आयपीएलपूर्वीच्या मिनी लिलावात चेन्नई सुपर किंग्जनं भारताच्या एका अनकॅप्ड खेळाडूवर मोठा सट्टा खेळला होता. या खेळाडूला आपल्या संघात समाविष्ट करण्यासाठी चेन्नईनं तब्बल 8.4 कोटी रुपये खर्च केले होते. आता हा फलंदाज संघानं दाखवलेल्या विश्वासावर पूर्णपणे खरा उतरला आहे. या फलंदाजाचं नाव आहे समीर रिझवी. समीरने त्याच्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात एका दमदार षटकारानं केली, जो षटकार त्यानं दिग्गज गोलंदाज राशिद खानला लगावला.
गुजरात विरुद्धच्या सामन्यात शिवम दुबे 51 धावांवर बाद झाल्यानंतर समीर रिझवी क्रीझवर आला. राशिद खानने समीरला पहिला चेंडू पॅडवर टाकला, जो या तरुण फलंदाजानं लेग साइडच्या दिशेनं षटकारासाठी टोलावला. समीरच्या आयपीएल कारकिर्दीतील हा पहिलाच चेंडू होता. इतकंच नाही तर त्याच षटकातील शेवटच्या चेंडूवर समीरनं पुन्हा एकदा आपलं कसब दाखवत पावलांचा उपयोग करून राशिदला आणखी एक षटकार मारला.
तीन चेंडूत समीरच्या बॅटमधून निघालेले दोन षटकार पाहून ड्रेसिंग रूममध्ये उपस्थित असलेला महेंद्रसिंह धोनीही खूश झाला. माहीच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. मात्र, समीरला जास्त मोठी खेळी खेळता आली नाही. तो 6 चेंडूत 14 धावा करून मोहित शर्माच्या गोलंदाजीत बाद झाला. डेव्हिड मिलरनं त्याचा झेल घेतला.
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जनं 20 षटकांत 6 गडी गमावून 206 धावा केल्या. चेन्नईकडून शिवम दुबेनं स्फोटक फलंदाजी करत अवघ्या 23 चेंडूत 51 धावांची जलद खेळी केली. तर कर्णधार ऋतुराज गायकवाडनं 36 चेंडूत 46 धावांचं योगदान दिलं. रचिन रवींद्रनं पुन्हा एकदा जोरदार फटकेबाजी करत अवघ्या 20 चेंडूत 46 धावा केल्या. शेवटच्या षटकांमध्ये समीर रिझवीने केलेल्या दमदार फलंदाजीमुळे सीएसके मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरली.
गुजरातला 207 धावांचं मोठं लक्ष्य पेलवलं नाही. संघ निर्धारित 20 षटकांत 8 गडी गमावून अवघ्या 143 धावा करू शकला. अशाप्रकारे चेन्नईनं 63 धावांनी दणदणीत विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या-
टी20 क्रिकेटमध्ये हे दुर्मिळच! गुजरातविरुद्ध ऋतुराज-रहाणेचा अनोखा कारनामा
वय फक्त आकडा! 42वर्षीय धोनीची जबरदस्त डाईव्ह, झेल पकडल्यावर सहकारीही आश्चर्यचकित
IPL 2024 । ऋतुराजच्या नेतृत्वात सीएसकेचा सलग दुसरा विजय, गुजरातवर 63 धावांनी मात