मोहित शर्मा गुजरात टायटन्स संघाचा हिरो बनता-बनता राहिला. आयपीएल 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाकडून गुजरातचा 5 विकेट्सने नजीकचा पराभव झाला. रविवारी (दि. 28 मे) होणारा सामना राखीव दिवशी खेळला गेला. गुजरातकडून मोहितला अखेरच्या षटकात 13 धावांचा बचाव करायचा होता. त्याने पहिल्या चार चेंडूंवर फक्त 3 धावा खर्च केल्या. त्यानंतर पुढील दोन्ही चेंडूंवर रवींद्र जडेजा याने लाँग ऑनच्या दिशेने षटकार आणि नंतर फाइन लेगवर चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला. यासोबतच चेन्नई संघाने पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी आपल्या नावावर केली.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळल्या गेलेल्या आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मोहित शर्मा (Mohit Sharma) याने 3 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. तो म्हणाला की, सामन्यानंतर त्याला हलतादेखील येत नव्हते. गतविजेत्या गुजरात टायटन्स संघानेही या हंगामात जबरदस्त कामगिरी केली. साखळी फेरीत गुजरातने अव्वलस्थानी राहून अंतिम सामन्यात जागा मिळवली.
काय म्हणाला मोहित?
मोहितने आयपीएल 2023 हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसरा क्रमांक पटकावला आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या चेपॉक स्टेडिअमवरील दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात त्याने पाच विकेट्स घेतल्या होत्या.
माध्यमांशी बोलताना मोहित म्हणाला की, “मी झोपू शकलो नाही. विचार करत राहिलो की, सामना जिंकण्यासाठी वेगळं काय करू शकलो असतो. जर मी पहिला चेंडू हा टाकला असता किंवा तो टाकला असता, तर कसं झालं असतं? ही एक चांगली भावना नाहीये. कुठे ना कुठे काही गमावलं आहे, पण मी पुढे येण्याचा प्रयत्न करत आहे.”
तो म्हणाला की, तो योग्यप्रकारे यॉर्कर टाकू शकला नाही, ज्याचा फायदा जडेजाने घेतला. मोहित म्हणाला की, “मी धावलो आणि पुन्हा यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला. मी फक्त लक्ष केंद्रित करणे आणि स्वत:वर विश्वास ठेवू इच्छित होतो. संपूर्ण आयपीएलमध्ये आम्ही असेच केले होते. तो चेंडू तिथे पडला, जिथे पडायला नको होता आणि जडेजाच्या बॅटवर जाऊन लागला. मी प्रयत्न केला, मी माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला.”
पुढे बोलताना मोहित असेही म्हणाला की, “माझा विचार स्पष्ट होता की, मला काय करायचे आहे. नेट्समध्येही मी अशा परिस्थितीसाठी तयारी केली आहे. शिवाय मी अशा परिस्थितीत खेळलोही आहे. त्यावेळी मी विचार केला की, सर्व चेंडू यॉर्कर फेकतो आणि मी जे ठरवलं होतं, त्यावर विश्वास ठेवत होतो.”
मोहितची हंगामातील कामगिरी
मोहितने हंगामात 14 सामने खेळले. त्यात त्याने 8.17च्या इकॉनॉमी रेटने 27 विकेट्स घेतल्या. तो गुजरातसाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आहे. त्याच्याव्यतिरिक्त अव्वलस्थानी मोहम्मद शमी असून त्याने 28 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, तिसऱ्या स्थानी राशिद खान असून त्याने 17 सामन्यात 27 विकेट्स घेतल्या आहेत. (ipl 2023 final after gujarat titans lost to csk mohit sharma said this know here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तू जाऊन बिंधास्त खेळ…’, धोनीकडून फ्री हँड मिळताच पठ्ठ्याने गोलंदाजांना चोप चोप चोपले, वाचा सविस्तर
IPL 2023मध्ये अजिंक्य रहाणे कसा बनला विस्फोटक फलंदाज? चेन्नईच्या हेड कोचने सांगितलं गुपीत