आयपीएल 2024 सुरू होण्यापूर्वी एक अहवाल समोर आला होता की, हा हंगाम आरसीबीचा यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकचा शेवटचा हंगाम असू शकतो. आयपीएल 2024 नंतर तो या लीगसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करेल. आता दिनेश कार्तिकनं स्वतः याची पुष्टी केली आहे. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यानंतर तो या संदर्भात बोलला.
38 वर्षीय दिनेश कार्तिकला चेन्नई विरुद्ध बंगळुरू सामन्यानंतर पत्रकार परिषदेत विचारण्यात आलं की, चेपॉकमधील हा तुझा शेवटचा सामना असू शकतो का? यावर हा अनुभवी खेळाडू म्हणाला, “हा खूप चांगला प्रश्न आहे. असं होऊ नये अशी माझी इच्छा आहे, कारण येथे काही प्लेऑफचे सामने होऊ शकतात. जर चेपॉकमध्ये प्लेऑफचे सामने झाले आणि माझा संघ टॉप-4 मध्ये पोहोचला तर मी या मैदानावर खेळताना दिसेल. अन्यथा हा माझा या मैदानावरील शेवटचा सामना असू शकतो.”
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला आयपीएल 2024 च्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध पराभवाला सामोरं जावं लागलं. या सामन्यात दिनेश कार्तिकनं 26 चेंडूत 38 धावांची नाबाद खेळी खेळली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं 20 षटकांत 6 गडी गमावून 173 धावा केल्या.
कर्णधार फाफ डू प्लेसिस (35) सोबत विराट कोहली (21) यांनी संघाला झंझावाती सुरुवात करून दिली. मात्र डू प्लेसिस बाद झाल्यानंतर आरसीबीला रजत पाटीदार आणि ग्लेन मॅक्सवेलच्या रूपानं दोन एकापाठोपाठ एक धक्के बसले. दोन्ही खेळाडू खातं न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतले. यानंतर युवा अनुज रावत आणि दिनेश कार्तिक यांनी धावा काढण्याची जबाबदारी स्वीकारली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 95 धावांची भागीदारी करून संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेलं. रावतनं 25 चेंडूत 48 धावा ठोकल्या.
174 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या चेन्नईची सुरुवात चांगली झाली. आयपीएल पदार्पण करणाऱ्या रचिन रवींद्रनं 15 चेंडूत 37 धावा केल्या. तर कर्णधार ऋतुराज गायकवाडनंही 15 धावांचं योगदान दिलं. यानंतर अजिंक्य रहाणेनं 27 धावांची आणि डॅरिल मिशेलनं 22 धावांची छोटी पण प्रभावी खेळी खेळली. शेवटी शिवम दुबे आणि रवींद्र जडेजा या जोडीनं पुन्हा एकदा आक्रमक फलंदाजी करत सामना चेन्नईच्या बाजूनं खेचून आणला.
या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 66 धावांची नाबाद भागीदारी केली. जडेजा 25 धावा करून नाबाद तर दुबे 34 धावा करून नाबाद राहिला. विशेष म्हणजे, या जोडीनं आयपीएल 2023 च्या अंतिम फेरीतही चेन्नईला विजय मिळवून दिला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
शुबमन गिलनं गुजरातच्या कॅम्पमध्ये कोणाला अंगठी दिली? सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल
कोलकाता विरुद्ध हैदराबाद सामन्यासाठी ‘या’ खेळाडूंवर लावा पैज, KKR Vs SRH ड्रीम 11 टीम