आयपीएल 2024 चा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला गेला. या सामन्यात ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जनं शानदार विजयाची नोंद केली. चेन्नईकडून बांग्लादेशच्या मुस्तफिजूर रहमाननं धारदार गोलंदाजी केली. त्यानं एकूण 4 बळी घेतले. काही दिवसांपूर्वीच मुस्तफिजूर मैदानावर जखमी झाला होता. त्यानंतर त्याला स्ट्रेचरवर मैदानाबाहेर न्यावं लागलं होतं. पण आता तो तंदुरुस्त आहे. आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात त्यानं सामनावीराचा पुरस्कार पटकावला.
18 मार्च रोजी बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना चितगावमध्ये खेळला जात होता. पहिल्या डावातील 48 व्या षटकात मुस्तफिजूर शेवटचं षटक टाकायला आला. जेव्हा त्यानं पहिला चेंडू टाकला तेव्हा त्याला थोडं अस्वस्थ वाटलं आणि तो मैदानावर पडला. त्यानंतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचं पथक मैदानावर आलं. मुस्तफिजूरची प्रकृती खराब होती. त्यामुळे त्याला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आलं. त्याची अवस्था पाहून तो आयपीएलमधूनच बाहेर पडतो की काय, असं वाटत होतं. परंतु तसं झालं नाही. मुस्तफिजूरनं पहिल्याच सामन्यात अप्रतिम गोलंदाजी केली.
मुस्तफिजूर रहमाननं आरसीबीविरुद्ध शानदार गोलंदाजी करत एकूण 4 बळी घेतले. त्याचा पहिला बळी आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस ठरला, जो 35 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. रचिन रवींद्रनं त्याचा झेल घेतला. यानंतर मुस्तफिजूरनं रजत पाटीदारची विकेट घेतली. महेंद्रसिंह धोनीनं यष्टीमागे त्याचा झेल घेतला. पाटीदार धावाचं खातही उघडू शकला नाही.
मुस्तफिजूरनं विराट कोहलीला आपला तिसरा बळी बनवलं. तो 21 धावांवर रचिन रवींद्रच्या हाती झेल देऊन बाद झाला. यानंतर कॅमेरून ग्रीनही मुस्तफिजूरचा बळी ठरला. त्यानं ग्रीनला 18 धावांवर त्रिफळाचीत केलं. अशाप्रकारे मुस्तफिजूर रहमाननं 4 मोठे फलंदाज बाद करत आरसीबीचं कंबरडं मोडलं. या शानदार कामगिरीसाठी मुस्तफिजूरला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
महत्त्वाच्या बातम्या-
फाफ डू प्लेसिसनं सांगितलं चेन्नईविरुद्धच्या पराभवाचं कारण; म्हणाला, “पहिल्या डावात आम्ही…”
पंत-धवन नाही तर ‘या’ खेळाडूला बनवा कर्णधार! जाणून घ्या PBKS Vs DC सामन्याची ड्रीम 11 टीम
कोलकाता विरुद्ध हैदराबाद सामन्यासाठी ‘या’ खेळाडूंवर लावा पैज, KKR Vs SRH ड्रीम 11 टीम