आयपीएल 2024 चा पहिला सामना 22 मार्च रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला गेला. आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संघानं निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 173 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या सीएसकेच्या जवळपास सर्वच खेळाडूंनी चांगली सुरुवात केली. मात्र त्यापैकी एकही खेळाडू मोठी खेळी खेळू शकली नाही. मात्र अखेरीस शिवम दुबे आणि रवींद्र जडेजाच्या भागीदारीच्या जोरावर चेन्नईनं 6 विकेट्सनं विजय मिळवला.
पराभवानंतर आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसनं आपली प्रतिक्रिया दिली आहे. फाफच्या मते आरसीबीचे फलंदाज धावा गोळा करण्यात अपयशी ठरले. “चेन्नई मधल्या षटकांमध्ये चांगलं खेळते आणि फिरकी गोलंदाजीनं दडपण निर्माण करते. दुर्दैवानं, आम्ही पहिल्या 6-7 षटकांमध्ये खूप विकेट गमावल्या. यामुळे नंतर येणाऱ्या फलंदाजांना सांभाळून खेळावं लागलं. खेळपट्टी खूप चांगली होती. पण माझ्या मते आम्ही 15-20 धावा कमी केल्या. आम्ही सामन्यात सतत पुढे राहण्याचा प्रयत्न करत होतो, मात्र चेन्नईच्या फलंदाजीची रणनीती अशी होती की आम्ही ते करू शकलो नाही. आम्ही उसळत्या चेंडूंवरही विकेट घेण्याचा प्रयत्न केला, पण यश मिळालं नाही. मधल्या षटकांमध्ये आम्ही अपयशी ठरलो आणि धावा कमी राहिल्या”, असं फाफ म्हणाला.
सीएसकेची धावगती सुरुवातीपासूनच उत्कृष्ट होती. परंतु एक वेळी अशी आली जेव्हा संघानं 110 धावांत 4 विकेट गमावल्या होत्या. एकापाठोपाठ एक विकेट गमावल्यामुळे चेन्नईवर थोडसं दडपण आलं होतं. दरम्यान, शिवम दुबेनं 28 चेंडूत 34 आणि रवींद्र जडेजानं 17 चेंडूत 25 धावा करत संघाला सावरलं. त्यांची 66 धावांची भागीदारी शेवटपर्यंत कायम राहिली आणि शिवम दुबेनं 19व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर चौकार मारून संघाचा विजय निश्चित केला. अशाप्रकारे चेन्नई सुपर किंग्जनं आयपीएल 2024 ची सुरुवात शानदार विजयानं केली.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2024 । सलग 16 वर्ष सीएसकेला चेपॉकची साथ! हंगामातील पहिल्याच सामन्यात आरसीबी 6 विकेट्सने पराभूत
आयपीएल हंगामातील पहिल्याच सामन्यात ‘सुपर कॅच’, रहाणेच्या चपळाईमुळे विराट तंबूत