आयपीएल 2023चा 33वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला. अजिंक्य रहाणे याच्या धमाकेदार फलंदाजीच्या जोरावर सीएसकेने चालू आयपीएल हंगामातील सर्वात मोठी धावसंख्या केली आणि विजय देखील मिळवला. केकेआरला 49 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. इंग्लंडचा माजी विश्वविजेता कर्णधार इऑन मॉर्गन यानेही रहाणेच्या प्रदर्शनाचे कौतुक केले.
सीएसके आणि केकेआर (CSK vs KKR) यांच्यातील सामना कोलकाताच्या इडन गार्डन स्टेडियमवर खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना सीएसकेने 235 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात केकेआर संघ 20 षटकात 8 बाद 186 धावांपर्यंत मजल मारू शकला. रविवारी (23 एप्रिल) सीएसकेला केकेआरविरुद्ध विजय मिळाल्यानंतर गुणतालिकेत संघ पहिल्या क्रमांकावर पहोचला. हंगामातील पहिल्या सात पैकी पाच सामन्यात सीएसकेला विजय मिळला आहे. संघाच्या या यशामध्ये अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याचे योगदान महत्वाचे राहिले आहे. रविवारी त्याने सीएसकेसाठी 29 चेंडूत 71* धावांची खेळी केली. हंगामातील पाच सामन्यात सीएसकेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे, ज्यामध्ये त्याने 209 धावा केल्या. यादरम्यान त्याची सरासरी 52.25, तर स्ट्राईक रेट 199.04 होता.
चालू आयपीएल हंगामातील रहाणेचा फॉर्म पाहून इऑन मॉर्गन चांगलाच प्रभावित झाल्याचे पाहायला मिळाले. जिओ सिनेमावर मॉर्गन म्हणाला, “रहाणेने स्वतःचा पूर्णपणे नव्याने शोध घेतला आहे. ही अजिंक्य रहाणेपेक्षा ब्रँडन मॅक्युलमच्या स्टाईलची बॅटिंग वाटत होती. या स्पर्धेत त्याचा स्ट्राईक रेट आकाशाला स्पर्श करू लागला आहे. अनेक शॉट्स अप्रतिम आणि अतुलनीय होते. आता स्टीफन फ्लेमिंग आणि एमएस धोनी त्यांच्या फलंदाजांना कशा पद्धतीने मोकळीक देतात, हे पाहावे लागेल.” मॉर्गनने यावेळी ऋतुराज गायकवाड आणि डिवॉन कॉनवे यांचेही कौतुक केले.
सलामीवीर ऋतुराजने या सामन्यात 35, तर डेवॉन कॉनवे याने 56 धावांची खेळी केली. याविषयी मॉर्गन म्हणाला, “दोघेही यावेळी खूप आत्मविश्वासाने खेळत आहेत आणि वेगाने धावाही करत आहेत. तुमच्याकडे जर असे समीकरण असेल, तर त्यांना रोखणे कठीण जाते. खासकरून इडन गार्डन्ससारख्या मैदानावर.” दरम्यान, फलंदाजांप्रमाणेच सीएसकेच्या गोलंदाजी आक्रमणाने देखील या सामन्यात महत्वपूर्ण भूमिका पार पाडली. तुषार देशपांडे आणि महिशा थिक्षाणा यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. तर आकाश सिंग, मोईन अली, रविंद्र जडेजा आणि मथिशा पथिराना यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. (Eoin Morgan praises Ajinkya Rahane)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
कोलकात्यात मिळालेल्या प्रेमाने भारावला धोनी! म्हणाला, “तुम्ही मला निरोप देण्यासाठी…”
वाढदिवस विशेष: सचिन विरुद्ध ऑस्ट्रेलिया…