आयपीएल २०२२ पूर्वी ८ फ्रँचायझींना त्यांचे महत्त्वाचे खेळाडू रिटेन करण्याची संधी मिळाली आहे. त्याची अंतिम मुदत मंगळवारी (३० नोव्हेंबर) संपेल. आयपीएल २०२२ रिटेन्शन नियमांनुसार, प्रत्येक संघ फक्त ४ खेळाडू रिटेन करू शकतो. ज्यामध्ये ३ पेक्षा जास्त भारतीय आणि २ पेक्षा जास्त परदेशी खेळाडू असू शकणार नाही. राजस्थान रॉयल्सचे मागील ३ हंगाम खराब गेले आहेत. त्यामुळे या संघाकडून कोणते खेळाडू कायम केले जाणार आणि कोणत्या खेळाडूंना सोडले जाणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. राजस्थान बेन स्टोक्सला सोडू शकतो, असे मानले जात आहे. जाणून घेऊ या संघात कोणते चार खेळाडू राहू शकतात.
राजस्थान रॉयल्स प्रथम संजू सॅमसनला रिटेन करू शकतो. धडाकेबाज फलंदाज असण्यासोबतच हा खेळाडू चांगला यष्टिरक्षक आणि कर्णधारही आहे. सॅमसन तरुण खेळाडू आहे, त्यामुळे राजस्थान रॉयल्सच्या व्यवस्थापनाला संजूला रिटेन करण्यास नक्कीच आवडेल. संजू सॅमसनने गेल्या हंगामात ४०.३३ च्या सरासरीने ४८४ धावा केल्या होत्या.
राजस्थान रॉयल्स आयपीएल २०२२ साठी जोस बटलरलाही रिटेन करू शकते. गेल्या हंगामात बटलर फक्त स्पर्धेचा पूर्वार्ध खेळला होता. पण सध्याच्या काळात बटलरसारखा क्वचितच दुसरा टी२० फलंदाज आहे. टी२० विश्वचषकात बटलरने शानदार फलंदाजी करत इंग्लंडला उपांत्य फेरीत नेले होते.
जोफ्रा आर्चर हा तिसरा खेळाडू असू शकतो, ज्याला राजस्थान रॉयल्स संघात रिटेन करू शकते. आर्चर दुखापतीमुळे गेल्या हंगामात खेळला नव्हता. मात्र, जानेवारीपासून तो क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करू शकतो. आर्चर त्याच्या वेगासाठी आणि उत्कृष्ट लाईन आणि लेंथसाठी ओळखला जातो. राजस्थान रॉयल्स या खेळाडूला संघात नक्कीच रिटेन करू शकते.
यशस्वी जयस्वाल हा चौथा खेळाडू असू शकतो ज्याला राजस्थान फ्रँचायझी कायम ठेवू शकते. गेल्या हंगामात जयस्वालने शानदार फलंदाजी केली. या शर्यतीत जयस्वालसोबत वेगवान गोलंदाज चेतन साकारियाही असल्याचे बोलले जात आहे.