येत्या 22 मार्चपासून इंडियन प्रीमियर लीगला (IPL 2024) सुरुवात होणार आहे. मात्र दुखापतीमुळे या स्पर्धेतून अनेक बडे खेळाडू बाहेर पडले आहेत. टीम इंडिया आणि गुजरात टायटन्सचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं. तर मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज दिलशान मधुशंकाही दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झाला. आता दोन्ही फ्रँचायझीनं या दोघांच्या जागी बदली खेळाडूची घोषणा केली आहे.
गुजरात टायटन्सनं मोहम्मदी शमीच्या जागी वेगवान गोलंदाज संदीप वॉरियरचा संघात समावेश केला आहे. तो यापूर्वी कोलकाता नाइट रायडर्स (KKR) कडून खेळला होता. संदीपनं 2019 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. परंतु त्यानं आतापर्यंत फक्त 5 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याच्या नावे 2 विकेट्स आहेत.
मोहम्मद शमी घोट्याच्या दुखापतीनं त्रस्त आहे. त्याच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया झाली. या कारणास्तव शमी जूनमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकातही खेळू शकणार नाही. गुजरात टायटन्सनं संदीप वॉरियरला 50 लाखांच्या मूळ किमतीत घेतलं आहे. केकेआरनं आयपीएल 2022 च्या मेगा लिलावापूर्वी संदीपला सोडलं होतं. यानंतर लिलावात त्याला कोणत्याही संघानं घेतलं नाही.
याशिवाय श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दिलशान मधुशंकाच्या जागी मुंबई इंडियन्सच्या संघात दक्षिण आफ्रिकेच्या क्वेना मफाकाची वर्णी लागली आहे. 17 वर्षीय मफाकानं नुकत्याच झालेल्या अंडर-19 विश्वचषकात चमकदार कामगिरी केली होती. यावेळी तो आयपीएलच्या लिलावातही सहभागी झाला होता, मात्र त्याला कोणीही विकत घेतले नाही. आता मात्र तो मधुशंकाच्या जागी मुंबई इंडियन्सच्या संघात सामील झाला आहे.
डावखुरा मध्यमगती गोलंदाज मफाका यानं अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेलं नाही. म्हणजेच तो आता अनकॅप्ड खेळाडू म्हणून आयपीएलमध्ये सामील झाला आहे. मफाकाची मूळ किंमत 20 लाख रुपये होती.
22 मार्चपासून सुरू होत असलेल्या आयपीएल 2024 च्या सलामीच्या सामन्यात गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जसमोर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं आव्हान असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
क्रिकेट विश्वातून वाईट बातमी, पाकिस्तानच्या दिग्गज क्रिकेटपटूनं घेतला जगाचा निरोप
IPL 2024 मधून आणखी एक बडा खेळाडू बाहेर, ‘वैयक्तिक कारणांमुळे’ घेतली माघार
IPL 2024 च्या उद्घाटन समारंभात कोणते स्टार्स परफॉर्म करणार? कसा असेल कार्यक्रम? जाणून घ्या सर्वकाही