Robin Minz IPL 2024: मंगळवारी (दि. 19 डिसेंबर) आगामी आयपीएल 2024 हंगामासाठी दुबईत मिनी लिलाव पार पडला. या लिलावात आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंनी धमाल केलीच, पण भल्याभल्या क्रिकेटपटूंना मागे टाकत अनकॅप्ड खेळाडूही चांगलेच मालामाल झाले. या यादीत झारखंडच्या रॉबिन मिंज याच्या नावाचाही समावेश आहे. 20 लाखांच्या बेस प्राईजमध्ये लिलावात उतरलेल्या रॉबिनला गुजरात टायटन्स संघाने 3.60 कोटी रुपयांना आपल्या ताफ्यात सामील केले. विशेष म्हणजे, रॉबिनच्या वडिलांना एमएस धोनीने वचन दिले होते, त्याचा खुलासाही त्याच्या वडिलांनी केला.
रॉबिन मिंजचे वडील काय म्हणाले?
रॉबिन मिंज (Robin Minz) याचे वडील फ्रान्सिस झेवियर (Francis Xavier) हे माजी लष्करी जवान असून सध्या रांची विमानतळावर सुरक्षा रक्षकाचे काम करत आहेत. लिलावानंतर रॉबिनच्या भावूक वडिलांनी सांगितले की, ते काही दिवसांपूर्वी महेंद्र सिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) याला रांची विमानतळावर भेटले होते. त्यादरम्यान माजी भारतीय कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याने त्यांना म्हटले होते की, “जर लिलावात कोणत्याही संघाने रॉबिन मिंजला खरेदी केले नाही, तर चेन्नई सुपर किंग्स त्याला नक्कीच संघात घेईल.”
आयपीएल 2024 हंगामात झारखंडचा रॉबिन मिंज धमाल करताना दिसेल. रॉबिन हा झारखंडचा पहिला आदिवासी क्रिकेटपटू आहे, जो आयपीएल खेळताना दिसेल. गुजरात टायटन्स संघाने त्याच्यावर आयपीएळ 2024 लिलावात मोठी रक्कम खर्च करत आपल्या संघाचा भाग बनवले आहे. रॉबिनला गुजरातने 3 कोटी 60 लाख रुपयांमध्ये आपल्या संघात सामील केले. रॉबिनला खरेदी करण्यासाठी अनेक संघांमध्ये टक्कर पाहायला मिळाली, पण गुजरातने या पठ्ठ्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले.
कोण आहे रॉबिन मिंज?
यष्टीरक्षक फलंदाज रॉबिन मिंज हा रांचीहून 15 किमी दूर नामकुम या ठिकाणचा रहिवासी आहे. तो धोनीला आपला आदर्श मानतो. रॉबिन रांचीत सोनेट क्लबकडून खेळतो. माजी रणजी खेळाडू एसपी गौतम आणि आसिफ यांच्याकडून तो क्रिकेटचे धडे घेतो. त्याच्या प्रसिक्षकाचं नाव आसिफ आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्याने प्रशिक्षण घेतले आहे. यावर्षी मुंबई इंडियन्स संघाने 30 खेळाडूंचे इंग्लंडमध्ये शिबिर लावले होते. मुंबईने त्याचा खेळ पाहिल्यानंतर त्यालाही आपल्या शिबिरात सामील करून घेतले होते. तसेच, त्याच्या प्रशिक्षणाची जबाबदारीही उचलली. यानंतर रॉबिनने इंग्लंडमध्ये प्रशिक्षण घेतले. खरं तर, यापूर्वी रॉबिन चार आयपीएल संघांच्या ट्रायलमध्ये अपयशी ठरला होता.
रॉबिनने 2020-21दरम्यान 19 वर्षांखालील ओपन ट्रायलच्या पहिल्याच सामन्यात 60 धावांची वादळी खेळी केली होती. त्या खेळीत त्याने 5 षटकारही मारले होते. (ipl 2024 auction cricketer robin minz emotional father said dhoni had said if no one will buy it we will buy it gujarat giants)
हेही वाचा-
IPL 2024 । 6 लाखाहून जास्त रुपयांना पडणार ऑस्ट्रेलियन कर्णधाराचा एक चेंडू, मिचेल स्टार्क…
गुजरात टायटन्सचा कर्णधार म्हणून गिल हिट की फ्लॉप? मुख्य प्रशिक्षकाचे विचारपूर्वक उत्तर