इंडियन प्रीमियर लीगच्या १५ व्या हंगामातील १० वा सामना गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन संघांमध्ये खेळला गेला. हा सामना गुजरातने १४ धावांनी जिंकला. यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली पुण्याच्या एमसीए स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. दिल्लीचा हा पहिलाच पराभव आहे.
दिल्लीने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. गुजरातने २० षटकात ६ विकेट्स गमावत १७१ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली (Delhi Capitals) संघ ९ विकेट्स गमावत २० षटकात १५७ धावा करु शकला. या सामन्यानंतर रिषभ पंतने पराभवाचे खापर फलंदाजांच्या डोक्यावर फोडले आहे. खेळपट्टी पाहता दिल्लीला हे लक्ष्य गाठणे सोपे असल्याचे त्याने म्हटले आहे.
रिषभ (Rishabh Pant) सामन्यानंतर म्हणाला, “खेळपट्टी पाहता धावसंख्या खूप जास्त नव्हती. आम्ही मधल्या षटकांमध्ये उत्तम फलंदाजी करु शकलो असतो. परंतु विकेट गमावल्यानंतर सामन्यात पुनरागमन करणे अवघड होते. जेव्हा तुमचा संघ असा पराभूत होतो तेव्हा मन नाराज होते, परंतु आपण पुढच्या सामन्यात सुधारणा करु शकतो.” दिल्ली संघाचा हा पहिलाच पराभव आहे, पहिला सामना संघाने मुंबईविरुद्ध जिंकला आहे, तर हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली संघाने सलग दूसरा विजय मिळवला आहे.