भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू आणि समालोचक इरफान पठाण यानं राजस्थान रॉयल्सच्या रियान परागबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. 22 वर्षीय रियाननं दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 45 चेंडूत 84 धावांची नाबाद खेळी करत विरोधी गोलंदाजांना नाकीनऊ आणलं. डावाच्या शेवटच्या षटकात परागनं एनरिक नॉर्कियाला 3 चौकार आणि 2 गगनचुंबी षटकार ठोकत 25 धावा गोळा केल्या. 20व्या षटकातील त्याची झंझावाती फलंदाजी राजस्थान रॉयल्ससाठी गेम चेंजर ठरली आणि संघानं 12 धावांनी सामना जिंकला.
रियान परागची ही तुफानी फलंदाजी पाहिल्यानंतर इरफान पठाणही खूश झाला. पराग पुढील दोन वर्षात भारतीय संघाकडून खेळेल, असा अंदाज त्यानं व्यक्त केला आहे. इरफान पठाणनं ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलं, “रियान पराग पुढील दोन वर्षांत भारतासाठी खेळेल.”
रियान परागचं यश पाहिल्यानंतर इरफान पठाणनं इतर युवा खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटला हलक्यात न घेण्याचा सल्ला दिला आहे. इरफान म्हणाला, “रियान परागनं देशांतर्गत क्रिकेटमध्ये खूप धावा केल्या आहेत, ज्यामुळे तो आयपीएलमध्ये अशी कामगिरी करू शकला.” इतर युवा खेळाडूंना सल्ला देत इरफान म्हणाला, “भारतातील देशांतर्गत क्रिकेटला कधीही हलक्यात घेऊ नका. ते तुमच्याच भल्यासाठी आहे. रियान परागकडे पहा. तो आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करत आहे, कारण त्यानं देशांतर्गत क्रिकेटमध्ये बरेच सामने खेळले आणि धावा केल्या आहेत.”
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या राजस्थान रॉयल्सची सुरुवात चांगली झाली नाही. संघाने 36 धावांवर यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन आणि जोस बटलरच्या रूपानं तीन मोठ्या विकेट्स गमावल्या. यानंतर रियान परागनं आर अश्विनच्या साथीनं डावाची धुरा सांभाळली. या दोघांमध्ये 54 धावांची भागीदारी झाली. पराग शेवटपर्यंत नाबाद राहिला. त्याच्या 45 चेंडूत 84 धावांच्या स्फोटक खेळीच्या जोरावर यजमान संघाला 185 धावांपर्यंत मजल मारता आली.
या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाला चांगली सुरुवात मिळाली होती. मात्र कमकुवत मधल्या फळीमुळे संघाला लक्ष्य गाठता आलं नाही. डेव्हिड वॉर्नरने संघाकडून सर्वाधिक 49 धावांची खेळी खेळली. तर ट्रिस्टन स्टब्स 44 धावा करून नाबाद राहिला. दिल्लीला निर्धारित 20 षटकात 5 गडी गमावून केवळ 173 धावा करता आल्या आणि त्यांना 12 धावांनी पराभवाला सामोरं जावं लागलं.
महत्त्वाच्या बातम्या-
राजस्थान रॉयल्सविरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचा पुन्हा पराभव, ऋषभ पंतच्या संघाच्या पराभवाचं कारण काय?
ऑरेंज कॅपच्या शर्यतीत रियान परागनं टाकलं विराट कोहलीला मागे, पर्पल कॅपवर ‘या’ विदेशी खेळाडूचा कब्जा