सध्या इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धा अखेरच्या टप्प्याकडे जात आहे. यामध्ये एकीकडे नवखे खेळाडू दणादण विकेट्स घेत आहेत, तर अनुभवी गोलंदाजांना विकेट्स घेण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. या खेळाडूंमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचा दिग्गज फिरकीपटू सुनील नारायण याच्या नावाचाही समावेश आहे. नारायण या हंगामात फार चांगली कामगिरी करू शकला नाहीये. त्याला आयपीएल 2023 स्पर्धेत अधिक विकेट्सही घेता आले नाहीयेत. तो चेंडूसोबतच बॅटमधूनही खास प्रदर्शन करू शकला नाहीये. एकूणच त्याच्यासाठी हा हंगाम चांगला गेला नाही. त्याला सातत्याने संधी मिळत राहिल्या, पण त्या संधीचं सोनं करण्यात तो कमी पडला. असे असले, तरीही तो चेन्नई सुपर किंग्स संघाविरुद्धच्या सामन्यात चमकला. यावेळी त्याने मोठे भाष्य केले.
सुनील नारायण (Sunil Narine) याने चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध पार पडलेल्या आयपीएल 2023च्या 61व्या सामन्यात कौतुकास्पद कामगिरी केली. त्याने 4 षटके गोलंदाजी करताना 15 धावा खर्च करून 2 विकेट्स घेतल्या. या सामन्यानंतर त्याने सांगितले की, अखेर त्याला हंगामात अधिक विकेट्स का घेता आल्या नाहीत.
सुनील नारायणची प्रतिक्रिया
सीएसकेविरुद्धच्या सामन्यानंतर सुनील नारायण याने सांगितले की, तो आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेत जास्त विकेट घेण्यात यशस्वी का झाला नाही. या हंगामातील संघर्षाबद्दल बोलताना त्याने म्हटले की, “या हंगामात मी तितकी चांगली कामगिरी करू शकलो नाही. कारण, कदाचित खेळपट्ट्या या हंगामात चांगल्या आहेत आणि अतिरिक्त फलंदाज आल्यामुळेही फरक पडला. मात्र, त्यांचा सामना करण्यासाठी आम्हाला त्या हिशोबाने खेळावेही लागेल.”
‘गोष्टी सामान्य ठेवल्या पाहिजेत’
चेन्नईविरुद्ध नारायणने 4 षटकात फक्त 15 धावा खर्च करून 2 मोठ्या विकेट्स नावावर केल्या. या प्रदर्शनानंतर त्याने म्हटले की, “तुम्हाला योजनेसोबत उतरायचे आहे. मात्र, अनेकदा तुम्ही गोष्टी सामान्य ठेवल्या पाहिजेत. तसेच, तुमच्या क्रिकेटचा आनंद लुटला पाहिजे.”
चेन्नईविरुद्ध घेतल्या 2 विकेट्स
खरं तर, 14 मे रोजी चेपॉकमध्ये झालेल्या सामन्यात त्याने 11व्या षटकातील पहिल्या चेंडूवर विकेट घेतली होती. नारायणने आधी अंबाती रायुडू याला 4 धावांवर बाद केले. त्यानंतर याच षटकातील अखेरच्या चेंडूवर त्याने मोईन अली यालाही त्रिफळाचीत केले होते.
सामन्याविषयी बोलायचं झालं, तर कोलकाता नाईट रायडर्स संघाने चेन्नई सुपर किंग्सला त्यांच्याच एमए चिदंबरम या घरच्या स्टेडिअमवर पराभूत केले. चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 विकेट्स गमावत 144 धावा केल्या होत्या. हे आव्हान केकेआर संघाने अवघ्या 18.3 षटकात 4 विकेट्स गमावत पार केले. (ipl 2023 kkr spinner sunil narine reacts on not taking wickets in this season know here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या–
राजस्थान 59 धावांवर Allout होऊनही विराट नाही खुश! म्हणाला, ‘मी बॉलिंग केली असती, तर फक्त…’
भारतीय दिग्गजाने सांगितले IPL 2023मधील सर्वोत्तम फिनिशरचे नाव, समोर कुणीही असो बॅटमधून ओकतो आग