दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग आणि क्रिकेट संचालक सौरव गांगुली गुरुवारी राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यादरम्यान पंचांशी भिडले. राजस्थान रॉयल्सनं ‘इम्पॅक्ट प्लेअर’ नियमाचा गैरवापर केल्याचा आरोप दोघांनी केला. राजस्थान रॉयल्सनं पाच विदेशी खेळाडूंचा वापर केल्याचा दावा पाँटिंग आणि गांगुलीनं केला.
येथे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, आयपीएलमध्ये एक संघ त्याच्या प्लेइंग 11 मध्ये चारपेक्षा जास्त विदेशी खेळाडूंचा समावेश करू शकत नाही. राजस्थान रॉयल्सनं आपली प्लेइंग 11 जाहीर करताना तीन विदेशी खेळाडूंचा समावेश केला होता. राजस्थानचे तीन विदेशी खेळाडू होते – जोस बटलर, शिमरॉन हेटमायर आणि ट्रेंट बोल्ट. मात्र, पाच बदली खेळाडूंमध्ये नांद्रे बर्जर आणि रोव्हमन पॉवेल यांचा समावेश होता. प्लेइंग 11 मध्ये विदेशी खेळाडूची एक जागा रिक्त होती, जी ते ‘इम्पॅक्ट प्लेअर’ नियमानुसार वापरू शकत होते.
दिल्ली कॅपिटल्सच्या डावात रोव्हमन पॉवेल पर्यायी क्षेत्ररक्षक म्हणून मैदानात उतरताच रिकी पाँटिंग आणि सौरव गांगुली यांनी त्याचा विरोध केला. बर्जरनं इम्पॅक्ट प्लेअर म्हणून प्लेइंग 11 मध्ये शिमरॉन हेटमायरची जागा घेतली. मात्र, पाँटिंग आणि गांगुली पंचांकडे, राजस्थाननं पाच विदेशी खेळाडूंचा वापर केल्याची तक्रार करताना दिसले.
येथे हे लक्षात घेण्यासारखं आहे की, राजस्थान रॉयल्सनं कोणतेही नियम मोडले नाहीत कारण त्यांच्या प्लेइंग 11 मध्ये केवळ तीन विदेशी खेळाडू होते. बर्जरनं शिमरॉन हेटमायरची जागा विदेशी खेळाडू म्हणून घेतली. त्यानंतर पॉवेलनं पर्यायी क्षेत्ररक्षकाची भूमिका बजावली, त्यावेळी मैदानावर चारच विदेशी खेळाडू उपस्थित होते. अशा परिस्थितीत कोणताही नियम मोडला गेला नाही.
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, रियान पराग (84) च्या झंझावाती खेळीमुळे राजस्थान रॉयल्सनं 20 षटकात 5 गडी गमावून 185 धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्स संघानं 20 षटकांत 5 गडी गमावून 173 धावा केल्या. आयपीएल 2024 च्या गुणतालिकेत रॉयल्स संघ दुसऱ्या स्थानावर आहे तर कॅपिटल्स आठव्या स्थानावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
राजस्थानविरुद्ध बाद झाल्यानंतर ऋषभ पंतला राग अनावर, रागाच्या भरात भिंतीवर बॅट मारली; व्हिडिओ व्हायरल
राजस्थान रॉयल्सविरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचा पुन्हा पराभव, ऋषभ पंतच्या संघाच्या पराभवाचं कारण काय?