आयपीएल 2024 च्या 45 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं गुजरात टायटन्सचा 9 गडी राखून पराभव केला. 28 एप्रिल (रविवार) रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात आरसीबीला विजयासाठी 201 धावांचं लक्ष्य होते, जे त्यांनी16 षटकांतच गाठलं. आयपीएलमध्ये प्रथमच एका संघानं 9 विकेट्स शिल्लक असताना 200 हून अधिक धावांचा पाठलाग केला आहे.
आरसीबीचा चालू मोसमातील 10 सामन्यांमधला हा तिसरा विजय असून त्यांच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा कायम आहेत. दुसरीकडे, गुजरात टायटन्सचा दहा सामन्यांमधला हा सहावा पराभव ठरला.
या सामन्यात विराट कोहली आणि विल जॅक्स आरसीबीच्या विजयाचे हिरो ठरले. विल जॅक्सनं अवघ्या 41 चेंडूत शतक झळकावलं. त्यानं 100 धावांच्या नाबाद खेळीत 10 षटकार आणि 5 चौकार लगावले. तर कोहलीनं नाबाद 70 धावा केल्या, ज्यात सहा चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. कोहली आणि जॅक्समध्ये दुसऱ्या विकेटसाठी 166 धावांची नाबाद भागीदारी झाली. या भागीदारीनं गुजरातकडून सामना हिसकावून घेतला.
आयपीएलमध्ये आरसीबीद्वारे सर्वाधिक धावांचा यशस्वी पाठलाग
204 विरुद्ध पंजाब किंग्ज, 2010
201 विरुद्ध गुजरात टायटन्स, 2024
192 विरुद्ध रायजिंग पुणे सुपरजायंट्स, 2016
187 विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, 2023
गुजरात टायटन्सविरुद्ध सर्वोत्तम भागीदारी
166* विराट कोहली-विल जॅक्स, अहमदाबाद 2024
130 संजू सॅमसन-रियान पराग, जयपूर 2024
115 विराट कोहली- फाफ डू प्लेसिस, मुंबई 2022
113 रिषभ पंत-अक्षर पटेल, दिल्ली 2024
तत्पूर्वी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सनं तीन गडी गमावून 200 धावा केल्या. गुजरातकडून साई सुदर्शननं 49 चेंडूंत आठ चौकार आणि चार षटकारांसह नाबाद 84 धावा केल्या. शाहरुख खाननंही 30 चेंडूत 58 धावांची उत्कृष्ट खेळी केली. शाहरुखच्या खेळीत तीन चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता.
शाहरुख आणि सुदर्शन यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 86 धावांची भागीदारी झाली. शाहरुख बाद झाल्यानंतर डेव्हिड मिलर आणि सुदर्शन यांच्यात चौथ्या विकेटसाठी नाबाद 69 धावांची भागीदारी झाली. मिलरनं 19 चेंडूंत दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं 26 धावा केल्या. आरसीबीतर्फे स्वप्नील सिंग, ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
शाहरुख खानच्या बॅटमधून अखेर धावा निघाल्या! आरसीबीविरुद्ध ठोकलं झंझावाती अर्धशतक
ग्लेन मॅक्सवेलचा जोरदार कमबॅक! 3 सामन्यांच्या ब्रेकनंतर परतताच घेतली कर्णधार गिलची विकेट