मुंबई इंडियन्स संघाचा युवा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकर याने 16 एप्रिल रोजी आयपीएल 2023च्या 22व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध पदार्पण केले. या सामन्यात त्याला विकेट मिळाली नव्हती. मात्र, त्याने लक्षवेधी गोलंदाजी केली. असे असले, तरीही त्याने पंजाब किंग्सविरुद्ध आपल्या तिसऱ्या सामन्यात खराब गोलंदाजी केली. त्याने 3 षटके गोलंदाजी करताना सर्वाधिक 48 धावा खर्च करत एक विकेट घेतली. त्याच्या या प्रदर्शनानंतर त्याच्यावर जोरदार टीकाही झाली. अशात आता ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने मोलाचा सल्ला दिला आहे. ब्रेट ली म्हणाला की, जर अर्जुन तेंडुलकर याने एक खास गोष्ट केली, तर तो ताशी 140 किमीच्या गतीने गोलंदाजी करू शकतो.
‘अर्जुन तेंडुलकरने टीकाकारांवर लक्ष देऊ नये’
अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) याची गती तितकी जास्त नाहीये. त्याबाबत ब्रेट ली (Brett Lee) याने मोलाचा सल्ला दिला. एका कार्यक्रमात प्रश्नाचे उत्तर देताना तो म्हणाला की, “जेव्हा त्याला सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात अखेरच्या षटकांमध्ये बचाव करण्यासाठी गोलंदाजी देण्यात आली, तेव्हा मुंबई इंडियन्सला सामना जिंकून दिला होता. त्याच्यासाठी हा खूपच चांगला अनुभव राहिला असेल. एकूणच त्याला कठीण परिस्थितीत टाकण्यात आले आणि त्याच्यासाठी ही चांगली गोष्ट आहे. तो सातत्याने शिकत आहे. त्याव्यतिरिक्त त्याच्या गोलंदाजीविरुद्ध पुढील सामन्यात धावा करण्यात आल्या, पण टी20 क्रिकेटमध्ये असेच होते. मी नेहमी म्हटले आहे की, या क्रिकेट प्रकारात असेच होते. माझ्यासोबत अनेकदा असे झाले होते. त्यामुळे तुम्हाला तुझ्या भावनांना बाहेर ठेवावे लागेल.”
“लोक प्रत्येक गोष्टीची टीका करतात. जर तुम्ही संदीप शर्माला पाहिले, तर तो ताशी 120 किमी गतीने चेंडू टाकू शकतो. अर्जुन तेंडुलकर त्याच्यापेक्षा अधिक वेगाने गोलंदाजी करत आहे. आता तो फक्त 23 वर्षांचाच आहे आणि त्याची संपूर्ण कारकीर्द बाकी आहे. माझा त्याला हा सल्ला आहे की, टीकाकारांवर लक्ष देऊ नको. त्याच्या वडिलांसोबतही सुरुवातीला असेच झाले होते. तो जसा संघाच्या वातावरणात मिसळून जाईल, तसा तो ताशी 140 किमी गतीने गोलंदाजी करू शकतो.”
अर्जुन तेंडुलकर याने रविवारी (दि. 16 एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आयपीएल पदार्पण केले होते. त्याने पदार्पणात एकही विकेट घेतली नव्हती. मात्र, त्याच्यावर पुढील सामन्यात हैदराबादविरुद्ध शेवटचे षटक टाकत 20 धावांचा बचाव करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. यावेळी त्याने भुवनेश्वर कुमारच्या रूपात पहिली विकेट घेतलीच, पण संघाला सामनाही जिंकून दिला होता. मात्र, पंजाब किंग्सविरुद्ध खेळताना त्याला चांगली गोलंदाजी करता आली नाही. तो खूपच महागडा ठरला.
मुंबईचा पुढील सामना मंगळवारी (दि. 25 एप्रिल) गुजरात टायटन्सविरुद्ध आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पार पडणार आहे. (ipl 2023 brett lee important advice for fast bowler arjun tendulkar)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रहाणेच्या कसोटी कमबॅकवर चाहते भलतेच खुश; म्हणाले, ‘परमेश्वरा अपयश दे, पण…’
दिग्गजाचे पुनरागमन, तर हुकमी एक्का संघातून बाहेर; पाहा WTC Finalसाठी निवडलेली 15 सदस्यीय टीम इंडिया