५ – शेन वॉर्न
२४ – ऍडम गिलख्रिस्ट
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
प्रशिक्षक मॅक्युलमसाठी कसोटीमध्ये पुनरागमन करणार इंग्लंडचे ‘हे’ दोन दिग्गज खेळाडू
पैसाच पैसा! आयपीएलच्या टीम मालकांची एकूण संपत्ती माहितीय का? पाहा अंबानी ते काव्या मारनपर्यंतची यादी