भारतीय फिरकीपटू युझवेंद्र चहलला पंजाब किंग्जनं 18 कोटी रुपयांना खरेदी केलं आहे. यासह तो इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वात महागडा भारतीय फिरकी गोलंदाज ठरला. सनरायझर्स हैदराबादनं चहलला विकत घेण्यासाठी अथक प्रयत्न केले, पण शेवटी पंजाबनं बाजी मारली.
युझवेंद्र चहलची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती, ज्यावर गुजरात टायटन्सनं पहिली बोली लावली. चेन्नई सुपर किंग्जलाही त्यांच्या संघात लेगस्पिन गोलंदाजाची गरज आहे. त्यामुळे चेन्नईनं 5.5 कोटी रुपयांपर्यंत बोली लावली, पण नंतर माघार घेतली. गुजरातनंही 6.75 कोटी रुपयांनंतर मौन बाळगलं. पंजाब किंग्सच्या पर्समध्ये भरपूर पैसे शिल्लक होते. त्यामुळे त्यांनी अर्शदीप सिंग आणि श्रेयस अय्यरवर करोडो रुपये खर्च केल्यानंतरही चहलवर मोठी बोली लावली आणि त्याला 18 कोटी रुपयांना विकत घेतलं.
चहल हा आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्यानं आपल्या शानदार कारकिर्दीत 205 विकेट्स घेतल्या आहेत. तो इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात 200 हून अधिक बळी घेणारा तो एकमेव गोलंदाज आहे.
आयपीएल 2025 मेगा लिलावात पंजाब किंग्जनं आतापर्यंत 3 खेळाडूंना खरेदी केलंय. अर्शदीप सिंग, श्रेयस अय्यर आणि युझवेंद्र चहल हे ते तीन खेळाडू आहेत. पंजाबनं या 3 खेळाडूंवर तब्बल 62.75 कोटी रुपये खर्च केले. पंजाबच्या पर्समध्ये अजूनही 47.75 कोटी रुपये शिल्लक आहेत.
लिलावापूर्वी पीबीकेएसनं शशांक सिंग आणि प्रभसिमरन सिंग यांना आधीच रिटेन केलं होतं. आता पंजाब संघात श्रेयस अय्यर, अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल यांच्या रूपानं तीन हाय-प्रोफाइल खेळाडूंचं आगमन हे त्यांना आगामी हंगामातील अव्वल संघ बनवेल.
हेही वाचा –
रिषभ पंत आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू! अवघ्या काही मिनिटांत मोडला श्रेयस अय्यरचा रेकॉर्ड
मेगा लिलावात अर्शदीप सिंगवर पैशांचा वर्षाव! या टीमनं लावली तब्बल 18 कोटींची बोली
आता विजय आपलाच! यशस्वी-विराटच्या शतकानंतर सिराज-बुमराहचा कहर